‘पुणे स्टार्टअप फेस्ट’ला शनिवारपासून सुरवात

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 फेब्रुवारी 2019

पुणे - स्टार्टअपला गुंतवणूकदार हवा असेल अथवा स्टार्टअप सुरू करण्यासाठी मार्गदर्शन हवे असल्यास तुम्ही अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (सीओईपी) भाऊ ई सेलतर्फे आयोजित ‘पुणे स्टार्टअप फेस्ट २०१९’मध्ये सहभागी होऊ शकता. ‘स्वप्नं साकार करा’ या संकल्पनेवर आधारित हा महोत्सव येत्या शनिवारी (ता. २३) आणि रविवारी (ता. २४) आयोजित केला आहे.

स्टार्टअप इंडिया, महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटी आणि पुणे महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने हा महोत्सव अभियांत्रिकी महाविद्यालयात होणार आहे. या महोत्सवासाठी ‘सकाळ’ माध्यम प्रायोजक आहे. तरुणांमधील उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. महोत्सवादरम्यान तंत्रज्ञान, सामाजिक, कृषी आणि जीवनशैली आणि इतर क्षेत्रांतील स्टार्टअपचे ‘स्टार्टअप एक्‍स्पो’ हे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. स्वत:चे स्टार्टअप सुरू करण्याची, स्टार्टअपच्या विश्‍वात सहभागी होण्याची इच्छा असणाऱ्यांना महोत्सवात सहभागी होता येईल. 

स्टार्टअपला अर्थिक बळ मिळावे, यासाठी मार्गदर्शन आणि सहकार्य करणारा ‘इन्वेस्टर्स झोन’ही येथे असेल. याद्वारे गुंतवणूकदारांसमोर आपल्या कल्पना मांडून त्या प्रत्यक्षात आणण्यासाठी लागणारा निधी मिळविण्याची संधी मिळेल. त्याचबरोबर स्टार्टअपच्या जगात सहभागी होण्यासाठी आणि स्वत:मध्ये नेतृत्व गुण विकसित करण्यासाठी महोत्सवात ‘स्टुडंट स्टार्टअप इंटर्नशिप’ची संधी उपलब्ध होईल.

या महोत्सवाबाबत अधिक माहितीसाठी भ्रमणध्वनी क्रमांक ८८५०१२२०७१ आणि ८८०५५४७५५ अथवा bec.coep@gmail.com ई-मेलवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: pune startup fest start at saturday