Pune : उत्पन्नाच्या दहा टक्के रक्कम समाजासाठी खर्च करा; अजित पवार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ajit pawar baramati

Pune : उत्पन्नाच्या दहा टक्के रक्कम समाजासाठी खर्च करा; अजित पवार

बारामती - ज्यांच्याकडे आहे त्यांनी ज्यांच्याकडे नाही त्यांना देण्याची दानत ठेवावी, जितके कमावतो त्यातील दहा टक्के सामाजिक कामांसाठी खर्च केले तरी त्यातून विकास होऊ शकेल, असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले. रघुनाथ गेनबा बोरावके ट्रस्ट संचलित ज्येष्ठ नागरिक निवासामधील श्रमण करमणूक केंद्र व मेहता भोजन कक्षाचे उदघाटन अजित पवार यांच्या हस्ते झाले.

त्या प्रसंगी ते बोलत होते. सुनेत्रा पवार, माजी नगराध्यक्ष जवाहर वाघोलीकर, किशोर मेहता, अभय शहा, केशवराव जगताप, सचिन सातव, संदीप जगताप, डॉ. सुहासिनी सातव, सुरेंद्र भोईटे यांच्यासह अनेक मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले, मी कोणत्याही परिस्थितीत वृध्दाश्रमांचे समर्थन करीत नाही, मात्र बदलत्या परिस्थितीमध्ये ज्येष्ठ नागरिकांना समवयस्कांसमवेत राहून वेळ व्यतित करणे, छंद जोपासण्यासह त्यांच्या तातडीच्या वैदयकीय गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टीने अशा प्रकारचे ज्येष्ठ नागरिक निवास गरजेचे आहेत.

या पुढील काळात कमी खर्चात ज्येष्ठांना वास्तव्य करण्याच्या दृष्टीने इमारत उभारण्याचे सूतोवाचही त्यांनी केले. या प्रसंगी जिवाभाई कोठारी, मुरलीधर घोळवे, डॉ. टी.जी. अंबर्डेकर यांच्यासारख्या मान्यवरांनी या संस्थेसाठी दिलेल्या योगदानाचा अजित पवार यांनी कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला. अस काही करु नका...

शहरातील एका वास्तूला छोटे भाले सौंदर्यीकरणासाठी लावले होते, तेच लोकांनी तोडून नेले. एक छोटा भाला विकला की शंभर रुपये मिळतात, त्यात दोन चपट्या (छोट्या दारुच्या बाटल्या) येतात, चोरणा-यांचे तेवढ्यापुरते भागतेय....अस सांगत आता ते लावणच बंद करुन जे चोरीला जाणार नाही, असे मटेरियल वापरणार असल्याचे सांगत असल काही करु नका, असे आवाहन अजित पवार यांनी केले.

साडेसात एकरांचे सुंदर उद्यान साकारणार

शंभर चार चाकी व दुचाकी वाहनांच्या पार्किंगची सुविधा, खाद्यपदार्थ विक्रीचे प्रशस्त स्टॉल असलेले साडे सात कोटी रुपयांच्या खर्चाचे सुंदर उद्यान प्रशासकीय भवन शेजारील जागेत साकारणार असल्याचेही अजित पवार यांनी सांगितले. या साठी एक उद्योगपती मदत करणार असून त्या पैकी दोन कोटी रुपयांचा पहिला हप्ता प्राप्त झाला आहे.

येत्या काही महिन्यात येथे सुंदर उद्यान साकारलेले दिसेल व त्याचा या परिसरातील लोक आनंद घेऊ शकतील. शिवाय तीन हत्ती चौकातही वीस गुंठे जागेवर सुंदर उद्यान व लोकांसाठी बैठक व्यवस्थाही होणार आहे, हे काम पूर्ण झाल्यावरच ते लक्षात येईल, असेही त्यांनी नमूद केले.