मेट्रोवर आता ‘पुणेरी टॅलेंट’ची पाटी

सोमवार, 7 मे 2018

पुणे - देशातील मेट्रो प्रकल्पांचा विस्तार वेगाने होत असतानाच आता त्यासाठी कुशल मनुष्यबळाची कमतरता भेडसावू लागली आहे. त्यावर शिक्षणाच्या माहेरघरातून मार्ग शोधण्यात यश आले आहे. अभियांत्रिकीबरोबरच विज्ञान शाखेच्या पदवीधरांनाही आता ‘मेट्रो’ प्रकल्पांत करिअर करण्याची संधी मिळणार आहे. त्यासाठीचा खास अभ्यासक्रम येत्या शैक्षणिक वर्षात येथे सुरू होत आहे. त्यामुळे देशातील मेट्रो प्रकल्पांना तंत्रज्ञांची रसद पुण्यातून मिळणार आहे.    

मेट्रो आणि रस्ते बांधणीला पूरक धोरण केंद्राने जाहीर केले आहे. मात्र अभियंते किंवा विज्ञान पदवीधरांमध्ये मेट्रोसाठीचे पूरक कौशल्य नसल्यामुळे कुशल मनुष्यबळ उपलब्ध होण्यावर मर्यादा आल्या आहेत. स्पर्धा परीक्षांतून रेल्वेकडे जाणाऱ्या अभियंत्यांची संख्याही मर्यादित आहे. त्यामुळे केंद्रीय नगर विकास मंत्रालयाने, प्रत्येक मेट्रोने प्रशिक्षण संस्था सुरू करावी; अथवा मान्यताप्राप्त विद्यापीठांनी यासाठीचा अभ्यासक्रम सुरू करण्याची सूचना केली आहे. त्यानुसार पुण्यातील विश्‍वकर्मा अभिमत विद्यापीठात (व्हीआयटी) संचालक भारत अग्रवाल यांनी पुढाकार घेतला आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून व्हीआयटीमध्ये ‘मेट्रो- रेल्वे टेक्‍नॉलॉजी’ हा एक वर्षांचा पदविका अभ्यासक्रम सुरू होणार आहे. त्यासाठी स्थापन केलेल्या सल्लागार मंडळात हैदराबाद मेट्रोचे माजी प्रमुख विवेक गाडगीळ, रेल्वेच्या दक्षिण विभागाचे माजी महाव्यवस्थापक डी. एन. माथूर, कोकण रेल्वेचे माजी प्रमुख डॉ. के. के. गोखले आणि रेल्वेतज्ज्ञ दिलीप भट यांचा समावेश आहे. 

या अभ्यासक्रमासाठी अभियांत्रिकी आणि विज्ञान शाखेचे पदवीधर पात्र असतील. मेट्रो, रेल्वेशी संबंधित ट्रॅक डिझाइनिंग, सिग्नलिंग, टेलिकम्युनिकेशन, ऑपरेशन्स अँड मेंटेनन्स आदी विषयांतील आधुनिक शिक्षण तज्ज्ञ देणार आहेत. त्यासाठी विविध मेट्रो प्रकल्पांची पाहणी होणार असून, त्यात संस्थेच्या माध्यमातून नोकरीच्या संधीही उपलब्ध होतील, अशी माहिती दिलीप भट यांनी दिली. 

देशातील मेट्रो 
दिल्ली, हैदराबाद, बंगळूर, कोलकाता, चेन्नई, मुंबई, पुणे, नागपूर, कोची, जयपूर, लखनौ, अहमदाबाद, इंदोर, भोपाळ, वाराणसी, विशाखापट्टण आदी शहरांत मेट्रोचे काम सुरू 
१० लाखांपेक्षा जास्त लोकसंख्येच्या शहरात मेट्रो सुरू होणार
देशभरात मेट्रोचे ५५० कि.मी.चे काम सुरू; ८००० कि.मी.चे उद्दिष्ट
एक किलोमीटरसाठी ३५-४५ मनुष्यबळ हवे; त्यात ७० टक्के तंत्रज्ञ 
किमान २२ हजार कुशल तंत्रज्ञांची आवश्‍यकता

Web Title: Pune Talent on the Metro