स्वाती नक्षत्रातील दीर्घिकेचे रहस्य उलगडले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Galaxy

रात्रीच्या आकाशात सर्वाधिक प्रकाशमान असलेल्या नक्षत्रांपैकी एक म्हणजे ‘स्वाती’ तारकासमूह. यातील ‘टीकप’ नावाच्या दीर्घिकेसंबंधी एक महत्त्वाचे रहस्य उलगडले.

Galaxy : स्वाती नक्षत्रातील दीर्घिकेचे रहस्य उलगडले

पुणे - रात्रीच्या आकाशात सर्वाधिक प्रकाशमान असलेल्या नक्षत्रांपैकी एक म्हणजे ‘स्वाती’ तारकासमूह. यातील ‘टीकप’ नावाच्या दीर्घिकेसंबंधी एक महत्त्वाचे रहस्य उलगडले असून, केंद्रकात असलेल्या महाकाय कृष्णविवारातून निघणाऱ्या ‘जेट्स’मुळे (प्रखर झोत) त्या दीर्घिकेला आकार प्राप्त झाल्याचे समोर आले आहे.

स्पेनच्या खगोलशास्त्रज्ञ डॉ. ॲनिलिस ऑडिबर्ट आणि डॉ. क्रिस्टिना आल्मेडा यांच्यासह पुण्यातील आंतरविद्यापीठीय खगोलशास्र आणि खगोलभौतिक केंद्रातील (आयुका) पीएच.डी.ची विद्यार्थीनी एम.मिनाक्षी आणि प्रा. डॉ. दिपांजन मुखर्जी यांनी हे संशोधन केले आहे. चिली देशातील अटाकाम लार्ज मिलीमीटर अरे (अल्मा) दूर्बिणीच्या सहाय्याने केलेले हे संशोधन ‘द जर्नल ॲस्ट्रोनॉमी ॲन्ड ॲस्ट्रोफिजिक्स’मध्ये प्रकाशित झाले आहे. सक्रिय दीर्घिकीय केंद्राबद्दलचे (ॲक्टीव्ह गॅलक्टीक न्यूक्लीया) वर्तनाबद्दलचे हे नवे आकलन जगासमोर आले आहे.

संशोधनाची पार्श्वभूमी -

जेंव्हा एखाज्या दीर्घिकेच्या प्रचंड गुरूत्वाकर्षणामुळे भोवतालचे पदार्थच केंद्रकात लोटले जातात. तेंव्हा प्रचंड वस्तूमानातून प्रचंड वेगाने विद्युत चूंबकीय प्रारणे (जेट्स) उत्सर्जित होतात. जो विश्वातील सर्वात तेजस्वी स्रोत मानला जातो. दीर्घिकेच्या निर्मितीमध्ये अशा जेट्सची भूमिका महत्त्वपूर्ण ठरते.

नवे संशोधन -

मध्यवर्ती कृष्णविवरातून बाहेर पडणाऱ्या रेडिओ जेट्समुळे दीर्घिकेतील पदार्थ बाहेर फेकले जातात. परंतू, सगळ्याच रेडिओ जेट्समधून समानपद्धतीने पदार्थ बाहेर फेकले जात नाही. मात्र, शास्त्रज्ञांच्या या नव्या संशोधनात ‘टीकप’ दीर्घिकेबद्दल आश्चर्यकारक निष्कर्ष हाती लागले आहे. अधिकृत निवेदनात डॉ. क्रिस्टिना सांगतात, ‘‘लहान रेडिओ जेट्सचा फार काही परिणाम दीर्घिकेवर होत नसल्याचे आजवर मानले जात होते. शांत दिसणाऱ्या दीर्घिकेतही रेडिओ जेट्समुळे तारा निर्मितीच्या प्रक्रियेवर परिणाम होतो. या संशोधनातील आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे. रेडिओ जेट्सच्या दोन्ही टोकांच्या दिशेने परिणाम होण्या ऐवजी काटकोनात लंबकार परिणाम दिसत आहे.’’

‘टीकप’ दीर्घिकेबद्दल..

- पृथ्वीपासूनचे अंतर - १.३ अब्ज प्रकाशवर्ष

- दीर्घिकेचा प्रकार - रेडिओ लहरींचे उत्सर्जन करणारी शांत दीर्घिका

कमी शक्तीच्या रेडिओ जेट्सचा दीर्घिकेवर नगण्य प्रभाव असल्याचे मानले जात होते. परंतु आमचे संशोधन असे दर्शवितात की रेडिओ दीर्घिकांच्या बाबतीत जेटमुळे वस्तुमान, धातूंचे पुनर्वितरण घडत आहे. पर्यायाने पुढील तारा निर्मितीची प्रक्रिया रोखली जाते.

- क्रिस्टिना रामोस आल्मेडा, खगोलशास्त्रज्ञ

टॅग्स :punemystery