पुण्यातील शिक्षक पुन्हा 'कोरोना ड्युटी'मध्ये बिझी

Corona-Virus
Corona-Virus

पुणे - मंचरजवळील लौकी या आपल्या मूळगावाहुन तब्बल ७२ किलोमीटरचा प्रवास करत भीमाशंकरजवळ असणाऱ्या निगडाळे गावातील शाळेत जाणारे शिक्षक संतोष थोरात हे आजही शाळा बंद असताना हा प्रवास करत आहेत. तब्बल पावणे दोन तासांचा प्रवास करत ते कामाच्या (म्हणजेच शाळेच्या) ठिकाणी पोचतात. मग येथून सुरू होते 'कोरोना ड्युटी'.

होय, विद्यार्थ्यांना ऑनलाइन किंवा ऑफलाइन शिकवत असताना थोरात यांच्यासारख्या राज्यातील हजारो शिक्षकांना 'कोरोना ड्युटी' देखील करावी लागत आहे. कोरोनाच्या कामातून शिक्षकांना मुक्त करण्यात यावे, असे परिपत्रक अवघ्या काही दिवसांपूर्वी प्राथमिक शिक्षण संचालकांनी काढले होते. मात्र, आता त्यालाच फाटा देत शिक्षकांना आजही अशैक्षणिक कामात गुंतविले जात आहे. त्यात आता 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' मोहिमेतंर्गत सर्वेक्षणाच्या कामाचा भारही शिक्षकांवर पडला आहे. शहरासह ग्रामीण भागातील शिक्षकांना एकीकडे विद्यार्थ्यांना ऑनलाइन आणि ऑफलाइन शिक्षण देत असताना, दुसरीकडे मात्र विलगीकरण कक्षाची देखरेख करणे, घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणे अशी कामे लावल्याने त्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

विद्यार्थ्यांना शिकविण्याबरोबरच शिक्षक एकामागोमाग एक घराच्या दारात पोचत ऑक्सिमीटर आणि तापमापन उपकरणाच्या सहायाने घरातील प्रत्येकाची तपासणी करत आहेत. त्याशिवाय कोरोना ड्युटी सांभाळत त्याबाबतचा अहवाल रोजच्या-रोज संबंधित अधिकाऱ्यांना देणे, अशी कामे करताना हजारो शिक्षकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. 

कोरोना काळात शिक्षकांची अशैक्षणिक कामे -
- चेक पोस्ट : लॉकडाउन काळात गावा-गावात बाहेरुन येणाऱ्या नागरिकांची चौकशी करण्यासाठी, रस्त्यावरून फिरणाऱ्यांची, विनाकारण फिरणाऱ्यांना विचारणे, मास्क घेतले आहे की नाही पाहणे
- रेशन दुकानात थांबणे : लॉकडाऊन काळात मोफत धान्य वितरित करण्यात येत होते. त्यावेळी नागरिकांचे आधारकार्ड पाहणे, कुटुंबातील सदस्यांच्या संख्येप्रमाणे धान्य वितरित होते, की नाही पाहणे, त्यांचा अहवाल दररोज संध्याकाळी केंद्र प्रमुख, तलाठी यांना पाठविणे
- आयसोलेशन वॉर्डमधील कामे : आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल होणाऱ्या रूग्णांची नावे नोंदविणे, जेवण व्यवस्था पाहणे, रूग्णांच्या तक्रारी जाणून घेणे
- विलगीकरण कक्ष : बाहेर गावाहुन आलेल्या नागरिकांची नोंद ठेवणे, त्यांचे प्रत्यक्ष घरात विलगीकरण झाले असल्यास त्यांची विचारपूस करणे
- 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' अभियान : या अंतर्गत घरा-घरात जाऊन ऑक्सिमीटर, ताप तपासणी उपकरण याद्वारे तपासणी करणे, त्याची नोंद ठेवणे आणि काही लक्षणे आढळल्यास पुढील तपासणीसाठी पाठपुरावा करणे

कोरोना संदर्भातील कामे करून घेण्यासाठी अन्य पर्याय -
- स्वयंसेवक
- सामाजिक संस्था, संघटना
- स्वतःहून पुढाकार घेणारे तरूण
- आरोग्य मित्र

'कोरोनाच्या संकट काळात आम्ही सरकारसमवेत आहोत आणि नेहमीच सहकार्य राहिल. सरकारने दिलेल्या कामाला आमचा विरोध नाही, ती आमची जबाबदारी आहे. परंतु विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याबरोबरच शिक्षक ही कामे करत आहेत. त्यामुळे सरकारने शिक्षकांसाठी हॅण्डग्लोज, पीपीई किट अशा संरक्षण साहित्याचा पुरवठा करावा. तसेच शिक्षकांकरिता ५० लाख रुपयांचे सुरक्षा कवच लागू करावे."
- बाळासाहेब कानडे, माजी कार्याध्यक्ष, पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com