#PuneStation सुविधा नावालाच

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 डिसेंबर 2018

पुणे - मध्य रेल्वेच्या पुणे स्थानकावर बॅग तपासणी स्कॅनर, सरकता जिना, बॅटरी ऑपरेटेड कार, बॉटल क्रशिंग युनिट, मेटल डिटेक्‍टर आदी अनेक सुविधा फक्त नावालाच आहेत. प्रवासी या सुविधांपासून कोसो दूर असल्याचे चित्र येथे पाहावयास मिळत आहे.

पुणे - मध्य रेल्वेच्या पुणे स्थानकावर बॅग तपासणी स्कॅनर, सरकता जिना, बॅटरी ऑपरेटेड कार, बॉटल क्रशिंग युनिट, मेटल डिटेक्‍टर आदी अनेक सुविधा फक्त नावालाच आहेत. प्रवासी या सुविधांपासून कोसो दूर असल्याचे चित्र येथे पाहावयास मिळत आहे.

रेल्वे प्रशासनाने लाखो रुपये खर्च करून स्थानकामध्ये सुरक्षितता आणि सुविधेच्या अनेक यंत्रणा बसविल्या आहेत. मात्र, यातील बहुतांश सुविधा उपलब्ध नसल्याचे दिसून येते. काही दिवसांपूर्वी स्थानकातच पोलिस निरीक्षकावर गोळीबार झाला, तरी तेथे सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्यात आल्या नाही. स्थानकातील पाण्याच्या टाकीत नुकताच मृतदेह सापडला होता. त्यामुळे सुविधांचा व आरोग्याचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. या स्थानकात दररोज सुमारे एक लाख प्रवासी येतात. येथे सुविधांसाठी निधीही उपलब्ध आहे. परंतु, प्रत्यक्षात कार्यवाही होताना दिसत नाही.

बॅग तपासणी मशिन बंद
स्थानकाच्या मुख्य द्वारावर असणारे बॅग तपासणी स्कॅनर हे मशिन दोन महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे स्थानकामध्ये येणाऱ्या प्रवाशांच्या बॅगा तपासल्याच जात नाहीत.

बॅटरी ऑपरेटेड कार पडून
अपंग, ज्येष्ठ नागरिक आणि गर्भवतींना रेल्वे स्थानकावर संबंधित प्लॅटफॉर्मवर रेल्वेच्या डब्यापर्यंत पोचण्यासाठी लाखो रुपये खर्च करून बॅटरी ऑपरेटेड कारची खरेदी केली. मात्र, ती कारही सहा महिन्यांपेक्षा अधिक काळापासून धूळ खात पडून आहे.

मेटल डिटेक्‍टर आहे; पण... 
स्थानकात दररोज हजारो प्रवाशांची ये-जा असताना फक्त एका मेटल डिटेक्‍टरच्या माध्यमातून स्थानकाची सुरक्षा तपासणी केली जात आहे. हे मेटल डिटेक्‍टरही बहुतांश वेळा बंदच असते. तसेच, त्यामध्ये काही संशयास्पद आढळले, तरी चौकशी करण्यासाठी तेथे कोणीही उपलब्ध नसते.

बॉटल क्रशिंग मशिन ठप्प
स्वच्छ भारत अभियानामध्ये रेल्वेने मोठ्या जोमाने सहभाग घेत स्वच्छतेची अनेक उपकरणे रेल्वे स्थानकावर बसविण्याचे काम केले. त्यातील बॉटल क्रशिंग मिशनचा समावेश आहे. मात्र, तीन महिन्यांपासून ते मशिन बंद पडलेले आहे.

जिना काही सरकेना
दररोज हजारो नागरिक या स्थानावरून प्रवास करतात. मात्र, येथील एकमेव सरकता जिना बंद आहे. तसेच, नवीन पुलावरून दोन्ही बाजूने प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी आणि प्लॅटफॉर्म एक आणि दोनवर उतरण्यासाठी प्रत्येकी दोन सरकते जिने बसविण्याचे काम सहा महिन्यांपासून सुरू आहे. मात्र, काम पूर्ण झाले नाही. हे सहा एस्केलेटर सहा महिन्यांपासून स्थानकाच्या आवारातच पडून आहेत.

नवीन पुलावरील एस्केलेटरचे काम जानेवारी २०१९ पर्यंत पूर्ण होईल. तसेच, बॅग तपासणी मशिन लवकरात लवकर सुरू करण्यात येईल. बॅटरी ऑपरेटर कार बाह्य कंपनी, संस्थांकडून चालविली जाते. त्यासाठी प्रशासन अशा संस्थेच्या शोधात आहे. बॉटल क्रशिंग मशिनमध्ये नागरिकांनी बॉटल व्यतिरिक्त दुसऱ्या वस्तू टाकल्याने ती खराब झाली आहे. रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांच्या सोयी-सुविधांना प्राधान्य 
देण्यात येईल.
- मनोज झंवर, जनसंपर्क अधिकारी 

जनतेच्या लाखो रुपयांची उधळपट्टी करून रेल्वे प्रशासनाने स्थानकात बसविलेल्या मशिन नेहमीच बंद पडलेल्या असतात. तसेच, स्थानकाची सुरक्षा वाऱ्यावर आहे. स्थानकामध्ये नुकताच गोळीबार होऊनही प्रशासन सुरक्षेबाबत गंभीर नाही.
- हर्षा शहा, अध्यक्ष, रेल्वे प्रवासी ग्रुप

रेल्वे प्रशासन प्रवाशांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करीत आहे. प्रशासनाने सुरक्षिततेच्या यंत्रणा लवकर सुरू कराव्यात. स्थानकातील एस्केलेटर सतत बंद असते. अनेक सुविधेच्या यंत्रणा फक्त नावालाच आहेत.
- दिलीप सारडा, प्रवासी

Web Title: Pune Station Amenity Issue