पुणे : विद्यापीठाच्या परीक्षांचा निकाल लांबणार?

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 नोव्हेंबर 2019

- उत्तरपत्रिका तपासण्यास प्राध्यापक उदासीन; प्रशासनाकडून कारवाईचा इशारा

पुणे : विद्यापीठ कायद्यानुसार प्राध्यापकांना उत्तरपत्रिका तपासणे अनिवार्य आहे. पण, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांमधील प्राध्यापकांना या कामाचा कंटाळा आला आहे. त्याचा थेट परिणाम परीक्षांच्या निकालावर होण्याची शक्‍यता आहे. प्राध्यापकांनी उत्तरपत्रिका तपासणी केली नाही, तर त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा विद्यापीठ प्रशासनाने दिला आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या पुणे, नगर, नाशिक या जिल्ह्यांमधील पदवी, पदव्युत्तर यासह इतर अभ्यासक्रमांच्या प्रथम सत्राच्या परीक्षा दिवाळीपूर्वी आणि दिवाळीनंतर झालेल्या आहेत. या उत्तरपत्रिका केंद्रीय मूल्यमापन केंद्रात (कॅप सेंटर) तपासणीसाठी एकत्र केल्या जातात. तेथून संबंधित विषयांच्या प्राध्यापकांना त्या तपासण्यासाठी दिल्या जातात. त्यानुसार गेल्या दोन दिवसांपासून कॅप सेंटर येथे उत्तरपत्रिका तपासण्याचे काम सुरू झाले आहे.

विद्यापीठांकडून महाविद्यालयांना पत्र पाठवून या कामासाठी प्राध्यापक उपलब्ध करून देण्याच्या सूचना परीक्षा व मूल्यमापन मंडळाने दिल्या आहेत. परंतु, अद्याप अनेक प्राध्यापक हे काम करण्यासाठी तयार नाहीत. विविध कारणे देत उत्तरपत्रिका तपासणीस ते टाळाटाळ करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्याबाबतचा अहवालही परीक्षा व मूल्यमापन मंडळाकडे आला आहे.

मुंबईकरांनो तुम्हाला मिळतंय शुद्ध पाणी; राजधानी तळालाच

विद्यापीठाला परीक्षा झाल्यानंतर 35 दिवसांच्या आत निकाल जाहीर करावा लागतो. मात्र, प्राध्यापकांच्या उदासीनतेमुळे या कामावर परिणाम होत असून, पर्यायी प्राध्यापकांची व्यवस्थाही करावी लागत आहे. नवीन विद्यापीठ कायद्यांतर्गत संबंधित प्राध्यापकांना नोटिसा पाठविण्यात येणार असल्याचे परीक्षा मंडळाच्या वतीने सांगण्यात आले.

उत्तरपत्रिकांची तपासणी करण्यास ऐनवेळी नकार देणाऱ्या प्राध्यापकांकडून लवकरच लेखी खुलासा मागविण्यात येईल. त्यानंतर तो प्रतोद समितीपुढे ठेवून त्यांच्यावर कारवाई केली जाईल. तसेच, निकाल वेळेवर जाहीर करण्यासाठी विद्यापीठाकडून पर्यायी यंत्रणा निर्माण केली जाईल.

- डॉ. अरविंद शाळिग्राम, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune University Exams Results may delay