Pune News: विद्यापीठ चौकातील उड्डाणपूलाचे काम तातडीने सुरु करावे - सिद्धार्थ शिरोळे

विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली
Pune
Pune Sakal

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील दुमजली उड्डाणपुलाचे काम तातडीने हाती घ्यावे. जानेवारी 2024 पर्यंत हा पूल वाहनचालकांना उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी गुरुवारी पुणे एकीकृत महानगर परिवहन प्राधिकरणाच्या (PUMTA) बैठकीत केली.

विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलीस उपआयुक्त वाहतूक विभागाचे विजय मगर, पीएमपीएमएलचे अधिकारी, पीएमआरडीएचे अधिकारी, स्मार्ट सिटीचे अधिकारी, टाटा कंपनीचे अधिकारी, पिंपरी – चिंचवड मनपाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. बैठकीत विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाचा आढावा घेण्यात आला.

विद्यापीठ चौकातील जुना उड्डाणपूल जुलै २०२० मध्ये पाडण्यात आला. तेव्हापासून गेली अडीच वर्षे तेथे रोजच वाहतुकीची कोंडी होत आहे. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात शिरोळे यांनी लक्षवेधी सुचनेद्वारे या समस्येकडे लक्ष वेधले. त्यावेळी याबाबत पुम्टा ची तातडीने बैठक घेण्यात येईल असे आश्वासन कॅबिनेट मंत्री दीपक केसरकर यांनी विधानसभेत दिले होते. त्यानुसार पुम्टा ची बैठक २२ सप्टेंबर रोजी झाली.

हिंजवडी – शिवाजीनगर मेट्रो चे काम करणाऱ्या टाटा कंपनी आणि पीएमआरडीए यांनी नोव्हेंबर 2024 पर्यंत नवीन पूल बांधण्याचे नियोजन केले होते. मात्र वाहन चालकांचा त्रास कमी करण्याच्या उद्देशाने पुलाचे बांधकाम एक वर्षात पूर्ण करण्याची शिरोळे यांची आग्रही मागणी पुम्टाच्या बैठकीत मान्य करण्यात आली. त्या कामाचा आढावा घेण्यासाठी पुम्टाची बैठक बोलावण्यात आली होती.

विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी उड्डाणपूल जानेवारी 2024 पर्यत पूर्ण करण्यासाठी तातडीने या कामातील सर्व अडथळे दूर करण्याची सूचना केली. तसेच मॉडर्न कॉलेज येथील रस्ता सुद्धा लवकरात लवकर करावा. विद्यापीठातून भोसलेनगर कडे जाणाऱ्या नवीन पर्यायी मार्गाचे नियोजन करावे पदपथ कमी करून वाहनांसाठी ज्यादा जागा उपलब्ध करून द्यावी.

वाहतूक पोलिसांनी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी योग्य ते नियोजन करावे अशा सूचना त्यांनी दिल्या. सर्व सबंधित विभागांनी सातत्याने समन्वय ठेऊन हे काम गतीने पूर्ण करावे अशी सूचना राव यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com