'हॉस्टेल रुम खाली करा'; ऐन परीक्षेच्या धामधुमीत उडालाय विद्यार्थ्यांचा गोंधळ!

ब्रिजमोहन पाटील
Sunday, 27 September 2020

पुढील वर्षाच्या वसतिगृह प्रवेशाचे नियोजन करायचे आहे, त्यामुळे जे विद्यार्थी अंतिम वर्षात शिक्षण घेत आहेत त्यांनी 3 ऑक्‍टोबर पर्यंत त्यांचे साहित्य घेऊन जाऊन खोलीचा ताबा विद्यापीठाकडे द्यावा.

पुणे : अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना परीक्षेचे टेंशन असताना त्यातच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वसतिगृह विभागाने 3 ऑक्‍टोबर पर्यंत विद्यार्थ्यांनी खोलीचा ताबा विद्यापीठाकडे द्यावा, अन्यथा साहित्य बाहेर काढून ताबा घेतला जाईल, असे परिपत्रक वसतिगृह विभागाने काढल्याने विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला. यानंतर कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी ज्या विद्यार्थ्यांना शक्‍य आहे त्यांनी साहित्य घ्यावे, असे स्पष्टीकरण दिले.

'एमसीव्हीसी'च्या विद्यार्थ्यांचे भविष्य येणार धोक्यात; अभ्यासक्रम बदलण्याचा राज्य सरकारचा घाट!

पुणे विद्यापीठाने कोरोनामुळे विद्यार्थ्यांना वसतिगृह सोडण्याचे आदेश दिले होते. त्यावेळी विद्यार्थी मोजके साहित्य आणि कपडे घेऊन गावाकडे गेले. त्यामुळे विद्यार्थ्यांची पुस्तके, लॅपटॉप, शैक्षणिक कागदपत्रे हे वसतिगृहातील खोल्यांमध्ये आहे. अंतिम वर्षाची परीक्षा तोंडावर आलेली असताना अनेकांची पुस्तके वसतिगृहात असल्याने त्यांना अभ्यास करता येत नाही. विद्यापीठाने विद्यार्थ्यांना साहित्य घेऊन जाण्यासाठी व्यवस्था केली होती, त्याचाही लाभ अनेक विद्यार्थ्यांनी घेतला आहे.

मऱ्हाठमोळ्या शास्त्रज्ञाला भटनागर पुरस्कार जाहीर!​

विद्यापीठाच्या वसतिगृह विभागाने शुक्रवारी (ता.25) परिपत्रक काढले. त्यामध्ये पुढील वर्षाच्या वसतिगृह प्रवेशाचे नियोजन करायचे आहे, त्यामुळे जे विद्यार्थी अंतिम वर्षात शिक्षण घेत आहेत त्यांनी 3 ऑक्‍टोबर पर्यंत त्यांचे साहित्य घेऊन जाऊन खोलीचा ताबा विद्यापीठाकडे द्यावा. जे विद्यार्थी खोलीचा ताबा देणार नाहीत, त्यांचे साहित्य वसतिगृह कक्षात ठेवले जाईल असे त्यात नमूद केले. खोलीतील साहित्य हलविले जाणार असल्याने विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला. अनेक विद्यार्थी मराठवाडा, विदर्भासह परप्रांतात आहेत. त्यामुळे लगेच पुण्यात येणे शक्‍य नसल्याने काम करावे त्यांना कळेना. याबाबत काही विद्यार्थ्यांनी विद्यापीठ प्रशासनाकडे तक्रार केल्यानंतर सारवासारव करण्यात आली.

कुलसचिव डॉ. पवार म्हणाले, "पुढील वर्षाच्या प्रवेशाच्या दृष्टीने सॅनिटाझेशन, स्वच्छता यासाठी तयारी करायचे आहे. त्यामुळे वसतिगृह विभागाने परिपत्रक काढले आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना शक्‍य त्यांनी सहकार्य करावे, इतरांसाठी मुदत वाढवून दिली जाईल.'' 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune University Hostel department ordered students to vacate their rooms by October 3