पोलिसांची फौज; तरीही सुधारणा हवी

पोलिसांची फौज; तरीही सुधारणा हवी

वाहतूक नियमनामुळे कोंडी फुटण्यास मदत
स्वारगेट, पुणे स्थानकासह काही चौकांत सुधारणा; शिवाजीनगरमध्ये प्रयत्नांची गरज
शहरातील महत्त्वाचे रस्ते आणि चौकांमध्ये पोलिसांची संख्या वाढवून वाहतूक नियमनावर भर देण्याचा पोलिस आयुक्त रश्‍मी शुक्‍ला यांचा उपक्रम यशस्वी होत आहे. स्वारगेट, पुणे स्थानकासह काही चौकांमधील परिस्थितीत लक्षणीय सुधारणा झाली असली, तरी शिवाजीनगर परिसरासारख्या ठिकाणी अजून प्रयत्न करण्याची गरज असल्याचे पाहायला मिळाले. 


वाहतूक नियमनाचे मूलभूत कर्तव्य सोडून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांना हेरून त्यांच्याकडून दंडवसुली करण्यावर भर देण्याची पद्धत गेल्या काही वर्षांत पुण्यात सुरू होती. त्यामुळे "चौकात पोलिस असूनही कोंडी फुटेना‘ असे चित्र बहुतांश चौकांसह रस्त्यांवर दिसत होते. आयुक्त शुक्‍ला यांनी पदभार स्वीकारल्यानंतर दंडवसुलीच्या "टार्गेट‘पूर्तीची ही जुनी पद्धत मोडीत काढली आणि पोलिसांना वाहतूक नियमनावर भर देण्याच्या सूचना दिल्या. शुक्‍ला यांच्या या सूचनांना हरताळ फासण्याचा प्रयत्न काही पोलिस अधिकाऱ्यांनी केला; मात्र त्यांची वेळीच उचलबांगडी करण्यात आली. त्यानंतर आलेल्या अधिकाऱ्यांनी या उपक्रमाची प्रामाणिकपणे अंमलबजावणी केल्यामुळे आता शहरातील रस्ते आणि चौक काही प्रमाणात वाहतूक कोंडीतून मुक्त झाले आहेत.

स्वारगेट
शिवाजी, शंकरशेठ रस्त्यावर रांगा
पीएमपी, एसटी महामंडळाच्या बसगाड्यांचे आगार असलेल्या स्वारगेट परिसरामध्ये नुकतेच उड्डाण पुलाचे उद्‌घाटन झाल्यामुळे कात्रजकडून येणाऱ्या रस्त्याची बाजू बहुतांश रिकामी, तर शिवाजी रस्ता, शंकरशेठ रस्त्यावर गर्दीच्या वेळी वाहनांच्या रांगा असे चित्र पाहायला मिळते. उड्डाण पुलामुळे जेधे चौकातील कोंडी आता सारसबागेजवळ आणि शंकरशेठ रस्त्यावर वेगा सेंटरजवळ अल्प प्रमाणात ढकलली गेली आहे. उड्डाण पुलाखाली जेधे चौकात वाहतूक पोलिस अधिकारी, कर्मचारी आणि वॉर्डन यांची मोठ्या प्रमाणावर नेमणूक करण्यात आली आहे. गुरुवारी सकाळी पोलिसांच्या चारचाकी गाडीतील कर्मचारी एसटी स्थानकाबाहेर थांबणाऱ्या लोकांना आणि वाहनांना हटकून पुढे जाण्यास भाग पाडत होते. त्यामुळे वाहतूक नियमन चांगले होत होते. मात्र अशी कारवाई रोज झाली पाहिजे, अशी प्रतिक्रिया काही नागरिकांनी "सकाळ‘शी बोलताना व्यक्त केली.

उड्डाण पूल झाल्यामुळे वाहनांची संख्या कमी होऊन पादचाऱ्यांना जागा मिळेल ही अपेक्षा फोल ठरली आहे. रस्ता मोकळा झाल्यामुळे अतिक्रमणे वाढली आहेत किंवा थेट रस्त्यावर येण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. तर दुसरीकडे पीएमपीची वाट पाहत थांबणारे प्रवासी आणि त्यांच्यासाठी येणाऱ्या बस तसेच रिक्षा यासुद्धा भर रस्त्यातच थांबत असल्याचे पाहायला मिळते.

जेधे चौक
एसटी स्थानकाच्या प्रवेशद्वाराबाहेर होणारी खासगी वाहने व रिक्षांची गर्दी आणि आजूबाजूची अतिक्रमणे यामुळे जेधे चौकातून कात्रजकडे जाणाऱ्या एकेरी उड्डाण पुलाच्या तोंडाशी दररोज, विशेषतः सायंकाळी, रस्त्यातून वाट काढणे दुचाकीचालक आणि पादचाऱ्यांना धोक्‍याचे बनले आहे. कारण उलट दिशेने येणारे रिक्षा व खासगी वाहनचालक आणि स्थानकातून आत किंवा बाहेर पडणाऱ्या एसटी बस, तसेच पीएमपीच्या बस या समोरासमोर येतात आणि कात्रजच्या दिशेने जाणारे वाहनचालक हे सुद्धा त्याच ठिकाणी भरधाव वेगाने येत असतात.

कर्मवीर भाऊराव पाटील चौक

लक्ष्मीनारायण चित्रपटगृहासमोरील कर्मवीर भाऊराव पाटील चौकातील वाहनांची संख्या उड्डाण पुलामुळे बरीच कमी झाली आहे. तिथेही वाहतूक कर्मचाऱ्याची नेमणूक असल्यामुळे सहसा कोणी वाहतूक नियमांचे उल्लंघन करण्याचे धाडस करत नाही. मुकुंदनगरच्या भागात मात्र रस्ता अरुंद असल्यामुळे सिग्नलचा दिवा लाल असताना वाहनांच्या रांगा लागलेल्या असल्याचे चित्र कायम आहे.

खाकी वर्दीतील पोलिसांमुळे वाहतूक व्यवस्था सुरळीत 

पुणे स्टेशन परिसरात कायम वाहतूक कोंडी असलेल्या चौकांमध्ये नेमलेल्या खाकी वर्दीतील पोलिसांमुळे वाहतूक सुरळीत होण्यास मदत होऊ लागल्याची सद्यःस्थिती आहे. "लेफ्ट फ्री‘ करण्याचे काम नवीन पोलिस करत असल्याने वाहनांच्या रांगा लागण्याचे प्रमाण कमी झाली आहे. यामुळे वाहतूक शाखेच्या पोलिसांवरील ताणही कमी झाला आहे. 

मंगळवार पेठेतील शाहीर अमर शेख, मालधक्का, पुणे रेल्वे स्थानक, अलंकार चित्रपटगृह, बंडगार्डन पोलिस ठाणे या महत्त्वाच्या चौकांसह रस्त्यांवर सातत्याने गर्दी होते. सकाळी व सायंकाळी या चौकांमध्ये होणारी वाहतूक कोंडी परिसरातील नागरिक व पोलिसांची कायमची डोकेदुखी आहे. या पार्श्‍वभूमीवर वाहतूक शाखेच्या पोलिसांना मदत करण्यासाठी काही दिवसांपासून खाकी वर्दीतील पोलिसांची नेमणूक केली आहे. सकाळ नऊ ते रात्री नऊ या वेळेत वाहतूक पोलिसांना नवीन पोलिस सहकार्य करत आहेत. 

अरुंद रस्ता, बेकायदा पार्किंग, दुभाजकांमधील पंक्‍चर व बेशिस्त वाहनचालक अशा विविध कारणांमुळे पुणे स्टेशन परिसरातील मुख्य चौक व रस्त्यांवर वाहतूक कोंडी होते. मंगळवार पेठेकडून प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे, मालधक्का चौक ते पेट्रोल पंप, मालधक्का चौक ते ससून रुग्णालयाची पाठीमागील बाजू, पुणे रेल्वे स्थानक परिसर, रेल्वे स्थानक ते अलंकार चित्रपटगृह परिसर या ठिकाणीही वाहतूक कोंडी आहे. वाहतूक सुरळीत करण्यापेक्षा पावत्या फाडण्यास काही पोलिस प्राधान्य देत असल्याचे चित्र कायम आहे. काही अपवाद वगळता बहुतांश वाहतूक पोलिस व त्यांच्या मदतीसाठी दिलेले नवीन पोलिस रहदारीच्या वेळी वाहतूक सुरळीत करत असल्याचे समाधानकारक चित्र सध्या तरी दिसत आहे. 

"लेफ्ट फ्री‘ करण्यापासून ते चौकांमध्ये उभे राहून वाहतुकीचे नियोजन करण्यापर्यंतची जबाबदारी वाहतूक पोलिसांच्या सहकार्याने नवीन पोलिस पार पाडत आहेत. वाहतूक पोलिसांच्या तुलनेत खाकी वर्दीतील पोलिसांच्या सूचनांकडे वाहनचालक दुर्लक्ष करत नियमांचे सर्रासपणे उल्लंघन करत असल्याचीही सद्यःस्थिती आहे. 

जंगली महाराज रस्ता एकेरी असूनही चौकांत कोंडी 

वाहतुकीची कोंडी सुटावी म्हणून जंगली महाराज रस्ता एकेरी करण्यात आला; परंतु या रस्त्यावरील वेगवेगळ्या चौकांत वाहतुकीची कोंडी नेहमीची झाली आहे. काही चौकांमध्ये पोलिस आहेत, तर काही चौकांमध्ये पोलिस नसल्याचे "सकाळ‘ने गुरुवारीकेलेल्या पाहणीत दिसले. परिणामी डाव्या-उजव्या बाजूने येणाऱ्या वाहनांमुळे चौकांमध्ये वाहतुकीची कोंडी होत असल्याचे पाहायला मिळाले. 

जंगली महाराज रस्त्यावरून दररोज लाखोंच्या संख्येने वाहनांची वर्दळ होते. रस्त्यावर आखलेले झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे पुसटसे झाले आहेत. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय (सीओईपी) येथून जंगली महाराज रस्त्याकडे येण्यासाठी उड्डाण पूल बांधला आहे. पाटील इस्टेट येथूनदेखील या रस्त्याकडे येण्यासाठी उड्डाण पूल बांधण्यात येत आहे. त्यामुळे नेताजी सुभाषचंद्र बोस चौकात वाहतुकीची कोंडी होते. ती सोडविण्यासाठी दोन पोलिस हवालदारांच्या मदतीला आणखीन दोन पोलिस शिपाई देण्यात आले. मात्र, वाहनचालकांनी सहकार्य करणे अपेक्षित आहे. येथून स. गो. बर्वे चौकापर्यंत रस्ता ओलांडणे जिकिरीचे होते. 

मॉडर्न महाविद्यालयाच्या बाजूच्या रस्त्यालगत स्कूल बस उभ्या असतात. तेथून विद्यार्थी-विद्यार्थिनी ये-जा करतात; पण चौकात पोलिस क्वचितच दिसतो. सिग्नल बंद असो अथवा सुरू असो. पोलिस नसल्यास वाहनचालकही नियम मोडून वाहने पुढे दामटतात. झाशीची राणी लक्ष्मीबाई चौकात पोलिस असल्याचे नेहमी पाहायला मिळते. त्यामुळे तेथे कोंडी सहसा होत नाही. मात्र, हेच चित्र पुढे गेल्यावर डेक्कन येथील पीएमपी बस स्थानकासमोर दिसते. फर्ग्युसन रस्ता आणि आपटे रस्त्यावरून येणारी वाहने डेक्कनच्या दिशेने येत असतात आणि बस स्थानकांतून दर पाच दहा-पंधरा मिनिटांनी बसेस बाहेर पडतात. जवळ दोन वाहतूक पोलिस उभे असतात. पण ते नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सावजाच्या प्रतीक्षेतच उभे असतात. त्यामुळे वाहतूक कोंडी ठरलेली आहे. 

""नेताजी सुभाषचंद्र बोस चौकात येणारी वाहने तीन दिशांकडून येतात. अनेकदा वाहनचालक सिग्नल तोडतात. चौकात एका बाजूला झेब्रा क्रॉसिंग आहे. त्याचा उपयोग होत नाही. या रस्त्यावर स्कायवॉकचे नियोजन केल्यास, पादचाऱ्यांना रस्ता ओलांडणे सोईचे होईल.‘‘ 

- पोलिस हवालदार देविदास गायकवाड 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com