भुयारी मार्गांची ‘अंधेर’नगरी!

पादचाऱ्यांची सोय म्हणून महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून पादचारी भुयारी मार्ग बांधले, मात्र त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे.
Underground Route
Underground RouteSakal
Summary

पादचाऱ्यांची सोय म्हणून महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून पादचारी भुयारी मार्ग बांधले, मात्र त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे.

पुणे - पादचाऱ्यांची (Pedestrian) सोय म्हणून महापालिकेने (Municipal) कोट्यवधी रुपये खर्च करून पादचारी भुयारी मार्ग (Underground Route) बांधले, मात्र त्यांची प्रचंड दुरवस्था (Bad Condition) झाली आहे. कोथरूड, हडपसर, नगर रस्ता, शनिवारवाडा येथील भुयारी मार्ग तळीरामांचे अड्डेच बनले आहेत. बहुतांश ठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य, साठलेले पाणी यांमुळे भुयारी मार्गांत दुर्गंधी निर्माण झाल्याने नागरिकांची, महिलांची इच्छा असूनही भुयारी मार्गांचा वापर करता येत नाही. भुयारी मार्गांची देखभाल व दुरुस्तीच्या नावाने क्षेत्रीय कार्यालये आणि प्रकल्प विभाग एकमेकांकडे बोट दाखवत असल्याने या ‘अंधेर’नगरीला वाली कोण, असाच प्रश्‍न निर्माण झाला आहे.

भोसले भुयारी मार्ग बंदच

जंगली महाराज रस्‍त्यावर भोसले भुयारी मार्ग आहे, मात्र तो तीन-चार वर्षांपासून बंद आहे. या परिसरात शाळा आहे, रोज हजारो विद्यार्थी जंगली महाराज रस्ता जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडतात. हा भुयारी मार्ग सुरू करण्याचा प्रयत्न प्रशासन करत असले तरी अद्यापही आतमध्ये प्रचंड घाण आहे, वीज पुरवठ्याची व्यवस्था नाही, तेथील पाणी उपसा करण्याच्या दोन मोटारी चोरीला गेल्या आहेत, मात्र त्याची पोलिसांकडे तक्रार केलेली नाही! शिवाजीनगर घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालय आणि प्रकल्प विभाग यांच्यात समन्वय नसल्याने हा चांगला भुयारी मार्ग बंद आहे.

महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांकडून भुयारी मार्ग व पादचारी उड्डाणपुलांची देखभाल दुरुस्ती केली जाते. भुयारी मार्गांमध्ये वीज, स्वच्छता यांची कामे करून घेण्यास क्षेत्रीय कार्यालयांना आदेश दिले आहेत, ’’

- श्रीनिवास बोनाला, मुख्य अभियंता, प्रकल्प विभाग

महापालिकेने बांधलेले भुयारी मार्ग व उड्डाणपूल पादचाऱ्यांच्या नाही, तर वाहनांच्या सोईच्या दृष्टीने बांधले गेल्याने त्यांचा जास्त वापर होत नाही. तसेच जिने चढणे व उतरण्यास नागरिकांकडून कंटाळा केला जातो. काही अपवाद वगळता दुभाजकांमध्ये ठरावीक अंतरावर पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्याची सुविधा असली पाहिजे.’’

- हर्षद अभ्यंकर, सेव्ह पुणे ट्रॅफिक मूव्हमेंट

गरवारे, फडके मार्ग आदर्श!

शहरातील महत्त्वाचा आणि नागरिकांकडून सर्वाधिक वापरला जाणारा डेक्कन जिमखाना येथील आबासाहेब गरवारे पादचारी पूल १९८१पासून पुणेकरांच्या सेवेत आहे. तेथे उत्तम पद्धतीने महापालिकेने देखभाल दुरुस्ती केली आहे, सुशोभीकरण केले आहे, सुरक्षेसासाठी सीसीटीव्ही आहेत. याच पद्धतीने एरंडवणे येथील स्वरतीर्थ सुधीर फडके भुयारी मार्ग २००४ मध्ये बांधला आहे. तेथेही स्वच्छता, सीसीटीव्ही, सुरक्षा रक्षक अशी व्यवस्था आहे. भुयारी मार्गांचा उत्तम नमुना म्हणून यांची दखल घ्यावी लागेल.

शनिवारवाडा

तळीरामांचा अड्डा

शनिवारवाड्यासमोरील भुयारी मार्गाचा पादचाऱ्यांनी वापर करणे आवश्यक आहे. मात्र, या भुयारीमार्गात तळीरामांचा अड्डा झाल्याचे दिसून येत आहे. शनिवारवाडा समोरील शिवाजी महाराज रस्ता आणि बाजीराव रस्त्याखालून मोठा दर्गा रस्‍त्यावरून या भुयारी मार्गातून नव सुनीता अपार्टमेंटसमोरून कसबा पेठकडे जाता येते.

  • गुटखा खाऊन भिंतींवर थुंकल्याने दुर्गंधी

  • मोठ्या प्रमाणात अस्वच्छता

  • दुपारच्या वेळी भुयारात दुतर्फा झोपलेले नागरिक

  • तळीरामांचा अड्डा

नशा करून वाटेल तसे तळीराम मध्येच झोपत असल्याने महिलांना या मार्गातून चालणे कठीण वाटते. या भुयारात असलेले विश्रामबागवाडा विभागीय कार्यालयाचे कीटक प्रतिबंधक विभागाचे छोटे कार्यालय असल्याचा येथे फलक लावला आहे. ते जर सुरू केले तर भुयारी मार्ग स्वच्छ राहील.

- मोहिनी जगताप, पादचारी

रामटेकडी

मार्गावर सांडपाणी

पुणे-सोलापूर महामार्गावर वैदूवाडी येथील पादचारी भुयारी मार्गात घाणीचे साम्राज्य वाढले आहे. सन २००५-०६ च्या दरम्यान प्रवासी आणि पादचाऱ्यांना बस थांब्यावर जाण्यासाठी व रस्ता ओलांडण्यासाठी पादचारी भुयारी मार्ग करण्यात आला होता. मात्र या ठिकाणी दररोज साफसफाई केली जात नाही, घाण व दुर्गंधी मोठ्या प्रमाणावर आहे, यामुळे येथून ये-जा करणाऱ्यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

  • गर्दुल्ले व मद्यपी खुलेआम दारू पीत बसलेले असतात.

  • सांडपाणी जमा होत असल्याने डासांचा प्रादुर्भाव आहेत.

  • विद्युतव्यवस्था नसल्याने रात्रीच्या वेळेस महिलांसाठी असुरक्षित

  • नियमीत स्वच्छतेचा अभाव

रात्रीच्या वेळी तर नाहीच नाही, पण दिवसादेखील या पादचारी मार्गाने प्रवास करणे अवघड झाले आहे. महापालिकेने नियमितपणे येथे साफसफाई करून येथे घाण करणाऱ्यांवर कारवाई करावी.

- ललिता सोनकांबळे, ज्येष्ठ नागरिक

जंगली महाराज रस्ता

वर्षानुवर्षे बंदच

शिवाजीनगर - जंगली महाराज रस्त्यावर असलेला जी. एम. भोसले भुयारी मार्ग वर्षानुवर्षे बंदच आहे. या परिसरात शाळा, महाविद्यालय असल्याने विद्यार्थी, पालक, ज्येष्ठ नागरिकांसाठी अत्यंत गरजेचा असणारा हा मार्ग बंद असल्याने नागरिकांची गैरसोय होते.

  • विद्यार्थ्यांना धोकादायक पद्धतीने रस्ता ओलांडावा लागतो.

  • सुरक्षारक्षकांचा अभाव.

  • मार्गात अस्वच्छता.

रस्ता ओलांडताना अपघात होऊ नये म्हणून विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिकांसाठी हा भुयारी मार्ग बांधण्यात आला होता, मात्र तो कित्येक वर्षे बंद असल्याने रस्ता ओलांडताना नागरिकांची दमछाक होते. भुयारी मार्ग सुरू केल्यास विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिकांना त्याचा फायदा होईल.

- श्याम हर्षे (पालक)

फातिमानगर

कचऱ्यामुळे दुरवस्था

घोरपडी - पादचाऱ्यांच्या सोईसाठी फातिमानगर येथे करण्यात आलेल्या भुयारी मार्गाची नागरिकांच्या वापराविना दुरवस्था झाली आहे. भुयारी मार्गाचा जांभूळकर मळ्याच्या बाजूने असणारा दरवाजा बंद आहे, तर फडके शाळेच्या बाजूचे शटर हे नादुरुस्त आहे.

  • भुयारी मार्गातील पायऱ्यांना कचऱ्याचा विळखा.

  • पुणे कँन्टोमेन्ट व पुणे महापालिका यांच्या सीमेवर हा भुयारी मार्ग असल्याने स्वच्छता कोणी करायची यावरून दुर्लक्ष.

  • दारुडे आणि गांजा पिणाऱ्या लोकांचा अड्डा.

  • महिला व मुलींना हा मार्ग असुरक्षित झाला आहे.

  • क्षेत्रीय कार्यालयाकडून तक्रारी आल्यावर स्वच्छता.

मार्गावरील अस्वच्छता व दारुडे लोक यांमुळे मुलींना भुयारी मार्गातून प्रवास करताना असुरक्षित वाटते. सुरक्षारक्षक नेमल्यास हा सोयीचा मार्ग आहे.

- जानकी जगताप (विद्यार्थिनी)

डहाणूकर कॉलनी

नियमित स्वच्छतेची गरज

कोथरूड - येथील पादचारी भुयारी मार्ग हा २०१२ मध्ये सुरू झाला, तेव्हापासून बरेचदा तो बंद अवस्थेतच आहे. त्यामुळे या मार्गाचे नाव ‘स्व. चंद्रकांत गंगाधर ऊर्फ अण्णा साने भुयारी मार्ग’ आहे, याची कोणाला कल्पनाच नाही. डहाणूकर कॉलनीमधील भुयारी मार्ग अशीच त्याची ओळख आहे.

  • नियमीत स्वच्छता नसल्याने उग्र वास जाणवतो.

  • मार्गात दारूच्या बाटल्यांचा खच, कचरा, धुळीचे साम्राज्य.

  • अभावानेच तक्रार आल्यावरच स्वच्छता होते.

रस्ता ओलांडताना पादचारी पुलाचा व भुयारी मार्गाचा लोकांनी वापर करावा म्हणून रोटरीच्यावतीने अनेकवेळा जनजागृतीचे कार्यक्रम घेत असतो. या मार्गावर नियमित स्वच्छता व सुरक्षारक्षक असतील, तर त्याचा वापर वाढेल.

- किरण इंगळे

कर्वेनगर

तीन कोटींचा खर्च वाया

वारजे - कर्वेनगर येथील भुयारी मार्गाचा वापरच होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेला भुयारी मार्ग नागरिकांच्या उपयोगाचा राहिलेला नाही. २०११ मध्ये तयार करण्यात आलेल्या या भुयारी मार्गासाठी तीन कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. मात्र काही वर्षातच कर्वेनगर उड्डाणपूल केल्याने हा तयार केलेला भुयारी मार्ग अडगळीत पडलेला दिसून येतो.

  • चौकातील रहदारी कमी झाल्याने नागरिकांकडून वापर नाही.

  • नागरिकांना रस्ता सरळ सरळ ओलांडता येऊ लागला.

  • कोणतेही नियोजन न करता बांधला गेल्याने पैशाचा अपव्यय.

  • नियमीत स्वच्छता नाही.

येथे भुयारी मार्गाची गरजच नव्हती. विनाकारण येथे भुयारी मार्ग बांधण्यात आलेला आहे. भुयारी मार्गापेक्षा रस्त्याने जाणे योग्य व सुरक्षित वाटते.

- विनोद मोहिते

पौड रस्‍ता

वापराविना गाळे पडून

कोथरूड - पौड रस्त्यावर राजा श्री शिवराय प्रतिष्ठान भुयारी मार्ग २०१६ पासून वापरात आहे. या मार्गात महापालिकेने बांधलेले ८ गाळे वापराविना पडून आहेत. या गाळ्यांची मागणी पीएमपी व काही महिला मंडळांनी केली होती, परंतु त्यांचे वाटप अद्यापपर्यंत कोणालाच करण्यात आलेले नाही.

  • कोथरूड दर्शन ही थीम घेऊन काढलेली चित्रे आकर्षक.

  • गाळे भाड्याने न देता तसेच ठेवण्यात आल्याने महापालिकेचे लाखो रुपयांचे नुकसान.

  • नियमीत स्वच्छता केली जाते.

  • विद्युत पुरवठा सुरळीत असतो.

कोरोनाकाळात हा मार्ग बंद होता, आता परत हा मार्ग सुरू झाला आहे. येथील गाळे सुरू असते तर वहिवाट अधिक वाढली असती व महिला-मुलींना येथून जाणे अधिक सुरक्षित वाटले असते. येथे सुरक्षारक्षक कधी दिसले नाहीत.

- साक्षी चव्हाण (विद्यार्थिनी)

विमाननगर चौक

गुटख्याच्या पिचकाऱ्या

वडगाव शेरी - जागोजागी दिसणाऱ्या गुटख्याच्या पिचकाऱ्या, पायऱ्यांवर साचलेला कचरा, भुयारी मार्गात बसलेले भिकारी, तुटलेल्या पायऱ्या, तुंबलेले गटार हे चित्र आहे अतिशय वर्दळीच्या आणि महत्त्वाचा चौक असलेल्या विमाननगर येथील भुयारी मार्गाचे.

  • ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी रॅम्पची सुविधा नाही.

  • सुमारे सत्तर पायऱ्यांचे मोठे दिव्य पार पाडून रस्त्याच्या पलीकडे जावे लागते.

  • अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे स्वच्छतेचा अभाव

  • अस्वच्छतेला नागरिकही जबाबदार

  • महिलांसाठी असुरक्षित

नोकरीवर जाताना रोज भुयारी मार्गाचा वापर करावा लागतो. भुयारी मार्गात भिकारी बसलेले असतात, त्यामुळे भीती वाटते. येथे सुरक्षारक्षक नेमल्यास सुरक्षित वाटेल.

- रितिका साळवे (वय २१, नोकरदार युवती)

हडपसर - मंत्री मार्केट

स्‍वच्‍छतागृहासारखी अवस्‍था

हडपसर - मंत्री मार्केट येथील सोलापूर महामार्गाला छेदून वाहत असलेल्या नाल्यालगतचा पादचारी भुयारी मार्ग गेली वीस वर्षांपासून वापराविना पडून आहे. त्यावरून वाहणाऱ्या सांडपाण्यासह सध्या तो मोठ्या प्रमाणातील कचऱ्याने व्यापला आहे.

येथील उड्डाणपुलाच्या निर्मितीपूर्वी हा पादचारी मार्ग बनविण्यात आला आहे. मात्र, सुरवातीपासूनच नाल्यातील पाण्याची दुर्गंधी, नागरिकांकडून पुलाखालील जागेचा स्वच्छता गृहासारखा केला जाणारा वापर यामुळे पादचारी हा मार्ग वापरण्यास टाळाटाळ करीत आहेत.

  • येण्यासाठीच्या पायऱ्या तुटलेल्या आहेत

  • नाल्यातील पाणी पादचारी मार्गावरून वाहत आहे.

  • कचऱ्याचे ढीग लागले आहेत.

  • उड्डाणपुलाखालील चौकातून पर्याय उपलब्ध झाल्याने हा मार्ग वापराविना पडून.

हा पादचारी भुयारी मार्ग नाल्याशेजारून जात असल्याने दुर्गंधीमुळे पहिल्यापासूनच या मार्गाला महिलांनी नापसंती दाखवली होती. आजमितीला येथून कोणीही प्रवास करीत नाही. भुयारी मार्गाचे हे प्रयोजन सपशेल चुकलेले आहे.

- स्मिता चांदगुडे (नागरिक)

भुयारी मार्ग सुरू झाला तेव्हा येथील व्यावसायिकांनी केलेल्या अतिक्रमणामुळे हा मार्गच दिसत नव्हता. हळूहळू येथे टाकल्या जाणाऱ्या कचऱ्यामुळे भुयारी मार्गच नाहीसा झाला आहे.

- ऋषिकेश पगडे (स्थानिक रहिवासी)

शिवाजीनगर न्यायालय

मेट्रो कामामुळे बंद

शिवाजीनगर - येथील कौटुंबिक न्यायालय ते जिल्हा सत्र न्यायालय गेट नंबर चारच्या अंतर्गत असलेला भुयारी मार्ग मेट्रोच्या कामामुळे चार वर्षांपासून बंद आहे. रस्त्यावर वाहनांची गर्दी असते. वकील, नागरिकांना रस्ता ओलांडताना अडथळा येऊ नये म्हणून हा भुयारी मार्ग बनविण्यात आला होता.

  • बंद भुयारी मार्गामुळे वकील, नागरिकांची गैरसोय

  • आतमध्ये राडारोडा, धूळ पडलेली आहे.

  • सुरक्षा व्यवस्था तैनात करून भुयारी मार्ग चालू करण्याची मागणी

२०१७ मध्ये उद्‌घाटन केल्यानंतर तो तीन-चार महिने चालू होता. नंतर तो आजतागायत बंदच आहे. भुयारी मार्ग चालू होणे गरजेचे आहे. वाहनांची गर्दी असल्याने रस्ता ओलांडताना अपघात होऊ शकतो. सुरक्षारक्षक असणे गरजेचे आहे.

- वैशाली चांदणे (अध्यक्ष, कौटुंबिक न्यायालय वकील संघटना)

चंदननगर

घाणीचा विळखा

रामवाडी - चंदननगर येथे पुणे महापालिकेकडून कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या पादचारी भुयारी मार्गामध्ये घाणीचे साम्राज्य पसरले आहे. पान- तंबाखू, गुटखा खाऊन पिचकाऱ्या मारल्याने भिंती रंगल्या आहेत. ठिकठिकाणी पडलेल्या मद्याच्या बाटल्या, कचऱ्यातून पादचाऱ्यांना मार्गक्रमण करावे लागते.

  • पायऱ्या तुटलेल्या आहेत.

  • पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी बसविण्यात आलेले सीसीटिव्ही कॅमेरे गायब.

  • मार्गाची स्वच्छता व सुरक्षिततेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष.

  • तळीराम, बेघरांचा वावर.

भुयारी मार्गात खूप अस्वच्छता आहे. काही लोक लघुशंका करतात. घाण पाणी साचून डास वाढले आहेत.

- रेणुका दौंडकर

वनाज

दारूच्या बाटल्यांचा खच

कोथरूड - पौड रस्त्यावरील वनाज कंपनीजवळ असलेला नानासाहेब धर्माधिकारी भुयारी मार्ग ऑक्टोबर २०१२ मध्ये सुरू झाला. येथे शेजारीच असलेल्या दारूच्या दुकानातून दारू घेऊन बेवडे येथे प्यायला बसतात. त्यामुळे येथे एकट्याने जाण्याचे धाडस महिला करीत नाहीत.

  • नियमीत स्वच्छतेचा अभाव आहे.

  • कचरा व दारूच्या बाटल्यांचा खच

  • मूत्र विसर्जन केल्यामुळे येणारा कुबट वास

  • सुरक्षेचा बोजवारा उडालेला.

भुयारी मार्गातून रस्ता ओलांडण्यापेक्षा आम्ही मुख्य रस्त्यावरून रस्ता ओलांडणेच सुरक्षित मानतो. थोडा उशीर होतो, पण येथून जायचे म्हणजे जिवावर येते.

- सुरेखा जोरी (जयभवानीनगर)

डेक्कन जिमखाना

सुंदर शिल्पांची आकर्षक रचना

शिवाजीनगर - डेक्कन जिमखाना येथील आबासाहेब गरवारे पूल याठिकाणी असलेल्या भुयारी मार्गात स्वच्छता, ऐतिहासिक आकर्षक शिल्प पादचाऱ्यांचे लक्ष वेधून घेतात. सरकारशी भागीदारी करत आबासाहेब गरवारे यांनी १९८१ मध्ये डेक्कन येथे भुयारी मार्ग बांधला.

  • आकर्षक ऐतिहासिक शिल्पे

  • नियमीत स्वच्छता ठिकठिकाणी शोभिवंत झाडांचे रोपण

  • प्रबोधनात्मक सूचनाफलक

  • विद्यार्थी, महिला, नागरिकांकडून दररोज वापर

धोकादायक पद्धतीने रस्ता ओलांडताना अपघात होऊ शकतो, त्यापेक्षा भुयारी मार्गाचा वापर आम्ही करतो. पावसाळ्यातदेखील मार्ग स्वच्छ ठेवला जातो. महिला, विद्यार्थ्यांना हा मार्ग सुरक्षित वाटतो.

- सुनील मोरे (नागरिक)

एरंडवणे

इतिहासाच्या विश्वात घेऊन जाणारा

मयूर कॉलनी - सुशोभित, सुसज्ज, पुण्यातील उत्कृष्ट भुयारी मार्गांपैकी एक असा हा इतिहासाच्या विश्वास घेऊन जाणारा ‘स्वरतीर्थ सुधीर फडके भुयारी मार्ग' आहे. पुराणातील रंजक कथांमधील काही किस्से शिल्प स्वरुपात बसविण्यात आलेले आहेत.

  • सहा प्रवेशद्वार असून तीन सुरक्षा रक्षक, सीसीटीव्ही कॅमेरे.

  • भारतातील वैशिष्ट्यपूर्ण पर्यटन व राष्ट्रीय स्थळांची शिल्पे.

  • जागोजागी सुचना व दिशादर्शक फलक लावण्यात आले आहेत.

  • पावसाळ्यात उद्भवणाऱ्या समस्यांकडे वेळोवेळी लक्ष देणे गरजेचे आहे.

पुण्यातील अनेक भुयारी मार्गांना घाणीचा विळखा आहे, परंतु हा मार्ग स्वच्छ आहे. पाण्याची सुविधा केली होती, मात्र नागरिक घाण करू लागल्यामुळे नळ बंद करण्यात आला.

- सय्यद मुल्ला (स्थानिक)

समस्या आणि कारणे

  • गेल्या काही वर्षांत पादचाऱ्यांचा विचार न करता तत्कालीन नगरसेवकांच्या आग्रहास्तव भुयारी मार्ग बांधण्यात आले.

  • कर्वेनगर येथे उड्डाणपूल प्रस्तावित असतानाही भुयारी मार्ग बांधण्यात आला, त्यामुळे त्याचा वापर होत नाही.

  • कोथरूड येथील वनाज येथील अप्पासाहेब धर्माधिकारी भुयारी मार्ग, हडपसर येथील मंत्री मार्केट येथील भुयारी मार्ग, चंदननगर, हडपसर वैदूवाडी येथील भुयारी मार्गांची स्थिती प्रचंड दयनीय आहे.

  • फुटलेल्या फरशा, चोरीला गेलेले सीसीटीव्ही, साचलेले घाण पाणी व कचरा यामुळे प्रचंड दुर्गंधी पसरली असल्याचे ‘सकाळ’च्या पाहणीत समोर आले आहे.

१८ - शहरातील पादचारी भुयारी मार्गांची संख्या

३ - कोटी रुपये प्रत्येक मार्गाचा किमान खर्च

तुमचा अनुभव सांगा...

भुयारी मार्गाची सुविधा शहरात तसेच उपनगरांत महापालिकेने उभारली. परंतु त्यांचा वापर करण्यासाठी नागरिक कचरतात. या मार्गामध्ये सुरक्षेसह विविध समस्या आहेत. असा अनुभव आपल्या परिसरात पहावयास मिळत असल्यास तो नावासह editor.pune@esakal.com या मेलवर किंवा ८४८४९७३६०२ या व्हॉटस्‌अॅपवर कळवा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com