Pune: आता मागे हटणार नाही, ही आरपाराची लढाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आता मागे हटणार नाही, ही आरपाराची लढाई

पुणे : आता मागे हटणार नाही, ही आरपाराची लढाई

पुणे : सकाळची वेळ, नाश्ता, जेवण बनविण्याची लगबग, तिखट मीठ आहे का हो; म्हणून सुरु असलेली चौकशी, तर नाकातोंडात धूर जात असतानाही चुलीतील लाकडांना जाळ घालण्याचा सुरु असलेला प्रयत्न... हे चित्र कुठल्या गावातील अथवा वाडी वस्तीवरचे नसून, सातारा रस्त्यावरील एसटी कॉलनीतील आहे. दरम्यान,आता मागे हटणार नाही, ही तर आरपाराची लढाई असल्याचा निर्धार एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला.

एसटी कर्मचाऱ्यांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी गेल्या सात दिवसांपासून पुकारलेल्या संपात स्वारगेट, वाकडेवाडी (शिवाजीनगर), पुणे स्टेशन आदी आगारांसह जिल्ह्यातील १३ डेपोतील कर्मचारी सहभागी झाले आहेत. स्वारगेट स्थानकावर आंदोलनासाठी बसलेल्या कर्मचाऱ्यांना वेळेत नाश्ता आणि जेवण पोचविण्यासाठी गेल्या सात दिवसांपासून एसटी कॉलनीत लगबग सुरु आहे.

याबाबत अनिता मुंडे म्हणाल्या, ‘‘मुलांच्या आनंदासाठी दिवाळी कशीबशी साजरी केली. हातात होते तेवढे पैसा खर्च झाले. घरातले रेशन संपत चालले आहे. त्यामुळे कॉलनीतील महिला एकत्र येऊन यावर तोडगा काढत आहोत. सर्वजणी मिळून कोणाच्या घरात जे काही आहे, ते एकत्र करून एकाच चुलीवर स्वयंपाक करीत आहोत. येथूनच संपकरी कर्मचाऱ्यांना जेवणाचे डबे पुरविले जात आहे.’’

काही झाले तरी आता मागे हटणार नाही. आता ही लढाई आरपाराची असून एसटी कर्मचाऱ्यांच्या मुलांच्या भविष्यासाठी शेवटचा लढा आहे. तो जिंकण्यासाठी आम्ही महिला संपकरी कर्मचाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून ठामपणे उभ्या असल्याचा निर्धार शुभांगी भडके, शिता भातकर, सुग्राबी सय्यद, ज्योती पौरे, अंजली डुबलवार आदी महिलांनी व्यक्त केला.

रक्तदान करून रोष व्यक्त

पुणे : एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे. या मुख्य मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सलग सातव्या दिवशी संपात सहभागी होत स्वारगेट स्थानकावरील ८० कर्मचाऱ्यांनी रविवारी (ता.१४) रक्तदान करून सरकारच्या विरोधात रोष व्यक्त केला.

हेही वाचा: किवींचा पुन्हा ये रे माझ्या मागल्या शो; कांगारु टी-20 चॅम्पियन!

शहरात रक्ताचा पुरवठा अपुरा पडत आहे, याची जाणीव ठेवून सामाजिक बांधिलकी जपत संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी स्वारगेट स्थानकात रक्तदान शिबिर घेतले. यावेळी रक्तदात्यांनी एसटी महामंडळाचे विलीनीकरण झालेच पाहिजे, अशी घोषणा दिल्या. तसेच आमच्या न्याय हक्कांसाठी हा लढा संवेदनशील मार्गाने सुरू असून, शहरासह राज्यातील जनतेने संपाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

शहरातील स्वारगेट, पुणे स्टेशन, वाकडेवाडी (शिवाजीनगर) आदी आगारांसह जिल्ह्यातील १३ डेपोतील कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. यापूर्वी जागरण गोंधळ, मुंडण करत कर्मचाऱ्यांनी रोष व्यक्त केला आहे. तसेच उद्या कार्तिकी एकादशीनिमित्ताने भजनाचे आयोजन करून मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यात येणार असल्याचे संपकरी कर्मचाऱ्यांनी सांगितले. तर वाकडेवाडी येथील संपात एसटी कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय सहभागी झाले होते.

वारकऱ्यांना सेवा देता येत नसल्याची खंत

कार्तिकी एकादशीनिमित्ताने विठुरायाच्या पंढरीला जाणाऱ्या वारकऱ्यांना सेवा देता येणार नाही, याची खंत एसटी कर्मचाऱ्यांनी व्यक्त करून वारकरी संप्रदायाची दिलगिरी व्यक्त केली आहे.

या आहेत अडचणी

  • तुटपुंजा पगामुळे घर खर्च भागविण्यास मर्यादा

  • पैशांअभावी मुलांच्या शिक्षणात पडतोय खंड

  • घर खर्च भागवण्यासाठी महिलांना करावी लागतात धुणीभांड्याची आणि स्वयंपाकाची कामे

  • सरकारी नोकरी असल्याचा समज करुन पाहुण्यांकडून मदत नाकारली जाते

  • घरातील ज्येष्ठांच्या औषधांचा खर्च भागवताना होतेय दमछाक

  • वाढत्या महागाईमुळे कुटुंबाच्या आर्थिक नियोजनाची चिंता

  • बाळासाहेब ठाकरेंची आठवण येते

हेही वाचा: Video: बोल्टची 'स्मार्ट' गोलंदाजी... वॉर्नरचा उडवला त्रिफळा!

मुख्यमंत्र्यांवर मानेच्या विकारामुळे शस्त्रक्रिया करण्यात आली आहे, याची जाणीव आम्हाला आहे. मात्र, राज्यात असलेले कच्चे रस्ते आणि खड्ड्यांमधून मार्ग काढत खेड्यापाड्यात ज्यांनी एसटीची सेवा दिली, त्यांच्या मानेतच नव्हे, तर कंबरेतही ‘गॅप’ पडल्यामुळे अनेकवेळा शस्त्रक्रिया केलेल्या कर्मचाऱ्यांचा देखील विचार करण्याची गरज आहे. बाळासाहेब ठाकरे नेहमी कामगारांच्या बाजूने बोलत होते. त्यामुळे त्यांची आठवण आता येते, अशी भावना कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली.

शाळा, कॉलेज जीवनात असताना अनेक स्वप्ने पाहिली होती. मात्र, एसटी कामगार झाल्याने तुंटपुजा मिळणाऱ्या पगारातून घर खर्च देखील भागविणे कठीण आहे. त्यापुढे स्वप्न कुठे हरविले, हे देखील माहीत नाही. मुलाबाळांचे किमान शिक्षण तरी चांगले होऊन त्यांची स्वप्ने पूर्ण होण्याची आमची माफक अपेक्षा आहे.

- रेश्मा पवार, वाहक

मी अभियांत्रिकीची पदवी घेतली आहे. स्पर्धा परीक्षा देऊन अधिकारी होण्याचे स्वप्न पाहिले होते. मात्र, बाबांच्या पगारात घर खर्च भगत नाही. लहान भावाचे शिक्षण अपुरे आहे. त्यामुळे स्वप्नांना आवर घालून मी नोकरीच्या शोधात आहे.

- भाग्यश्री मुंडे, एसटी कर्मचाऱ्याची मुलगी

माझा मुलगा एसटी कर्मचारी आहे. त्याच्या तुटपुंजा पगारामुळे त्याचे लग्न ठरण्यास अडचणी येत आहेत. मला दुर्धर आजाराने ग्रासले आहे. घर आणि औषधांचा खर्च भागविणे देखील कठीण होत आहे. त्यामुळे एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण झालेच पाहिजे.

- सुनीता ढोले, एसटी कर्मचाऱ्याची आई

loading image
go to top