#PuneTraffic पादचारी असुरक्षित

Pune-Traffic
Pune-Traffic

पुणे - गेल्या आठवड्यात कात्रज बाह्यवळणावरील पेट्रोल पंपाजवळ ४५ वर्षीय पादचारी रस्ता ओलांडताना कंटेनरची धडक बसून मृत्युमुखी पडला. दुसऱ्या घटनेत विश्रांतवाडी येथील फुलेनगर बसथांब्याजवळ रहीमतुल्ला मुल्ला (वय ८७) यांचा भरधाव पीएमपी बसच्या धडकेने मृत्यू झाला. ४५ वर्षीय व्यक्ती असो किंवा मुल्ला यांच्यासारखे ज्येष्ठ नागरिक... बेदरकार वाहनचालकांमुळे पादचाऱ्यांवर जीव गमाविण्याची वेळ येत आहे, तर कित्येकांच्या वाट्याला अपंगत्वाचे जगणे येत आहे.

प्रत्येक दिवशी शहराच्या वेगवेगळ्या भागात होणाऱ्या अपघातांमध्ये पादचाऱ्यांना भरधाव वाहनांची धडक बसून मृत्यूला सामोरे जावे लागत आहे. कधी भरधाव दुचाकीची धडक बसून, तर कधी नियंत्रण सुटलेल्या बस, ट्रकची धडक बसून. स्वतःची काहीही चूक नसताना रस्त्याच्या कडेने किंवा पदपथावरून जाणारे पादचारी भरधाव वाहनांमुळे घडणाऱ्या अपघातात बळी ठरत आहेत. शहरातील अंतर्गत रस्त्यांबरोबरच मुख्य रस्त्यांवरूनही पादचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागत असल्याची सद्यःस्थिती आहे.

शहराच्या मध्यवर्ती भागामधील रस्त्यांवर पथारी व्यावसायिक, पार्किंग, खाद्यपदार्थांचे स्टॉल्स यांसारख्या विविध कारणांमुळे पादचाऱ्यांना रस्त्याच्या कडेने चालण्याशिवाय पर्याय नाही. प्रमुख रस्त्यांवर पदपथ असूनही नसल्यासारखे आहेत. बहुतांश पदपथ व रस्ते समान पातळीवर आहेत. त्यामुळे दुचाकी-चारचाकी वाहने सर्रासपणे पदपथावर चढून जात आहेत. त्यामुळे पदपथ असूनही पादचाऱ्यांना रस्त्याचाच आधार घ्यावा लागतो.

वाहनांच्या धडकेमुळे झालेली हानी
२०१७  - मृत्यू १०६, जखमी १७२
२०१८ - मृत्यू ९०, जखमी १४८

शहराच्या वेगवेगळ्या भागांतील पदपथांची उंची वाढविण्याबाबत आम्ही महापालिकेबरोबर पत्रव्यवहार केला आहे. बऱ्याच ठिकाणी पदपथ आणि रस्ता समान पातळीवर असल्याने पादचाऱ्यांची अडचण होते. त्यामुळे रस्त्यांची उंची वाढविणे, बोलार्डस्‌ बॅरिकेडस्‌ लावण्याचे काम केले जाणार आहे. त्यामुळे पादचाऱ्यांना पदपथांवरून चालता येईल. परिणामी अपघातांमधील पादचारी मृत्यूचे 
प्रमाणही घटेल.
- तेजस्वी सातपुते, पोलिस उपायुक्त, वाहतूक शाखा.

माझे वडील रस्ता ओलांडत असताना भरधाव बसचालकाने धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला. वाहनचालकांनी रहदारीच्या ठिकाणी वाहनांची गती कमी ठेवणे अपेक्षित आहे. तसे घडत नाही. अशा चालकांवर कारवाई होत नाही. पादचाऱ्यांना व्यवस्थित रस्ता ओलांडता यावा, यासाठी सिग्नल, रिफ्लेक्‍टर, सुरक्षारक्षक यांसारख्या उपाययोजनांची गरज आहे. 
- शफी मुल्ला, रहीमतुल्ला मुल्ला यांचा मुलगा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com