पुणे विद्यापीठात लोकशाहीची गळचेपी; विद्यार्थ्यांवर फौजदारी गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 ऑगस्ट 2019

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी जेवणाचा न्याय्य हक्क मागितला तरी फौजदारी गुन्हा दाखल करून विद्यार्थ्यांचे भवितव्य विद्यापीठाने अडचणीत आणले आहे.

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी जेवणाचा न्याय्य हक्क मागितला तरी फौजदारी गुन्हा दाखल करून विद्यार्थ्यांचे भवितव्य विद्यापीठाने अडचणीत आणले आहे.

विद्यापीठात लोकशाहीची गळचेपी सुरू असल्याची टीका आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी पत्रकार परिषदेत केली. रिफेक्‍टरीत (खानावळ) जेवण मिळावे, यासाठी विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते. बारा विद्यार्थ्यांवर पोलिसांनी ३५३ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या विद्यार्थ्यांचा सोमवारी (ता. ५) जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन येथे सत्कार सोहळा आयोजित केल्याची माहिती युवक क्रांती दलाचे संघटक जांबुवंत मनोहर यांनी दिली. कुणाल सपकाळ, आकाश भोसले याच्यासह दिलीपसिंग विश्वकर्मा, रूपाली ठोंबरे, सतीश पवार, संदीप बर्वे उपस्थित होते.

सपकाळ म्हणाला, ‘‘रिफेक्‍टरीच्या बदलत्या नियमांनुसार एका ताटात दोघांनी जेवण करू नये आणि सदस्यत्व घेतल्याशिवाय जेवण दिले जाणार नाही, असे आहे. हे परिपत्रक विद्यापीठाने काढल्यामुळे रागाचा उद्रेक होऊन विद्यार्थ्यांनी घोषणा देऊन भूमिका स्पष्ट केली. नवा नियम दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांसाठी अन्यायकारक असल्याने हा उद्रेक झाला. या वेळी आंदोलनाचा उद्देश नव्हता; पण गुन्हेगार ठरविण्याचा प्रयत्न विद्यापीठाने केला.’’ भोसले म्हणाला, ‘‘एकीकडे शिक्षणमंत्री आंदोलनाला पाठिंबा देण्याची वक्तव्ये करतात, तर दुसरीकडे विद्यापीठ प्रशासन विद्यार्थ्यांना तुरुंगात पाठवत आहे. सरकारकडून दबाव यंत्राचा वापर केला जात आहे. पुण्यात ‘जेएनयू’ची पुनरावृत्ती घडविण्यास विद्यापीठ प्रवृत्त करत आहे.’’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune University Democracy Food Student