प्रस्थापितांच्या पंचरंगी लढतीत कमालीची चुरस (शेरास सव्वाशेर )

pune universicty Ward
pune universicty Ward

पुणे विद्यापीठ-वाकडेवाडी (प्रभाग क्रमांक 7) 

पुणे :  कॉंग्रेसचे प्रस्थापित नगरसेवक दत्ता बहिरट यांच्यापुढे आमदार अनिल भोसले यांच्या पत्नी रेश्‍मा भोसले यांच्या उमेदवारीचे रंगलेले नाट्य आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ऍड. नीलेश निकम, शिवसेनेचे उमेदवार हरीश निकम, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार श्‍याम माने यांनी निर्माण केलेले आव्हान, यामुळे पुणे विद्यापीठ-वाकडेवाडी प्रभाग क्रमांक 7 मध्ये खुल्या गटातील (ड) निवडणूक चुरशीची अन्‌ पंचरंगी झाली आहे. 
सुमारे 76 हजार मतदार असलेल्या या प्रभागात कस्तुरबा वसाहत, खैरेवाडी, भोसलेनगर, पाटील इस्टेट, मुळा रोड, जनवाडी, गोखलेनगर, पीएमसी कॉलनी, संगमवाडी, वाकडेवाडी आदी परिसर येतो. यातील 70 टक्के भाग वस्ती विभाग आहे. बहिरट यांनी घेतलेल्या आक्षेपांमुळे भोसले यांना अखेर अपक्ष म्हणून लढावे लागत आहे. येथील लढत सुरू होण्यापूर्वीच तिचा गाजावाजा झाला. संमिश्र लोकवस्ती असलेला हा भाग पूर्वी कॉंग्रेस-राष्ट्रवादीला सातत्याने अनुकूल होता. मात्र, मधल्या काळात भाजप, शिवसेना, मनसेनेही नेटाने प्रयत्न केले आहेत. भाजपने शहरात सर्वत्र उमेदवार उभे केले असले तरी, प्रभागातील "ड' गटात मात्र कमळाचे चिन्ह नसेल. बहिरट, भोसले, ऍड. नीलेश निकम, हरीश निकम हे "तुल्यबळ' उमेदवार असून, माने यांचा भरवसा कार्यकर्त्यांवर आहे. मतदारांना आपलेसे करण्यासाठी या प्रभागात सध्या विविध प्रकारे प्रयत्न सुरू असून, सायंकाळपासून त्याला बहर येत असल्याचे येथे फिरताना जाणवते. 
या प्रभागात अन्य गटांत कॉंग्रेसच्या रूपाली मोरे, नंदा रोकडे, छाया शिंदे, भाजपकडून सोनाली लांडगे, राजश्री काळे, आदित्य माळवे, "राष्ट्रवादी'कडून आशा साने, धनश्री चव्हाण, रवींद्र ओरसे, शिवसेनेकडून वनमाला कांबळे, सुरेखा भवारी, विनोद ओरसे, मनसेकडून जयश्री रणदिवे, शंकर पवार उमेदवार आहेत. 

दत्ता बहिरट (कॉंग्रेस) :  मॅफकोचे आरक्षण, शिक्षण हक्कासाठी दिलेला लढा, पाण्याच्या बांधलेल्या टाक्‍या; तसेच प्रभागात केलेली विकासकामे मतदारांना माहिती आहेत. पैशाची ताकद आणि दहशतीपुढे मतदार झुकणार नाहीत. दारू आणि बिर्याणीचे वाटप करून मते विकत घेता येत नाहीत. 
रेश्‍मा भोसले (भाजपपुरस्कृत अपक्ष) : भोसले कुटुंबीयाने परिसरात मोठ्या प्रमाणावर विकासकामे केली आहेत. काही जणांना निवडणूक जवळ आली की नातेसंबंध आणि भावकी आठवते; परंतु मतदार सुज्ञ आहेत. कोणाच्याही पोकळ आश्‍वासनांवर विश्‍वास ठेवणार नाहीत. 
ऍड. नीलेश निकम (राष्ट्रवादी कॉंग्रेस) : काही उमेदवारांची पैशाची मस्ती या निवडणुकीत मतदारच जिरवणार आहेत. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि पदाधिकाऱ्यांनी केलेल्या विकासकामांवर मतदारांचा विश्‍वास असून, त्याचा अनुभव या निवडणुकीत येईल.
हरीश निकम (शिवसेना) : पैसे फेकून मतदान मिळते, असे कोणाला वाटत असेल तर तो भ्रम आहे. प्रभागातील विकासकामे रखडली आहेत. एखाद्याला किती वेळा संधी द्यायची? मतदारांना आता बदल हवा आहे आणि तो निवडणुकीत निश्‍चित होणारच आहे. 
शाम माने (मनसे) : धनशक्ती विरुद्ध जनशक्ती, असा लढा या प्रभागात पाहायला मिळणार आहे. सामान्य कार्यकर्त्यांच्या बळावर येथील निवडणूक होणार आहे. राज ठाकरे यांच्या कल्पनेतील प्रभागाचा विकास येथे साकारला जाणार आहे. त्या बांधिलकीमुळे मतदार मनसेची निवड करतील. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com