
ढगाळ वातावरण आणि पावसाचे सावट दूर होताच शहर आणि परिसरात कमाल तापमानाचा पारा वाढला आहे.
Pune Temperature : पुण्याचा पारा पुढील दोन ते तीन दिवस कायम राहणार चाळिशी दरम्यान
पुणे - ढगाळ वातावरण आणि पावसाचे सावट दूर होताच शहर आणि परिसरात कमाल तापमानाचा पारा वाढला आहे. सलग दोन दिवसांपासून शहरात परा ४० अंशाच्या दरम्यान नोंदले जात आहे. उन्हाचा ताप असाच कायम राहणार असून पुढील दोन ते तीन दिवस तापमान चाळीस अंशाच्या घरात असेल असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.
गुरुवारी (ता. ११) जिल्ह्यातील बऱ्याच ठिकाणी कमाल तापमान ४० अंश व त्यापेक्षा अधिक नोंदले गेले. कोरेगाव पार्क येथे कमाल तापमानाने ४४ अंश सेल्सिअस गाठले. शहरात ४१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून सरासरी पेक्षा तापमानात ३ अंशांनी वाढ झाली आहे. दरम्यान यंदाच्या उन्हाळी हंगामातील आतापर्यंत शहरातील हे सर्वाधिक कमाल तापमान ठरले आहे. तापमानात झालेल्या वाढीमुळे उन्हाच्या तीव्र झळांमुळे अक्षरशः अंगाची लाही लाही होत आहे. परिणामी दिवसा घराबाहेर पडणे सुद्धा नागरिकांना अवघड झाले आहे.
हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार शुक्रवारी (ता. १२) तापमानात आणखीन वाढ अपेक्षित असून रविवारपासून (ता. १४) शहरातील कमाल तापमानाचा पारा पुन्हा ४० अंशाच्या खाली येण्याची शक्यता आहे. पुढील आठवडाभर शहर आणि परिसरात निरभ्र वातावरण राहणार असल्याने उन्हाची स्थिती अशीच राहण्याची चिन्हे आहेत. नागरिकांनी मात्र उन्हामुळे आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन हवामानशास्त्र विभागाने केले आहे.
पुणे व परिसरातील कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
पुणे शहर : ४१
पाषाण : ४१.१
लोहगाव : ४१.२
चिंचवड : ४२.५
मगरपट्टा : ४१.७
कोरेगाव पार्क : ४४.४
हडपसर : ४२
एनडीए : ४०.५