
Accident : खासगी आराम बस व स्विफ्ट डिझायनर गाडीच्या अपघातात दोन जण जागीच ठार
कुरकुंभ - पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दौड तालुक्यातील मळद हद्दीत खासगी आराम बस व स्विफ्ट डिझायनर गाडीचा अपघात होऊन स्विफ्ट दीडशे फूट खोल खडकवासला कालव्याच्या बोगद्यात पाण्यात पडल्याने दोन जण जागीच ठार झाले. हा अपघात बुधवारी (ता. २४) पहाटे दीड वाजता घडून, दोन जणांचा मृत्यू होऊनही रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता. यावरून पोलिसांची कार्यक्षमतेबाबत प्रश्न उपस्थित होत आहे.
पुण्याहून बुधवारी मध्यरात्री स्विफ्ट डिझायर गाडीतून उद्गगीरकडे पुणे-सोलापूर महामार्गावरुन जात असताना मळद हद्दीत खासगी आराम बसचा अपघात झाला. बसने स्विफ्टला डॅश दिल्याने वेगात असणारी स्विफ्ट चालकाचा ताबा सुटल्याने गाडी दीडशे फूट खोल खडकवासला कालव्याच्या पाण्यात कोसळली.
या अपघातात स्विफ्टमधील बलवंत विश्वनाथ तेलंगे (वय-३५, सध्या रा. भोसरी, पुणे. मूळ रा. सोमनाथपूर, ता. उद्गगीर, जि. लातूर) व नामदेव जिवन वाघमारे (वय-१८, रा. भोसरी, पुणे) या दोघांचा मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या दोघांचे एकमेकांचे दाजी मेव्हणे असे नाते आहे. हे दोघे पुण्याहून गावाकडे चालले होते. अपघात पहाटे दीडला घडूनही रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता. व मृतांची नावेही पोलिसांना निष्पन्न झाली होती. यावरुन पोलिसांची अकार्यक्षमता लक्षात येते.