Pune Wall Collapse : ...अन्‌ मित्रांचा आवाज भिंतीखाली दबला

पुणे - कोंढवा खुर्द परिसरातील अल्कॉन स्टायलस सोसायटीची सीमाभिंत शुक्रवारी मध्यरात्री कोसळल्यानंतर घटनास्थळी असे विदारक चित्र होते.
पुणे - कोंढवा खुर्द परिसरातील अल्कॉन स्टायलस सोसायटीची सीमाभिंत शुक्रवारी मध्यरात्री कोसळल्यानंतर घटनास्थळी असे विदारक चित्र होते.

पुणे - आम्ही सर्व जण बांधकाम साइटवरील काम उरकून जेवण करून झोपी गेलो होतो. दिवसभर काम करून थकल्याने गाढ झोपेत होतो. मात्र, रात्री दीडच्या सुमारास अचानक झालेल्या मोठ्या आवाजाने दचकून जागा झालो. घरातून बाहेर येऊन पाहिलं अन्‌ काळजात धस्स झालं...ढिगाऱ्याखालून येणारा मित्रांच्या ओरडण्याचा आवाज कानावर आला; पण काही क्षणातच तो आवाजही ढिगाऱ्याखाली दबला गेला...

बांधकाम मजूर म्हणून काम करणारा दीपक कापऱ्या आवाजात सांगत होता. डोळ्यांदेखत आपल्या सोबत्यांवर काळानं घातलेला घाला त्याच्या जिव्हारी लागला होता. त्यातूनही कसाबसा सावरत तो घडलेल्या घटनेबाबत माहिती देत होता.

दीपक करमोकर हा मूळचा पश्‍चिम बंगालचा. बारावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर मामाबरोबर तो पुण्यात आला. मामाबरोबरच तो बांधकामाच्या साइटजवळ पत्र्याच्या शेडमध्ये राहून मजूर म्हणून काम करतो. दुर्घटना घडली त्याच्या समोरील बाजूला त्याच्यासह अन्य काही मजुरांच्या शेडची सोय करण्यात आली आहे. 

दीपक म्हणाला, ‘‘रात्री दीडच्या सुमारास झालेल्या आवाजाने मला जाग आली. बाहेर पाऊस पडत असल्याने वीज कडाडली असावी, असे वाटले. मात्र, काही क्षणांत आरडाओरडा ऐकू आला. त्यामुळे मी घराबाहेर आलो. समोर पाहतो तर सोसायटीच्या भिंतीच्या ढिगारा कामगारांच्या झोपड्यांवर कोसळला होता. नेमके काय झाले ते कळत नव्हते. रोज एकत्र काम करणाऱ्या माझ्या काही सोबत्यांचा आकांतही त्या ढिगाऱ्याखालून कानावर येत होता. मात्र, काही क्षणात तो आवाजही भिंतीखाली दबला गेला. या प्रकारामुळे मी सुन्न झालो होतो. रोज एकत्र काम करणारे, एका ताटात जेवणाऱ्या माझ्या मित्रांचे मृतदेह समोर दिसत होते.’’

या घटनेमध्ये दोन्ही बिल्डरांचा हलगर्जीपणा झाला आहे. सीमाभिंतीला लागून कामगारांची घरे बांधणे चुकीचेच आहे. यातील दोषींवर कडक कारवाई केली जाईल, तसेच या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती नेमली जाईल.
- विजय शिवतारे, राज्यमंत्री 

या सोसायटीतील रहिवाशांनी बांधकामाची तक्रार करूनही प्रशासनाकडे लक्ष दिले नाही. १५ जणांचा बळी गेला. प्रत्येकाला पाच लाख रुपये दिले म्हणून जीव परत येणार आहे का? अशा गोष्टी गांभीर्याने घेऊन त्यावर कार्यवाही करणे गरजेचे आहे. या दुर्घटनेची सरकारने नैतिक जबाबदारी घेतली पाहिजे.
- सुप्रिया सुळे, खासदार

घटनाक्रम 
  काल (ता. २८) दिवसभर काम करून कामगार आणि त्यांचे कुटुंबीय झोपले.
  पावसामुळे आधीच तडे गेलेल्या संरक्षक भिंतीभोवतीची जमीन खचली.  
  शनिवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास संरक्षक भिंत कोसळली.
  कामगारांच्या झोपड्यांवर भिंत कोसळून मोठा आवाज. 
  बहुतांश कामगार, त्यांचे कुटुंबीय गाढ झोपल्याने ते भिंतीखाली गाडले गेले.
  भिंतीलगत लावलेल्या चारचाकी गाड्या, मातीच्या ढिगाऱ्याखाली झोपड्या झाकल्या.
  आवाजाने सोसायटीतील रहिवासी धावत आले. 
  रहिवाशांकडून तत्काळ अग्निशामक दल आणि पोलिसांना माहिती.  
  अंधार व पावसामुळे ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्यात अडचण. 
  पोलिसांकडून राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन विभाग (एनडीआरएफ) पाचारण.  
  काही वेळातच ‘एनडीआरएफ’चे पथकही घटनास्थळी दाखल.
  एनडीआरएफने भिंतीचा भाग, माती, वाहने बाजूला काढून १५ मृतदेह बाहेर काढले.
  जखमींना उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दुर्घटनेतील मृतांची नावे
अलोक शर्मा (वय २८), मोहन शर्मा (वय २४) ,अमन शर्मा (वय १९), रवी शर्मा (वय १९), लक्ष्मीकांत सहानी (वय ३३), सुनील सिंग (वय ३५), ओवी दास (वय २), सोनाली दास (वय ६), भीमा दास (वय ३८), संगीतादेवी (वय २६), अजितकुमार शर्मा (वय ७), रेवालकुमार शर्मा (वय ५), निवादेवी (वय ३०), दीपरंजन शर्मा (वय ३०), अवधेश सिंग (वय ३०) (सर्व रा. बिहार)

दुर्घटनेतील जखमींची नावे
पुष्पादेवी (वय २८), अजय शर्मा (वय १९), विमल शर्मा (वय १८) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com