पुण्यामध्ये किमान तापमानाची नोंद

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 मार्च 2019

पुणे - राज्यात सर्वांत कमी किमान तापमान पुण्यात नोंदले गेले आहे, त्यामुळे पुणे हे राज्यातील सर्वांत कमी तापमान असलेले शहर ठरले आहे. बंगालच्या उपसागरावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे उन्हाचा चटका कमी झाला असून, पहाटे गारठा वाढला आहे, अशी माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली. सोमवारी (ता. 25) मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्‍यताही वर्तविली आहे.

राज्यातील मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे राज्यात सर्वच भागांमध्ये किमान तापमानाचा पारा सरासरीपेक्षा कमी झाला. जळगाव, नाशिक, सांगली येथील कमाल तापमानाचा पाराही घसरला आहे. राज्यात फक्त अमरावती येथे कमाल तापमानाचा पारा 40 अंश सेल्सिअस नोंदला गेला. इतर सर्व प्रमुख शहरांमधील कमाल तापमान सरासरीच्या जवळपास किंवा त्यापेक्षा कमी असल्याचे निरीक्षण हवामान खात्यातर्फे नोंदविण्यात आले आहे.

पुण्यातही कमाल तापमानाचा पारा सरासरीपेक्षा 0.9 अंश सेल्सिअसने कमी होऊन 37.2 अंश सेल्सिअस नोंदला गेला. पुण्यात शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत किमान तापमानाचा पारा 2.2 अंश सेल्सिअसने कमी होऊन 14.2 अंश सेल्सिअस नोंदला गेला.

पश्‍चिम मध्य प्रदेश आणि परिसरावर चक्राकार वारे वाहत आहेत. या स्थितीपासून विदर्भ, तेलंगण आणि उत्तर कर्नाटकपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा (द्रोणीय स्थिती) सक्रिय आहे. ढगाळ आकाश आणि पावसाला पोषक वातावरणामुळे चाळिशी पार गेलेले विदर्भ, मराठवाड्यातील कमाल तापमान खाली घसरले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Temperature Decrease