पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्राचे लवकरच शैक्षणिक संकुल

रविवार, 12 जानेवारी 2020

- उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांची माहिती - तळकोकणासाठी स्वतंत्र विद्यापीठ

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्राचे सक्षमीकरण करण्यासाठी तेथे शैक्षणिक संकुलाचे पुढील दोन महिन्यांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते भूमिपूजन केले जाणार आहे. यामध्ये एका भागात शैक्षणिक विभाग आणि दुसऱ्या भागात वसतिगृह असणार आहे, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी शनिवारी दिली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुणे विद्यापीठाच्या कामकाजाचा उदय सामंत यांनी आज आढावा घेतला. त्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना सामंत म्हणाले, "नाशिक आणि नगर उपकेंद्राच्या सक्षमीकरणावर बैठकीत चर्चा झाली. तेथे विद्यार्थ्यांना आवश्‍यक सुविधा पुरविण्याकडे आमचे लक्ष आहे. विद्यापीठात शिकणाऱ्या सात लाख विद्यार्थ्यांपैकी दोन लाख विद्यार्थी त्या भागातील आहेत. त्यांच्यासाठी हे सक्षमीकरण महत्त्वाचे असेल.

नाशिक येथील उपकेंद्राच्या जागेतून महामार्ग गेला आहे. त्यामुळे जमिनीचे दोन भाग झाले असून, एका भागात विविध विभाग आणि दुसऱ्या विभागात वसतिगृह असेल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः यामध्ये लक्ष घातले आहे. पुढील दोन महिन्यांत शैक्षणिक संकुलाचे भूमिपूजन होईल.'' या वेळी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, उच्च शिक्षण विभागाचे संचालक धनराज माने आदी उपस्थित होते. 

तळकोकणासाठी स्वतंत्र विद्यापीठ 

"कोकणचा भाग हा मुंबई विद्यापीठाशी संलग्न आहे, परंतु तळकोकणातील विद्यार्थ्यांसाठी मुंबई विद्यापीठ सोयीचे नाही. त्यामुळे तळकोकणासाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्यात येणार आहे. त्यासाठी समिती नियुक्त करण्यात आली आहे. या विद्यापीठात पारंपरिक अभ्यासक्रम न शिकवता त्यात विकासाच्या दृष्टीने मासेमारी, कौशल्य विकास, पर्यटन अशा प्रकारचे नवीन अभ्यासक्रम सुरू केले जातील. कोकणातील 83 महाविद्यालयांतील 45 हजार विद्यार्थ्यांना याचा फायदा होऊ शकतो,'' असे सामंत यांनी सांगितले. 

विद्यापीठांच्या परिसरात अस्वस्थतेचे वातावरण नको यासाठी विद्यार्थी संघटनांशी चर्चा केली जाईल. भविष्यात विद्यापीठांमध्ये होणारी आंदोलने तपासून पाहिली जातील. आंदोलन करायला कोणी विद्यार्थ्यांना भाग पाडत आहे की विद्यार्थी उत्स्फूर्तपणे आंदोलन करतात हे तपासले जाणार आहे. 

- उदय सामंत, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री