Pune : दिवसा ढवळ्या चक्क दोन बिबट्यांनी घोडीला फाडले.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pune

Pune : दिवसा ढवळ्या चक्क दोन बिबट्यांनी घोडीला फाडले..

निरगुडसर : दिवसा ढवळ्या चक्क दोन बिबट्यांनी चार वर्ष वयाच्या घोडीवर हल्ला करून ठार मारल्याची घटना वळती (ता आंबेगांव ) येथे बुधवार रोजी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली वळती परिसरात पाळीव प्राण्यांवर बिबट्याचा उपद्रव सुरूच असून दोन,चार असे समूहाने बिबटे हल्ले करू लागल्याने वळती परिसरातील नागरिक भीतीच्या छायेखाली वावरत आहे. वळती येथील शेतकरी अशोक दामोदर भोर या शेतकऱ्याच्या चार वर्षे वयाच्या घोडीचा बिबट्याने फडशा पाडला असून परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे

वळती गावाच्या उत्तरेला शेतकरी अशोक दामोदर भोर यांचे घर असून त्यांनी नेहमी प्रमाणे सकाळी घोडी घराच्या पाठीमागे बांधली होती, जवळच उसाचे क्षेत्र असून या उसातून दोन बिबट्याने घोडीवर हल्ला करून घोडीला ठार केले.

नऊ वाजण्याच्या सुमारास शेतकरी अशोक भोर व अभी भोर कांदा भरण्यासाठी कांदा बराकीकडे चालले होते त्यावेळी त्यांना दोन बिबटे घोडीवर तुटून पडलेले दिसले,त्यांनी आरडाओरडा करून बिबट्यांना तेथुन पळवुन लावले .या बिबट्यांच्या हल्ल्यात घोडी ठार झाली असून शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे दोन्हीही बिबटे उसाच्या क्षेत्रात लपलेले असुन अजुनही त्यांचा गुरगुरण्याचा आवाज येत आहे . सदर घटनेची माहिती वनविभागाला शेतकरी अशोक भोर यांनी दिली आहे . बिबट्याच्या हल्ल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये शेतीची कामे करताना बिबट्याच्या दहशतीखाली काम करावे लागत आहे.

सध्या साखर कारखान्यांची उस तोडणी सुरू झाली असल्यामुळे अनेक बिबटे सैरभैर झालेले असून अनेकांना दिवसा ढवळ्या बिबट्यांचे दर्शन होत आहे. आता तर बिबटे भक्ष्याच्या शोधात मानवी वस्तीवर येऊ लागले आहे. बिबट्यांचे या भागात पाळीव प्राण्यांवर हल्ले वाढू लागले आहे.

बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यामुळे या मागील काळात पिंजरे लावण्याची मागणी करूनही वनविभागाने आजपर्यंत कोणतीही दखल घेतली नाही . तरी वन विभागाने त्वरीत पिंजरे लावुन बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते धोंडीभाऊ भोर यांनी केली आहे