ध्येयप्राप्‍तीसाठी इच्छाशक्ती हवी (व्हिडिओ)

आदिती देशपांडे
रविवार, 24 फेब्रुवारी 2019

पुणे - उद्योग सुरू करण्यासाठी योग्य नियोजन आणि प्रबळ इच्छाशक्ती हवी. या दोन्हींच्या जोरावर ध्येय साध्य करणे सहज शक्‍य होते. प्रत्यक्ष अनुभवातूनही शिकणे हेही तितकेच महत्त्वाचे असते, असा सल्ला नामवंत उद्योजकांनी ‘पुणे स्टार्टअप फेस्ट’च्या उद्‌घाटनप्रसंगी दिला.

पुणे - उद्योग सुरू करण्यासाठी योग्य नियोजन आणि प्रबळ इच्छाशक्ती हवी. या दोन्हींच्या जोरावर ध्येय साध्य करणे सहज शक्‍य होते. प्रत्यक्ष अनुभवातूनही शिकणे हेही तितकेच महत्त्वाचे असते, असा सल्ला नामवंत उद्योजकांनी ‘पुणे स्टार्टअप फेस्ट’च्या उद्‌घाटनप्रसंगी दिला.

शिवाजीनगर येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (सीओईपी) भाऊ ई-सेलतर्फे आयोजित या दोनदिवसीय महोत्सवाचे उद्‌घाटन आज झाले. या महोत्सवाचे ‘सकाळ’ माध्यम प्रायोजक आहे; तर ‘ट्रिसेंटिस’ मुख्य प्रायोजक आहेत. स्टार्टअप इंडिया, महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटी आणि पुणे महापालिका यांच्या वतीने हा महोत्सव भरविण्यात आला आहे.

उद्‌घाटनप्रसंगी येवले अमृततुल्यचे संस्थापक नवनाथ येवले, लिव्हहेल्थ कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू भोसले, एस. ए. व्ही. केमिकल्सच्या अंकिता श्रॉफ यांसह अभियांत्रिकी महाविद्यालयाचे संचालक डॉ. बी. बी. आहुजा, अधिष्ठाता एस. एल. पाटील, महाविद्यालयाच्या भाई इनक्‍युबेशन सेंटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय तळेले, भाऊ ई-सेलचे सचिव करण अग्रवाल, महाविद्यालयातील माधुरी कर्णिक, पी. आर. धामणगावकर आदी उपस्थित होते. तरुणांनी उद्योजकतेकडे वळावे, त्यासाठी कौशल्य विकसित करण्यावर भर द्यावा. खंबीर आत्मविश्‍वास असेल, तर उद्योजक होणे शक्‍य आहे. मात्र, अपार मेहनत ही कोणत्याही क्षेत्रात करावीच लागते. त्यामुळे आपले ध्येय साध्य करण्यासाठी तरुणांनी कष्ट घेतलेच पाहिजेत, असा सल्ला उद्योजकांनी दिला. महोत्सवात ‘स्टुडंट स्टार्टअप इंटर्नशिप’ची संधी उपलब्ध करून देण्यात आली असून, यासाठी देशभरातील दोन हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे; तर ‘इनव्हेस्टर्स झोन’मध्ये ५० गुंतवणूकदार सहभागी झाले आहेत.

तरुणांमधील उद्योजकतेला वाव देणाऱ्या ‘स्टार्टअप’वर लक्ष केंद्रित करून हा महोत्सव आयोजित केला आहे. नव्याने सुरू झालेले स्टार्टअप्स्‌ वाढीस लागण्यासाठी गुंतवणूकदारांशी भेट महोत्सवाच्या व्यासपीठावरून घडवून देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे नागरिकांना ‘स्टार्टअप्‌ कल्चर’ची ओळखही यानिमित्ताने होत आहे. महोत्सवासाठी महाविद्यालयातील ६० विद्यार्थ्यांचा गट कार्यरत आहे. 
- सौरव पाम्पट्टीवार, विद्यार्थी समन्वयक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Startup Fest 2019 Student