Shaniwarwada
Shaniwarwada

पुणेकरांना उद्यापासून घडणार ‘वारसा दर्शन’

पुणे - भारताला हजारो वर्षांचा वैभवसंपन्न ऐतिहासिक वारसा लाभला आहे. हा इतिहास जसा ग्रंथांमध्ये असतो, तसाच तो जेथे घडला तेथील वस्तूंमध्येही असतो. त्या ऐतिहासिक स्थळांना प्रत्यक्ष भेट देऊन इतिहास तज्ज्ञांकडून त्याचा इतिहास समजावून घेणे म्हणजे ‘वारसा दर्शन’ होय. 

अशा अनेक ऐतिहासिक वारशाने पुणे शहर समृद्ध आहे. तिथे घडलेल्या अद्‌भुत कथा जाणून घेणे ही इतिहास प्रेमींसाठी पर्वणीच ठरणार आहे. त्यासाठी ‘सकाळ’ आणि ‘इतिहास प्रेमी मंडळ’ वर्षभरासाठी ‘वारसा दर्शन’ हा कार्यक्रम राबवणार आहेत. 

यामध्ये शनिवार वाडा, शिंदे छत्री, पाताळेश्‍वर लेणी, आगाखान पॅलेस, विश्रामबागवाडा, मंडई, तुळशीबाग अशा वास्तू असतील. तसेच भांडारकर प्राच्यविद्या मंदिर, भारत इतिहास संशोधन मंडळ अशा शतकपूर्ती केलेल्या संस्था, समाजसुधारक व साहित्यिक यांची निवासस्थाने, मंदिरे, मशीद, गुरुद्वारा अशी प्रार्थना स्थळे, एन.सी.एल, आयुका अशा आधुनिक संशोधन संस्था, प्राचीन पुण्याचे अवशेष अशा विविध स्थानांना भेटी दिल्या जाणार आहेत. या भेटीत त्या-त्या विषयातील तज्ज्ञ मार्गदर्शक ‘वारसा दर्शन’ची माहिती सांगणार असल्याने इतिहास प्रेमी पुणेकरांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन इतिहास प्रेमी मंडळाचे अध्यक्ष मोहन शेटे यांनी केले आहे. 

सुरवात शनिवार वाड्यापासून
अटकपासून कटकपर्यंत पसरलेल्या मराठी साम्राज्याची राजधानी. भारतीय राजकारणावर सतत ८० वर्षे हुकमत ठेवणारे सत्ता केंद्र म्हणजे शनिवार वाडा. या शनिवार वाड्याचे भूमिपूजन झाले १० जानेवारी १७३० रोजी, तर वास्तूशांत झाली २२ जानेवारी १७३२ रोजी. तसेच ‘बचेंगे तो और भी लडेंगे’ म्हणणाऱ्या दत्ताजी शिंदे यांचा स्मृतिदिन १० जानेवारीला; तर ‘दोन मोत्ये गळाली, सत्तावीस मोहरा हरपल्या, अशा विलक्षण पराक्रमाच्या पानिपत युद्धाचा शौर्य दिन १४ जानेवारी! म्हणूनच ‘वारसा दर्शन’ या उपक्रमाची सुरवात आपण रविवारी (ता. २०) शनिवार वाड्यापासून करीत आहोत.

या कार्यक्रमात ज्यांना सहभागी व्हायचे आहे, त्यांनी येत्या रविवारी (ता. २०) सकाळी नऊ वाजता शनिवार वाड्याच्या मुख्य दरवाजा समोरील व्यासपीठावर जमावे. या कार्यक्रमाला कोणतेही शुल्क नाही. मात्र, शनिवार वाड्यात प्रवेश करण्यास १४ वर्षांवरील सर्वांना २५ रुपये शुल्क आहे. हा कार्यक्रम सकाळी ९ ते ११ या वेळेत होईल. माहितीसाठी : ९८५०४२५८५१ किंवा ८२७५७३५१६७ यावर संपर्क साधावा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com