esakal | Pune: सोमेश्वरच्या निवडणुक प्रचाराच्या तोफा आज धडाडणार
sakal

बोलून बातमी शोधा

 Sugar Factory
पुणे : सोमेश्वरच्या निवडणुक प्रचाराच्या तोफा आज धडाडणार

पुणे : सोमेश्वरच्या निवडणुक प्रचाराच्या तोफा आज धडाडणार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सोमेश्वरनगर : सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीच्या प्रचाराची रविवारी (ता. १०) सांगता आहे. यानिमित्ताने सत्ताधारी सोमेश्वर विकास पॅनेलकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत; तर विरोधातील सोमेश्वर परिवर्तन पॅनेलकडून सहकारातील ज्येष्ठ नेते चंदरराव तावरे यांना निमंत्रित केले आहे. त्यामुळे दोन्ही बाजूच्या तोफा धडाडणार, अशी चिन्हे आहेत.

सोमेश्वर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी १२ ऑक्टोबरला मतदान होणार आहे. त्यामुळे १० तारखेलाच सांगता सभा घेऊन प्रचार आवरता घ्यावा लागणार आहे. राष्ट्रवादी पुरस्कृत सोमेश्वर विकास पॅनेलने कारखान्याजवळील सोमेश्वर पॅलेस येथे पवार, आमदार संजय जगताप आदींच्या उपस्थितीत दुपारी तीन वाजता सांगता सभेचे आयोजन केले आहे. पवार यांच्याकडून भाजप पुरस्कृत परिवर्तन पॅनेलवर कडाडून हल्ला केला जातो की कारखान्याच्या विकासकामांवरच भाषणात भर दिला जातो, याची उत्सुकता लागली आहे.

हेही वाचा: कऱ्हाड : झटापटीनंतर रावण गँगचे चौघे जेरबंद; पोलिसांची धाडसी कारवाई

तसेच नाराज लोकांना पवार सुनावतात की चुचकारतात, याकडेही सभासदांचे लक्ष आहे. तसेच, आयकर विभागाने घातलेल्या छाप्यांच्या अनुषंगाने काय बोलतात, याकडेही त्यांच्या घरच्या मतदारांचे लक्ष लागणार आहे.

दरम्यान, परिवर्तन पॅनेलने प्रचारात खासगी कारखानदारीचा सहकाराला धोका, हा मुद्दा उचलला असून, या विषयावरील माहीतगार वक्ते चंदरराव तावरे व माळेगाव कारखान्याचे माजी अध्यक्ष रंजन तावरे हे सांगता सभेत येणार आहेत. माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनाही आणण्याचे प्रयत्न चालले असल्याचे समजते. दरम्यान, सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकांच्या परंपरेत सांगता सभेला खूप महत्त्व असल्याने कोण किती गर्दी खेचतो, हेही पाहणे औत्सुक्याचा विषय ठरणार आहे.

हेही वाचा: मंचर : जादू दाखवितो सांगून मोबाईलच पळविला

वाघळवाडीकरांकडून बहिष्कार अखेर मागे

वाघळवाडी (ता. बारामती) येथील ग्रामस्थांनी अखेर सोमेश्वर कारखाना निवडणुकीवरील बहिष्कार मागे घेतला. बहिष्काराचे फलकही उतरवून घेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत राहण्याचा नारा दिला. राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून गावातील कुणालाही उमेदवारी दिली गेली नाही, या कारणावरून वाघळवाडी ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला होता. गावातील कुणीही प्रचारातही सहभागी होत नव्हते. कारखान्यातील नोकरभरतीतही डावलले जात असल्याची भूमिका घेतली होती.

पाच दिवस हा प्रश्न भिजत राहिला. अखेर शनिवारी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, कारखान्याचे माजी अध्यक्ष राजवर्धन शिंदे, जिल्हा बँकेचे संचालक मदन देवकाते यांनी गावातील काही कार्यकर्त्यांसोबत बैठक घेतली. नोकरभरतीसाठी प्राधान्य, गावाला भविष्यातील उमेदवारी, या विषयावर चर्चा झाली. या शिष्टाईनंतर ग्रामस्थांनी बैठक घेत बहिष्कार मागे घेण्याचा निर्णय घेतला.

loading image
go to top