पुण्यात पर्यटनाला प्रचंड वाव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Historical place in pune

‘पुणे तिथे काय उणे’ असं म्हटलं जाणाऱ्या अन्‌ ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा असलेल्या पुण्याचे नाव जागतिक नकाशावर कोरले गेले.

Pune Tourism : पुण्यात पर्यटनाला प्रचंड वाव

पुणे - ‘पुणे तिथे काय उणे’ असं म्हटलं जाणाऱ्या अन्‌ ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा असलेल्या पुण्याचे नाव जागतिक नकाशावर कोरले गेले. पण ऐतिहासिक वास्तू, तीर्थक्षेत्र, शैक्षणिक परंपरा लाभलेल्या पुण्यात पर्यटनाला प्रचंड वाव आहे. पुणे शहरासह जिल्ह्यातील विविध पर्यटन स्थळांचा स्वतंत्र सर्वंकष पर्यटन विकास आराखडा असावा, अशी मागणी पर्यटन क्षेत्रातील तज्ज्ञांकडून होत आहे, त्यामुळे स्मार्ट सिटी, मेट्रो सिटी असणारे पुणे आता ‘टुरिझम सिटी’ म्हणून नावारूपाला यावे, याच्या प्रतीक्षेत पुणेकर आहेत.

स्मार्ट सिटी, मेट्रो सिटीच्या दिशेने वाटचाल करताना शहराच्या सांस्कृतिक, ऐतिहासिक वारशांचे कोंदण लाभलेल्या पुण्याचा पर्यटनातही नावलौकिक सर्वदूर पोचविण्यासाठी पुणे महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पुणे महानगर क्षेत्र प्राधिकरण (पीएमआरडीए), पुणे जिल्हा परिषद, जिल्हा प्रशासन यांनी एकत्रित येऊन प्रयत्न करण्याची गरज आहे. महाराष्ट्रात दरवर्षी साधारणतः १० कोटी नागरिक पर्यटनाच्या निमित्ताने येतात. यात मुंबई, नगर यानंतर पुणे जिल्ह्याचा क्रमांक लागतो.

राज्यातील पर्यटनासंदर्भात झालेल्या सर्वेक्षणानुसार दरवर्षी साधारणतः ८० लाखांहून अधिक नागरिक पुण्याला भेटी देतात. त्यातही जानेवारी ते जून दरम्यान पुण्यात भेट देण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या लक्षणीय आहे. या सर्वेक्षणानुसार दरवर्षी दोन लाख ८० हजारांहून अधिक परदेशी पर्यटक पुण्याला भेट देतात. पुणे जिल्ह्यात एकूण ९० लाख ६० हजाराहून अधिक पर्यटक येत असल्याची नोंद आहे. या पर्यटकांच्या संख्येत वाढ व्हावी आणि त्यांना अधिकाधिक चांगल्या सुविधा मिळाव्यात, यासाठी एकत्रित येऊन पावले उचलणे गरजेचे असल्याचे मत तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.

हे करणे शक्य

सांस्कृतिक पर्यटन : पुणे फेस्टिव्हल, पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव आदी सांस्कृतिक महोत्सवांना केंद्रस्थानी ठेवून पर्यटन विकास शक्य

धार्मिक पर्यटन : शहराबरोबरच जिल्ह्यातील तीर्थक्षेत्रे आणि विविध धार्मिक स्थळांना भेटी देण्याच्या दृष्टिकोनातून नियोजन

शैक्षणिक पर्यटन : विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासह शंभराहून अधिक वर्ष जुन्या शैक्षणिक तसेच इतर संस्थांना भेटी

विज्ञान पर्यटन : आयुका, आयसर, पिंपरी-चिंचवड सायन्स पार्क, विविध संशोधन संस्था, खोडद येथील महाकाय दुर्बिणी, विविध संग्रहालये येथील पर्यटन

हेरिटेज वॉक : शहरातील ऐतिहासिक वास्तू, मुळा-मुठा नदीकाठ, पाषाण तलाव यांसह जिल्ह्यातील ऐतिहासिक वास्तू, गड - किल्ले, लेण्यांची सफर

पर्यावरण पर्यटन : पक्षी निरीक्षण, वनस्पती निरीक्षण, मॉन्सून टुरिझम (ताम्हिणी)

‘पुणे दर्शन बससेवे’च्या कक्षा रुंदावण्याची प्रतीक्षा!

दरवर्षी पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिडेटच्या (पीएमपीएमएल) ‘पुणे दर्शन’ बससेवेचा लाभ जवळपास ११ हजारांहून अधिक पर्यटक घेतात. ‘पुणे दर्शन’ बससेवा ही सध्या केवळ २५ किलोमीटरचे अंतर पार करत १८ पर्यटन स्थळांना भेटी देते. परंतु ‘पुणे दर्शन’मध्ये जिल्ह्यातील पर्यटनस्थळापर्यंत पोचण्यासाठी ‘पीएमपीएमएल’कडून प्रयत्न व्हावेत, अशी अपेक्षा तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.

‘टायगर पॉइंट’ला प्रतीक्षा ‘स्कायवॉक’ची

पुणे जिल्हा परिषदेच्या जिल्हा नियोजनानुसार लोणावळा येथील टायगर पॉइंट येथे ‘स्कायवॉक’ या नावीन्यपूर्ण पर्यटन उपक्रमाचे नियोजन आहे. जिल्हा नियोजनात पुणे ग्रामीण पर्यटन विकास आराखड्यानुसार (जून २०२१) ‘प्रारूप ए’, ‘प्रारूप बी’, ‘प्रारूप सी’ आणि ‘प्रारूप डी’ची आखणी केली होती. त्यासाठी अपेक्षित खर्च अनुक्रमे २३ कोटी, ३२ कोटी, ३४ कोटी आणि ३६ कोटी रुपये इतका आहे.

आकडे बोलतात

४०६ - एकूण पर्यटन स्थळांची संख्या

३७८ - उत्तम पर्यटनस्थळे असलेल्या ग्रामपंचायत

१८२ - पीएमआरडीए अंतर्गत पर्यटनस्थळे असलेल्या ग्रामपंचायत

पर्यटन स्थळांची विविधता

२१० - तीर्थक्षेत्र

४१ - पर्यटन केंद्र

३४ - धरणे

२४ - निसर्गरम्य ठिकाणे

१८ - किल्ले

१८ - पिकनिक पॉइंट

१३ - धबधबे

२ - अभयारण्ये

पुण्याच्या शहरी भागाला लागून १०० ते १५० किलोमीटरच्या अंतरात खूप पर्यटनस्थळे आहेत. ग्रामीण भागाच्या विकासासाठी पर्यटनस्थळे अनेकदा महत्त्वाची भूमिका बजावतात. पुण्याला निसर्गसंपदा भरभरून लाभली आहे, त्याचा पर्यटनाच्यादृष्टीने विचार करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर पर्यटनस्थळांच्या ठिकाणी रस्ते, वीज उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला पाहिजे.

- बाळासाहेब बराटे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कृषी आणि ग्रामीण पर्यटन सहकारी महासंघ (मार्ट)

पुणे हे केवळ ‘पर्यटन शहर’च नव्हे तर पर्यटनाचे मुख्य केंद्र बनू शकते. धार्मिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक, साहसी, दुर्गभ्रमंती अशा विविध प्रकारच्या पर्यटनासाठी पोषक वातावरण पुण्यात आहे. प्रत्येक क्षेत्राचा विचार केला तरी क्षेत्रनिहाय पर्यटन प्रकल्प राबविता येतील. त्यासाठी प्रशासकीय आणि राजकीय व्यवस्थेने एकत्रितपणे पर्यटन क्षेत्रातील तज्ज्ञांशी बोलून पुढाकार घेतला पाहिजे.

- नीलेश भन्साळी, संचालक, ट्रॅव्हल एजंट असोसिएशन पुणे