
Pune News : कोंडी सुटणार नाही तर मग अडीचशे कोटीचा खर्च कशासाठी ?
पुणे : वेताळ टेकडीवरून बालभारती - पौड रस्ता दरम्यान अडीचशे कोटी रुपये खर्च करून रस्ता केला तरीही विधी महाविद्यालय रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी होणार असे महापालिकेचा सल्लागारच सांगत आहे.
मग अडीचशे कोटी रुपये खर्च करून हा प्रकल्प का केला जात आहे. गणेशखिंड रस्त्यावरील पाडलेला उड्डाणपूल, नळ स्टॉप येथील उड्डाणपूल यामुळे वाहतूक कोंडी सुटलेली नाही हे स्पष्ट झाले तरीही आता हा नवीन प्रकल्प केला जात आहे,
अशी निरीक्षणे नोंदवत या प्रकल्पावर महापालिकेने स्थापित केलेल्या तज्ज्ञ समितीचे सदस्य प्रशांत इनामदार यांनी प्रश्न उपस्थित केला. सजग नागरिक मंचातर्फे'बालभारती-पौड रोडचा सुधारित प्रस्ताव खरोखर वाहतूक कोंडी कमी करेल का?’
या विषयावर मासिक सभा आयोजित केली होत. मंचचे अध्यक्ष विवेक वेलणकर, कार्यकारी विश्वस्त जुगल राठी आदी उपस्थित होते. इनामदार म्हणाले, ‘‘बालभारती पौड रस्ता या प्रस्तावित प्रकल्पासाठी तीन वेळा अहवाल तयार केले. हा सुधारित अहवालात आमचे मत न घेताच प्रस्ताव रेटला आहे.
हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर किती टक्के लोक वापर करतील, त्याची आकडेवारी महापालिका देत नाही. अधिकारी काहीही विचार न करता केवळ प्रस्ताव पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहेत. रस्ता ३० मीटर करणार आहेत. पण एवढा मोठा रस्ता का केला जातोय,याचे उत्तर देत नाहीत.
हा रस्ता केला तर सेनापती बापट रस्त्यावरील वाहतूक पौड रस्त्यावर जाणार, बापट रस्त्यावरून उड्डाणपूल करणार आहेत. त्यामुळे या रस्त्याची रुंदी आणखी कमी होणार आहे. हा रस्ता केल्यामुळे परिसरातील आर्थिक घटकाचा विकास होणार असल्याचे अहवालात नमूद आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपूल पाडला, तिथे आता अवस्था काय आहे ते आपण पाहत आहात. नळ स्टॉपचा पूल बांधला तरीही वाहतुकीचा बोजवारा उडाला. यापूर्वीचा एकही प्रकल्प व्यवस्थित केलेला नसताना त्यात आणखी भर टाकली जात आहे, अशी खंत इनामदार यांनी व्यक्त केली.