पुण्यात अस्वच्छता वाढली : ‘जी २०’नंतर कारवाई थंडावली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune Municipal Corporation

पुण्यात ‘जी २०’ परिषद होणार म्हणून रस्ते, पादचारी मार्ग, चौकांच्या स्वच्छतेकडे लक्ष देण्यात आले होते. थुंकून घाण करणाऱ्यांना दंड ठोठावून शिक्षा केली.

Pune Uncleaned : पुण्यात अस्वच्छता वाढली : ‘जी २०’नंतर कारवाई थंडावली

पुणे - पुण्यात ‘जी २०’ परिषद होणार म्हणून रस्ते, पादचारी मार्ग, चौकांच्या स्वच्छतेकडे लक्ष देण्यात आले होते. थुंकून घाण करणाऱ्यांना दंड ठोठावून शिक्षा केली. पण परिषद झाली आणि आता शहरातील स्थिती पूर्वीसारखीच होत असून, थुंकणे, घाण करण्याचे प्रकार वाढले आहेत आणि महापालिकेची कारवाई मात्र थंडावलेली आहे. ‘जी २०’ परिषदेच्या आधी व नंतरच्या दोन आठवड्यांच्या काळात चार लाख रुपयांचा दंड वसूल केला होता. आता मात्र, गेल्या सात दिवसांत फक्त ११ जणांवर कारवाई केली आहे.

पुणे शहरात ‘जी २०’ परिषद होणार म्हणून गेल्या दोन महिन्यांपासून महापालिका तयारीला लागलेली होती. यासाठी शहरातील रस्ते, पादचारी मार्ग दुरुस्ती करणे, रंगरंगोटी, स्वच्छता, राडारोडा उचलणे यासह अनेक कामे करण्यात आली. त्यामुळे शहरातील लोहगाव विमानतळ ते सेनापती बापट रस्त्याचा परिसर एकदम चकाचक झाला होता. पण महापालिकेने काम केल्यानंतर अनेक नागरिक पादचारी मार्ग, दुभाजकांवर थुंकून घाण करत असल्याने स्वच्छतेचा प्रश्‍न गंभीर झाला. हे प्रकार थांबत नसल्याने महापालिका आयुक्तांनी अशा बेशिस्त नागरिकांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार घनकचरा व्यवस्थापन विभागाने क्षेत्रीय कार्यालयांच्या माध्यमातून थुंकणाऱ्यांवर जोरदार कारवाई सुरू केली. प्रत्येकी एक हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. तर ज्यांच्याकडे पैसे नव्हते त्या नागरिकांना घाण साफ करायला लावून अद्दल घडवली होती.

१६ आणि १७ जानेवारी रोजी पुण्यात ‘जी २०’ परिषद झाली. त्यानंतर पुन्हा एकदा शहरातील अस्वच्छता वाढण्यास सुरुवात झाली आहे. काही चौकांमध्ये सुशोभीकरणाचे काम सुरू असले तरी शहराच्या इतर भागांत पूर्वीप्रमाणे रस्त्यावर कचरा, राडारोडा टाकणे हे प्रकार वाढत आहेत. शिवाय दुभाजकांवर थुंकण्याचे प्रमाण वाढले आहे. घाण करणाऱ्यांवर कारवाई सुरूच ठेवा, असे आदेश क्षेत्रीय कार्यालयांना दिलेले असले तरी याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

‘जी २०’ परिषदेनंतर शहरात स्वच्छता राखली पाहिजे तसेच घाण करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करावी असे आदेश क्षेत्रीय कार्यालयाच्या सहायक आयुक्तांना दिलेले आहेत. रस्ते, चौक, सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवण्यासाठीची प्रक्रिया कायम सुरू होईल.

- आशा राऊत, उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन विभाग

आणखी होणार दोन बैठका

पुण्यात ‘जी २०’च्या आणखी दोन बैठका जून आणि सप्टेंबर महिन्यात होणार आहेत. या दोन्ही बैठकांमध्ये परदेशी पाहुणे विविध भागांत पर्यटन करणार असल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात आहे. पहिल्या बैठकीला विमानतळ ते सेनापती बापट रस्ता या दरम्यानचा रस्ता स्वच्छ करताना प्रशासनाची दमछाक झाली. त्यामुळे प्रशासनाकडून स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्याने पुन्हा एकदा तीच स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.