पुण्यात ‘स्ट्रीट क्राइम’ मध्ये वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chain-Snaching

पुणे शहरात नागरिकांना अडवून पैसे, मोबाईल, सोनसाखळी (चेन स्नॅचिंग) हिसकावून नेण्याच्या घटना दररोज घडत आहेत. काही ठिकाणे ही स्नॅचिंगची ‘हॉट स्पॉट’ बनली आहेत.

Street Crime : पुण्यात ‘स्ट्रीट क्राइम’ मध्ये वाढ

पुणे - वाघोली येथील नगर रस्त्यावरील साई कॉम्प्लेक्स... १६ फेब्रुवारी रोजी रात्री पावणेदहाची घटना. एक ५२ वर्षीय महिला त्यांच्या घरी परतत होती. त्यावेळी स्पोर्टस बाइकवर आलेल्या चोरट्यांनी या महिलेचे तीन तोळ्याचे सोन्याचे गंठण हिसकावून नेले. अन्य एका घटनेत प्रदीप जगताप हे २८ जानेवारी रोजी रात्री मित्रासोबत नगर रस्त्यावरील एका हॉटेलसमोर उभे होते. त्यावेळी चोरट्यांनी प्रदीप यांचा मोबाईल, घड्याळ जबरदस्तीने हिसकावून घेतले. पोलिसांत तक्रार दिल्यास सोडणार नाही, असा दम भरून चोरटे पसार झाले...या गुन्ह्यात विमानतळ पोलिसांनी दोघा आरोपींना अटक केली आहे.

शहरात नागरिकांना अडवून पैसे, मोबाईल, सोनसाखळी (चेन स्नॅचिंग) हिसकावून नेण्याच्या घटना दररोज घडत आहेत. काही ठिकाणे ही स्नॅचिंगची ‘हॉट स्पॉट’ बनली आहेत. पोलिस गस्त असतानाही नागरिकांना लुटण्याचे प्रकार घडत आहेत. काही गुन्ह्यांमध्ये पोलिस रेकॉर्डवरील नसलेल्या आणि पहिल्यांदाच गुन्हा करणाऱ्यांचा समावेश आहे, पोलिसांसाठी ही चिंतेची बाब बनली आहे.

आठवडाभरातील जबरी चोरीच्या घटना

१) सिंहगड रस्ता- १४ फेब्रुवारी - आंबेगाव येथील वैभव बोराडे यांना चोरट्यांनी शस्त्राचा धाक दाखवून एक हजार रुपये काढून घेतले.

२) सिंहगड रस्ता - १६ फेब्रुवारी- चोरट्यांनी आनंदनगर येथील ५० वर्षीय महिलेचे अडीच तोळ्याचे मंगळसूत्र हिसकावून नेले

३) कोंढवा- १६ फेब्रुवारी- इस्कॉन चौकात पीएमपी चालक बालाजी घुगे यांना पत्ता विचारण्याच्या बहाण्याने मोबाईल हिसकावून घेतला.

४) विमानतळ - १७ फेब्रुवारी- पुणे-नगर रस्त्यावर प्रदीप जगताप या तरुणाला मारहाण करून मोबाईल आणि घड्याळ काढून घेतले.

५) लोणीकंद- १७ फेब्रुवारी- पुणे- नगर रस्त्यावर एका महिलेचे सोन्याचे गंठण हिसकावून नेले

६) मुंढवा - १७ फेब्रुवारी- केशवनगर येथील ६३ वर्षीय महिलेचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून नेले

७) बंडगार्डन- १८ फेब्रुवारी- अक्षय सातपुते या तरुणाला लाकडी दांडक्याने मारहाण करून पाचशे रुपये काढून घेतले.

८) चंदननगर- १९ फेब्रुवारी- खराडी येथे चोरील सोसायटीसमोर चोरट्यांनी विजयश्री बोराडे या तरुणाचा मोबाईल हिसकावून नेला.

९) हडपसर -१९ फेब्रुवारी- झेड कॉर्नर येथे मोबाईलवर बोलत असलेल्या प्रथमेश कोटकर याचा मोबाईल हिसकावून चोरटे पसार.

१०) चंदननगर- २० फेब्रुवारी- खराडी येथील फॉरेस्ट काउंटी गेटजवळ अखिल रेड्डी या तरुणाचा मोबाईल हिसकावून नेला.

‘स्ट्रीट क्राइम’ रोखण्यासाठी शहरात दररोज सायंकाळी ५ ते ९ या कालावधीत पोलिसांकडून पायी गस्त (फूट पेट्रोलिंग) करण्यात येत आहे. पोलिस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांची तपासणी करून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली जात आहे. सोनसाखळी आणि मोबाईल हिसकावून नेण्याचे गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाणही तुलनेत अधिक आहे.

- सुनील पवार, सहायक पोलिस आयुक्त, गुन्हे शाखा-१

आईसोबत रस्त्याने पायी जात असताना चोरट्यांनी मोबाईल हिसकावून नेला होता. डिसेंबर २०२२ मध्ये ही घटना घडली होती. याबाबत मोबाईल चोरीची ऑनलाइन तक्रार नोंदवली होती. सायबर पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी फोन करून तुमचा मोबाईल सापडला आहे. एफआयआर दाखल करून याबाबतची प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगितले आहे.

- अखिल रेड्डी, फिर्यादी, चंदननगर

टॅग्स :punecrimeChain Snatching