कोश्यारी यांची हकालपट्टी करण्याच्या मागणीवर ठाम - खासदार उदयनराजे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

bhagat singh koshyari and udayanraje bhosale

‘राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या मुद्यावर कधीच तडजोड होऊ शकत नाही.

Udayanraje Bhosale : कोश्यारी यांची हकालपट्टी करण्याच्या मागणीवर ठाम - खासदार उदयनराजे

पुणे - ‘राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या मुद्यावर कधीच तडजोड होऊ शकत नाही. कोश्यारी यांची राज्यपाल पदावरून हकालपट्टी करावी, या मागणीवर आम्ही ठाम आहोत. भाजप पक्ष त्यांच्यावर कारवाई करेल, असा मला विश्वास आहे. येत्या २८ नोव्हेंबरला पुन्हा या विषयावर बोलणार आहे,’ असे प्रतिपादन खासदार उदयनराजे भोसले यांनी केले.

नव्या पिढीसाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार जुने झाले, असे वक्तव्य राज्यपाल कोश्यारी यांनी केले होते. या मुद्यावरून खासदार उदयनराजे यांनी बुधवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत कोश्यारी यांच्यावर तोफ डागली. उदयनराजे म्हणाले, ‘छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वधर्मसमभावाचा विचार दिला, स्वराज्याची संकल्पना मांडली. महिला-पुरूष, विविध जाती-धर्मांचा आदर केला. पावणेचारशे वर्षांनंतर आजही छत्रपती शिवरायांचे नाव घेतल्यानंतर प्रत्येक व्यक्तीमध्ये ऊर्जा आणि प्रेरणा निर्माण होते. त्यांच्या विचारांमुळेच देशाची लोकशाही टिकून आहे.’

पवार, गडकरींनी निषेध करायला हवा होता

राज्यपाल कोश्यारी यांनी छत्रपती शिवरायांबद्दल वक्तव्य केले. त्या व्यासपीठावर ज्येष्ठ नेते शरद पवार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे उपस्थित होते. त्याच वेळी या नेत्यांनी निषेध करायला हवा होता. तेथे मी असतो तर डी.लिट पदवी स्वीकारली नसती. पवार यांनी ती स्वीकारावी की नाही, हा त्यांचा प्रश्न आहे, असे उदयनराजे यांनी नमूद केले.

अशी प्रवृत्ती ठेचून काढली पाहिजे

मी राज्यपाल कोश्यारींच्या विरोधात नाही पण अशा प्रवृत्तीच्या विरोधात आहे. अशी प्रवृत्ती ठेचून काढली पाहिजे. यासोबतच ‘हर हर महादेव’ चित्रपटाच्या विषयावर २८ नोव्हेंबर रोजी बोलणार आहे, असे उदयनराजे यांनी स्पष्ट केले.

त्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही

राज्यपाल हे सन्मानाचे पद आहे. त्यांना पदाची जबाबदारी कळत नसेल तर त्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माझे मित्र आहेत. त्यांनी मला फोन केला की नाही, यावर मी उत्तर देण्यास बांधील नाही. परंतु मी तडजोडीचे समाजकारण आणि राजकारण कधी केलेले नाही, असे एका प्रश्नाच्या उत्तरादाखल त्यांनी सांगितले.

त्रिवेदी यांची पक्षातून हकालपट्टी करा

भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यावर त्रिवेदी यांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे. त्यांचीही पक्षातून हकालपट्टी झाली पाहिजे, अशी मागणी उदयनराजे यांनी या वेळी केली.