पुणे-सोलापूर महामार्ग बनतोय मृत्यूचा सापळा

पुणे-सोलापूर महामार्ग बनतोय मृत्यूचा सापळा

कळस : पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर अपघातांची वाढती संख्या विचारात घेता हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनल्याचे बोलले जात आहे. 

उन्हाळ्यातील सुटीचे नियोजन करून बाहेर पडलेल्यांची संख्या व दैनंदिन प्रवासी वाहनांमुळे महामार्गावरील वाहतूक सध्या वाढल्याचे दिसत आहे. परंतु महामार्गावरून प्रवास करताना योग्य ती काळजी न घेतल्याने अपघातास निमंत्रण मिळत आहे.

जानेवारी महिन्यापासून आजपर्यंत भिगवण ते इंदापूर या पट्ट्यात महामार्गावरील अपघातांमध्ये सुमारे तीस जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. यामुळे जीवन अनमोल आहे, ते वाचविण्यासाठी वेगावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. 

पुणे-सोलापूर महामार्गावर भिगवण ते इंदापूर या पट्ट्यामध्ये काही ठिकाणी प्रमुख रस्ता दुरुस्तीचे काम सुरू आहे. यामुळे वाहतूक सेवा रस्त्याने वळविण्यात आली आहे. मात्र, सेवा रस्त्याने प्रवास करताना वेगाचे भान ठेवणे गरजेचे आहे. रस्त्याचे काम करणाऱ्या यंत्रणेने रस्ता वळविल्याचे फलक लावणे, वेगाची मर्यादा ठेवण्याची सूचना देणारे फलक 

लावणे गरजेचे आहे. प्रत्यक्षात मात्र, या यंत्रणेने अशी काहीच खबरदारी घेतलेली दिसून येत नाही. यामुळे पळसदेव येथे शुक्रवारी (ता. 25) रात्रीच्या वेळी जीप व ट्रॅक्‍टर यांच्यात अपघात होऊन एकाला प्राण गमवावा लागला, तर आठ दिवसांपूर्वीच शुक्रवारी (ता. 18) पुण्यातील स्कार्पिओचा टायर फुटल्याने झालेल्या अपघातात पाच जणांना प्राण गमवावा लागला होता.

उन्हाच्या तीव्रतेने तापलेल्या डांबरी रस्त्यावर वाहनाच्या वेगाने गरम झालेले टायर कधी धोका देतील ते सांगता येत नाही. यामुळे वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवणे गरजेचे झाले आहे. भिगवण ते इंदापूरपर्यंतचा 46 किलोमीटरचा टप्पा वाहतुकीच्या दृष्टीने संवेदनशील बनला आहे. यामुळे या टप्प्यातून प्रवास करताना सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. रस्त्यालगत वाढलेली हॉटेल, ढाब्यांची संख्या, त्यावर राजरोसपणे होणारी अवैध दारूविक्री, काही हॉटेल व्यावसायिकांच्या भल्याचा विचार करून हॉटेलसमोर रस्त्यावर घातलेले गतिरोधक, लोकांनी सोईसाठी अनधिकृतपणे फोडलेले रस्तादुभाजक, व्यावसायिकांनी बेकायदा मुख्य रस्ता व सेवा रस्त्याला जोडण्यासाठी मुरूम टाकून तयार केलेला जोड रस्ता व सेवा रस्त्यावर वाढलेले नागरिकांची अतिक्रमण यांसारख्या अनेक गोष्टी वाहतुकीसाठी असुरक्षित झालेल्या आहेत.

याचबरोबर रस्त्यावर वाहने थांबविणे, दारू पिऊन वाहने चालविणे, लेनची शिस्त न पाळणे यामुळेही अपघातास आमंत्रण मिळत आहे. यामुळे या गोष्टींना 
आळा घालून चालकांमध्ये प्रबोधन करण्याबरोबरच बेकायदा गोष्टींना आळा घालण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com