
Pune : पन्नाशीत गाजवली दक्षिण कोरिया ! कात्रजच्या अजय रावळ यांची बॅडमिंटन स्पर्धेत दिमाखदार कामगिरी
कात्रज - दक्षिण काेरियातील जिओनबुकमध्ये आयाेजित करण्यात आलेल्या आशिया पेसिफिक मास्टर्स स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करताना बॅडमिंटन स्पर्धेत कात्रजच्या अजय रावळ यांनी पुरुष गटात दिमाखदार कामगिरी केली. बॅडमिंटन स्पर्धेत ५० हून अधिक वर्षे वयोगटात रावळ यांचा समावेश होता.
या स्पर्धेत त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व करताना डबल्समध्ये पुण्यातील त्यांचे सहकारी राज सिंग यांच्यासोबत ब्राँझ पदकाची कमाई केली. या खेळात त्यांनी उंपात्य सामन्यांपर्यंत मजल मारली. उंपात्य सामन्यात जपानकडून २३-२१, २१-१९ असा त्यांचा पराभव झाला. तर सिंगल्समध्येही रावळ यांनी आपल्या कामगिरीचा ठसा उमटवत उंपात्य फेरीपर्यंत मजल मारली. उंपात्य फेरीत त्यांचा सामना उत्तप्रदेशच्या अनिलकुमार श्रीवास्तव यांच्याशी झाला.
त्यामध्ये २१-१६, २१-१८ असा त्यांचा पराभव झाल्याने ब्राँझ पदकांवर समाधान मानावे लागले.आशिया पेसिफिक मास्टर्स या स्पर्धेसाठी जगभरातील विविध ७१ देशांतून १३ हजारांहून अधिक खेळाडू विविध स्पर्धांमध्ये सहभागी झाले होते. २०२२मध्ये या स्पर्धेसाठी देशभरातून विविध स्पर्धक बंगळुरु येथे आले होते.
प्राथमिक चाचण्या पार पाडल्यानंतर बँडमिंटन स्पर्धेसाठी भारतातून सहा खेळाडूंची निवड करण्यात आली होती. यामध्ये अजय रावळ यांचा समावेश होता. या स्पर्धा या दर चार वर्षांनी होतात.
२०१८मध्ये मलेशियात ही स्पर्धा पार पडल्यानंतर कोरोनाच्या संकटामुळे २०२२ऐवजी २०२३मध्ये दक्षिण कोरियात ही स्पर्धा संपन्न झाली. अजय रावळ हे कात्रजमधील राजस सोसायटीचे रहिवासी असून या यशासाठी परिसरातून विविध क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
प्रतिक्रिया
मला लहानपणापासून बॅडमिंटन खेळाची आवड असून विविध स्पर्धांत सहभाग घेत असतो. आतापर्यंत अनेक स्पर्धांमध्ये मला बक्षिसे मिळाली आहेत. मात्र, मला पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत पदक प्राप्त झाले आहे. त्याचा एक वेगळाच आनंद आहे. - अजय रावळ, खेळाडू