Pune Wall Collapse : साखरझोपेतच त्यांना गाठले मृत्यूने

कोंढवा - भिंत कोसळल्यामुळे मजुरांची गाडलेली घरे.
कोंढवा - भिंत कोसळल्यामुळे मजुरांची गाडलेली घरे.

पुणे - हाताला काम, पोटाला भाकरी आणि राहायला आसरा मिळेल म्हणून ते आपल्या लेकराबाळांसह बिहारमधून पुण्यात आले. कोंढव्यातील एका बांधकाम प्रकल्पावर ते काम करीत होते; तिथेच एका सोसायटीच्या सीमाभिंतीच्या आधारावर असलेल्या झोपड्यांत राहू लागले. नेहमीप्रमाणे शुक्रवारी दिवसभर त्यांनी काबाडकष्ट केले, रात्री जेवले, एकत्र गप्पागोष्टीही केल्या आणि झोपले. मात्र, झोपेत असतानाच ज्या भिंतीने त्यांना आधार दिला, तीच भिंत भल्या पहाटे त्यांच्या संसारावर कोसळली आणि क्षणात होत्याचे नव्हते झाले. पंधरा जणांना मृत्यूने साखरझोपेतच गाठले!

बिहारमधील कटियार, वैशाली, कोंडीयाल या जिल्ह्यांमधील छोट्या-छोट्या खेड्यांतून अनेक मजूर पोट भरण्यासाठी पुणे, मुंबई व अन्य शहरांत दाखल होतात. त्याचप्रमाणे शर्मा, सिंह, देवी अशी कुटुंबे ओळखीच्या ठेकेदारासमवेत आपल्या कुटुंबकबिल्यासह कोंढव्यात दाखल झाली. तेथील एका बांधकाम प्रकल्पावर काही दिवसांपासून काम करीत होती.

दरम्यान, बांधकाम व्यावसायिकाने मजुरांना राहण्यासाठी शेजारील सोसायटीच्या सीमाभिंतीजवळच ‘ट्रांझिट कॅम्प’प्रमाणे झोपड्या थाटल्या. याच झोपड्यांत बांधकाम मजूर व त्यांचे कुटुंब गेल्या काही दिवसांपासून वास्तव्य करीत होते. शुक्रवारी दिवसभर मजुरांनी इमारतीमध्ये काम केले. त्यानंतर सर्वांनी सायंकाळी काम संपल्यानंतर एकत्र गप्पागोष्टी केल्या. एकत्रित जेवणही केले. थोडावेळ आपल्या मुलांसमवेत खेळण्यात घालविला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी कामावर लवकर जाण्यासाठी सगळे जण झोपी गेले ते परत कधीच न उठण्यासाठी.

लहानग्यांच्या मृत्यूचा चटका 
रेखाल, अजित, ओवी, सोनाली ही सगळी बांधकाम मजुरांची मुले. कोणी दहा वर्षांचे, तर कोणी पाच, दोन, आठ वर्षांचे. आपले आई-वडील कामाला गेल्यावर ही बच्चेकंपनी एकत्रित खेळायची, बागडायची. कधी-कधी आई-वडिलांना त्यांच्या कामात आपल्या चिमुकल्या हातांनी मदतही करीत होती. सकाळी-सायंकाळी झोपड्यांसमोरील मोकळ्या जागेत मनसोक्त बागडत होती. शुक्रवारी सायंकाळीही ते सर्वजण एकत्र खेळले. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून पुन्हा भरपूर खेळू, असे त्यांनी एकमेकांना सांगितले. पण, त्यांच्या आयुष्यात दुसऱ्या दिवसाची सकाळ उगवलीच नाही. त्यांच्या जाण्याने इतरांच्या जिवाला चांगलाच चटका लागला.

त्यांच्या मृत्यूस जबाबदार कोण?
संबंधित घटनेस बांधकाम व्यावसायिकाचा बेजबाबदारपणा कारणीभूत असल्याचे निदर्शनास आले. त्याचबरोबर कामगारांना राहण्यासाठी बांधलेले ‘ट्रांझिट कॅम्प’ सुरक्षित ठिकाणी बांधण्याऐवजी दुसऱ्या सोसायटीच्या सीमाभिंतीस लागून उभारले. या ट्रांझिट कॅम्पची महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी तपासणी करणे आवश्‍यक होते. प्रत्यक्षात त्यांनीही दुर्लक्ष केले. त्यामुळे बांधकाम व्यावसायिक, महापालिका अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळेच ही दुर्घटना घडल्याची माहिती पुढे येऊ लागली.

खरंच माणूस बदलत आहे. पैसे, व्यवस्था, विचार हे सर्व जबाबदार आहेतच, पण लहानपणापासूनची जडणघडण ही अशा वेळेस महत्त्वाची भूमिका निभावते. अपघात झाल्यावर मदत करणे किंवा तो होऊ नये म्हणून उपाययोजना करणे हे सर्वांत हुशार प्राणी म्हणजे माणसाच्या हातात आहे. पण लोभ, मत्सर बाजूला ठेवले तरच.
- कोशेर मुनोत 

पुण्याची मुंबई होत असल्याचा हा प्रश्‍न नाही.. प्रश्‍न समजून घेऊन त्यावर वेळीच योग्य उपाय शोधून, त्याची अंमलबजावणी करण्याची आपल्या सर्वांची मानसिकता नाही. त्यामुळे नवीन प्रश्‍न निर्माण होत आहेत.
- सुरेश

अत्यंत दुःखद घटना आहे. या घटनेला केवळ दुर्घटना म्हणून संबोधता, त्या गोरगरीब मजुरांवर व त्यांच्या कुटुंबावर जो दुःखाचा डोंगर कोसळला आहे, ते बांधकाम अनधिकृत होते का याचा मागोवा घेणे इष्ट ठरेल.
- नागेश फडणीस 

पुणे कोंढवा परिसरात मध्यरात्री मजुरांच्या झोपड्यांवर संरक्षक भिंत कोसळून झालेल्या दुर्दैवी अपघातात मृत्युमुखी पडलेल्या मजुरांना भावपूर्ण श्रद्धांजली. बिल्डरवर मनुष्यवधाचा गुन्हा तातडीने दाखल व्हायला हवा.
- ॲड. दिनेश रायकोड 

दुर्घटना घडून पाच-दहा चिरडले जात नाहीत, तोपर्यंत प्रशासन व नेत्यांना जाग येत नाही... पण मरतो फक्त माणूस... ही वस्तुस्थिती आहे.
- संतोष शिंदे

पुणे येथील गृहनिर्माण संकुलाची भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत निरपराध कामगार, महिला व मुलांना जीव गमवावा लागला हे समजून अतिशय दुःख झाले. गमावलेला प्रत्येक जीव मोलाचा होता. या दुर्घटनेत मृत झालेल्या व्यक्तींच्या आप्तेष्टांना मी आपल्या शोकसंवेदना कळवतो. तसेच, सर्व जखमींना लवकर बरे वाटावे यासाठी प्रार्थना करतो. 
- विद्यासागर राव, राज्यपाल

ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. या घटनेला जे जबाबदार आहेत, त्या सर्वांवर कडक कारवाई केली जाईल. यातून कोणीही सुटू शकणार नाही. जखमी आणि मृतांच्या कुटुंबीयांना सरकारकडून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील.
- योगेश टिळेकर, आमदार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com