पुणे : तळेगावात अवजड ट्रेलर इमारतीत घुसून उलटला

अपघातामुळे तीन तास तळेगाव बुडाले अंधारात
Pune Talegaon accident heavy truck crushed to building power cut for three hours
Pune Talegaon accident heavy truck crushed to building power cut for three hourssakal

तळेगाव : तळेगाव-चाकण महामार्गावर सेवाधाम हॉस्पिटलसमोर रविवारी मध्यरात्रीनंतर दीडच्या सुमारास मुंबईकडून चाकणकडे पत्रे घेऊन जाणारा भरधाव अवजड ट्रेलर एका ट्रकला धडक देऊन इमारतीत घुसून उलटला. चेंबलेल्या ट्रकच्या केबिनमध्ये दबलेल्या जखमी चालकाला बाहेर काढण्यास तब्बल तीन तास लागले. सुदैवाने जिवित हानी झाली नसली तरी दोन दुकाने आणि रहीवासी इमारतीचे मोठे नुकसान झाले.

चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे वडगाव फाट्याहून चाकणकडे जाणारा एमएच-४६ बीएम-६५७६ या क्रमांकाचा भरधाव ट्रेलर विरुद्ध लेनवर जाऊन फलकेवाडीतील एका इमारतीत घुसला.अपघातात विजेचे खांब वाकल्यामुळे वीजवाहक तारा तुटून रस्त्यावर पडल्या. तळेगाव स्टेशन विभागातील वीजपुरवठा जवळपास तीन तासाहून अधिक काळ खंडीत झाला.अपघातात सदर इमारतीच्या वरच्या मजल्यावर जाणारा लोखंडी जिना तुटल्याने तेथील रहीवाशांनी घाबरुन एकच कल्ला केला. ट्रेलर धडकल्यानंतर मोठा आवाज होऊन वीजपुरवठा खंडीत झाल्याने झोप उडालेल्या आजूबाजूच्या नागरिकांनी अपघातस्थळी धाव घेतली. वीजवाहक तारा आणि खांब तुटल्याने,थिनग्या उडून ट्रेलरच्या फुटलेल्या टाकीतले डिझेल पेट घेऊन आग लागण्याची शक्यता होती.मात्र नागरिकांनी प्रसंगावधान राखून पाणी फवारल्याने मोठा अनर्थ टळला.

वेळेवर क्रेन उपलब्ध न झाल्यामुळे अपघातग्रस्त ट्रेलर बराच काळ निम्म्या रस्त्यावर आडवा पडून होता. तळेगाव दाभाडे नगरपरिषद अग्निशमन दलाच्या सहकार्याने, उलटलेल्या ट्रेलरच्या खाली दबलेल्या केबिनमधे अडकलेल्या चालकाचे बचावकार्य पहाटेपर्यंत चालू होते.अखेर क्रेन आल्यानंतर पहाटे चारच्या सुमारास,ट्रेलर सुलटा करुन जखमी चालकास सुरक्षित बाहेर काढून,रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.

अपघातातील दुसरा ट्रक रस्त्यावर तिरपा झाल्याने,दोन्ही बाजूकडील वाहतूक बराच काळ ठप्प झाली होती.चाकण दिशेला माळवाडीच्या पुढे तर वडगाव दिशेला थेट मुंबई पुणे महामार्गापर्यत दुतर्फा मोठी वाहतुक कोंडी झाली होती. अपघाताची माहीती कळताच तळेगाव दाभाडे पोलीस, वाहतूक शाखा आणि महावितरण कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर उपाययोजना करुन वाहतूक सुरळीत केली. दुभाजकाचा इशारा फलक अथवा रिफ्लेक्टर नसल्याने येथे वारंवार अपघात होतात.नेमके याच ठिकाणी संथगतीने पाईपलाईनचे काम चालू असल्याने जेमतेम एकच वाहन जाईल एवढा रस्ता शिल्लक आहे.या अपघातामुळे तळेगाव-चाकण महामार्गाच्या विस्तारीकरणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com