esakal | पुणे: व्हीव्हीपॅट मशिनचा प्रश्‍न अधांतरी
sakal

बोलून बातमी शोधा

ईव्हीएम, व्हीव्हीपॅट

पुणे: व्हीव्हीपॅट मशिनचा प्रश्‍न अधांतरी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे: विधानसभा निवडणुकीमध्ये सर्व मतदान केंद्रांवर ‘ईव्हीएम’सोबत ‘व्हीव्हीपॅट’ (व्होटर व्हेरिफिएबल पेपर ऑडिट ट्रायल) हे मशिन जोडले होते. त्यामुळे ईव्हीएमवर मतदान केल्यानंतर ‘व्हीव्हीपॅट’च्या प्रिंटरवर मतदाराला आपण नोंदवलेले मत सात सेकंदांत समजत होते. मात्र, महापालिकेच्या निवडणुकीत हे मशिन राहणार की नाही, याबाबत प्रश्‍न निर्माण झाला आहे.

हेही वाचा: कुत्र्याचा राग मालकावर; कारची काच फोडून ४४ हजार लंपास

देशात २०१४ मधील लोकसभा निवडणुकांनंतर ‘ईव्हीएम’ मशिनच्या माध्यमातून निवडणूका घेण्यावर वाद निर्माण झाले होते. हा वाद न्यायालयातही गेला होता. त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदारांना आपण नेमके कोणाला मतदान केले, हे कळण्यासाठी ‘ईव्हीएम’बरोबर ‘व्हीव्हीपॅट’ मशिन उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार विधानसभा निवडणुकीत हे मशिन वापरण्यात आले. विविध निवडणुकीमध्ये ‘ईव्हीएम’च्या पारदर्शकतेबाबत प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले होते.

राजकीय पक्षांनी याविषयी विविध आरोप केले होते. काही जणांनी निवडणूक आयोगाकडे तक्रारी दाखल केल्या होत्या. तसेच, काही जणांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. या पार्श्‍वभूमीवर कोणाला मतदान केले याची माहिती मतदाराला मिळण्यासाठी व्हीव्हीपॅटवर दिलेले मत प्रिंट स्वरूपात दिसण्याची व्यवस्था निवडणूक आयोगाने केली.राज्य निवडणूक आयोगाकडून महापालिकेच्या निवडणूका घेतल्या जातात.

हेही वाचा: कर्जाला कंटाळून मुलीचा खून ; आई-वडिलांची आत्महत्या

मात्र, त्यांच्याकडे या मशिन उपलब्ध नाहीत. तसेच या मशिनचा वापर महापालिका निवडणुकीत केला जाणार की नाही, हे जाहीर केले नाही. जर या मशिनचा वापर करायचा झाला, तर त्या उपलब्ध करून द्याव्या लागणार

आहेत. महापालिका निवडणूकीसाठी राहिलेला कालावधी विचारात घेतला, तर याबाबतचा निर्णय होऊन त्यानुसार कार्यवाही सुरू होणे अपेक्षित होते. परंतु, अद्यापही आयोगाकडून कोणत्याही हालचाली न झाल्यामुळे महापालिका निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर होणार की नाही, याबाबत शंका निर्माण झाली आहे.

वाद टळतील-

महापालिकेच्या २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत ‘ईव्हीएम’ मशिनबरोबरच ‘व्हीव्हीपॅट’चा वापर केला नव्हता. निवडणुकीच्या निकालानंतर ‘ईव्हीएम’ मशिनवरून मोठा वाद झाला होता. महापालिकेच्या आगामी निवडणुकीत ‘व्हीव्हीपॅट’चा वापर झाला, तर निवडणुकीनंतरचे वाद टाळण्यास मदत होईल, अशी अपेक्षा अधिकाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

आगामी महापालिका निवडणुकीत ‘ईव्हीएम’सोबत ‘व्हीव्हीपॅट’ मशिन आवश्‍यक वाटत आहे. आपण केलेले मतदान प्रत्यक्षात कोणाला केले आहे, ते समजते. त्यामुळे बोगस मतदानाला निश्‍चित आळा बसू शकेल. - ज्योती सातव, गृहिणी

‘व्हीव्हीपॅट’द्वारे मतदानाची प्रिंट मिळत असल्याने योग्य उमेदवाराला आपण मत दिल्याची खात्री मतदाराला पटत असल्याने निवडणुकीवरचा मतदारांचा विश्‍वास दृढ होत आहे, त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केलेली ‘व्हीव्हीपॅट’ यंत्रणेची आवश्‍यकता आहे. - दिलीप लोणकर, उद्योजक

loading image
go to top