
विद्यापीठातर्फे शैक्षणिक सत्राचे सुधारित वेळापत्रक जाहीर
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या दुसऱ्या सत्रातील शैक्षणिक वर्षाचे सुधारित वेळापत्रक नुकतेच जाहीर केले आहे. त्यानुसार विद्यापीठातील विविध विभाग आणि महाविद्यालयांना अध्ययन- अध्यापनाची प्रक्रिया व त्या पद्धतीने कार्यवाही करणे क्रमप्राप्त ठरणार आहे.
वाणिज्य व व्यवस्थापन या विद्याशाखेअंतर्गत एमबीए, एमसीए (प्रथम वर्ष) अभ्यासक्रमाचे पहिले सत्र १८ एप्रिल रोजी संपणार असून दुसरे सत्र २ मे पासून सुरू होईल. तसेच एमसीए(द्वितीय/तृतीय वर्ष) , कॉमर्स या अभ्यासक्रमांचे पहिले सत्र मार्चमध्ये संपले आहे. एमसीएचे दुसरे सत्र १८ एप्रिलला सुरू होईल. त्याचप्रमाणे मानवविज्ञान विद्याशाखेंतर्गत कला, सामाजिक शास्त्र या अभ्यासक्रमाचे पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे पहिले सत्र १५ मार्चला संपले आहे. आता दुसरे सत्र २१ मार्चपासून सुरू झाले आहे. दुसऱ्या सत्रासाठी साधारणत: २७ जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखेंतर्गत विज्ञान, बी.फार्मसी, एम. फार्मसी, आर्किटेक्चर अभ्यासक्रमाचे पहिले सत्र मार्चमध्ये तर अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचे पहिले सत्र ६ एप्रिल रोजी संपले आहे. अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षाचे दुसऱ्या सत्रासाठी ११ एप्रिल ते १५ जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यानुसार अध्ययन-अध्यापनाची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.
त्याचप्रमाणे आंतरविद्या शाखीय विद्या शाखेअंतर्गत शारीरिक शिक्षण, शिक्षणशास्त्र, ग्रंथालयशास्त्र या अभ्यासक्रमांचा समावेश आहे. एम.पी.एड, एम.एड (प्रथम वर्ष) अभ्यासक्रमाचे दुसरे सत्र २ मे ते ३० सप्टेंबर, तर बी.पी.एड (प्रथम वर्ष) अभ्यासक्रमाचे दुसरे सत्र ८ जूनला सुरू होऊन २६ सप्टेंबरदरम्यान संपेल, असे विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले आहे. विद्यापीठाने प्रत्येक अभ्यासक्रमनिहाय शैक्षणिक सत्राचे वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर दिले आहे.
Web Title: Pune University Announces Revised Schedule Second Semester Undergraduate And Postgraduate Courses
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..