Pune Wall Collapse : कोंढवा, आंबेगाव दुर्घटना; ‘सीओईपी’चाही बिल्डरांवरच ठपका

Wall-Collapse
Wall-Collapse

पुणे - कोंढवा आणि आंबेगाव येथे सीमाभिंत कोसळून २१ जणांचा जीव गेल्याच्या दुर्घटनांना बांधकाम व्यावसायिकच जबाबदार असल्याचे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (सीओईपी) अहवालातून स्पष्ट झाले आहे. या सीमाभिंतींचे बांधकाम आणि रचनेत दोष असल्याचे दाखवितानाच सीमाभिंतींचा उर्वरित भाग तातडीने उतरविण्याची गरज आहे, असेही अहवालात स्पष्ट केले आहे. त्यानुसार पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे महापालिकेच्या बांधकाम खात्याकडून सांगण्यात आले.

दरम्यान, सीमाभिंतीच्या रचनेत दोष असले तरी, अल्कॉन स्टायलस या सोसायटीच्या इमारतीला धोका नसल्याचेही अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. कोंढव्यातील अल्कॉन स्टायलस या इमारतीची सीमाभिंत कोसळून १५ आणि आंबेगावातील घटनेत ६ जणांना जीव गमवावा लागला. या दोन्ही घटनास्थळांची पाहणी करून महापालिकेच्या बांधकाम खात्याने संबंधित बांधकाम व्यावसायिकांना नोटिसा बाजविल्या होत्या. तसेच, त्यांच्याकडील परवान्यांना स्थागिती दिली आहे. दरम्यान, या घटनांची कारणे जाणून घेण्यासाठी ‘सीओईपी’तील तज्ज्ञांकडून तपासणी करण्यात आली.

त्याबाबतचा अहवाल ‘सीओईपी’ने सोमवारी महापालिकेच्या बांधकाम खात्याला दिला. बांधकामाचा दर्जा आणि रचनेतील दोष दाखवताना या दोन्ही घटना बांधकाम व्यावसायिकांच्या बेजबाबदारपणामुळेच घडल्याचा ठपका अहवालात ठेवला आहे. 

दोषी बिल्डरवर कारवाईची मागणी
पुणे - कोंढवा आणि आंबेगाव बुद्रुक येथील सीमाभिंत दुर्घटनेप्रकरणी दोषींविरुद्ध कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. शहर काँग्रेस अल्पसंख्याक सेलचे अस्लम इसाक बागवान, यासीन शेख आदी उपस्‍थित होते.

बांधकाम व्यावसायिकांना काळ्या यादीत टाकणार
पुणे - सीमाभिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेप्रकरणी कोंढव्यातील अल्कॉन स्टायलस आणि आंबेगाव येथील बांधकाम व्यावसायिकांना कारणे दाखवा नोटीस बजावूनही गेल्या आठ दिवसांत त्यांनी महापालिकेकडे खुलासा केला नाही. त्यामुळे दोन्ही घटनांमधील बांधकाम व्यावसायिकांचा काळ्या यादीत समावेश करण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या बांधकाम खात्याने आयुक्त सौरभ राव यांच्याकडे पाठविला आहे. त्यावर आठ दिवसांत कार्यवाही होण्याची शक्‍यता आहे. 

या दोन्ही घटनांतील बांधकाम व्यावसायिकांनी मुदतीत खुलासा न केल्याने पुढील कार्यवाही करण्यात येत आहे, असे महापालिकेच्या बांधकाम खात्याचे अधीक्षक अभियंता युवराज देशमुख यांनी सांगितले. 

कोंढव्यातील घटनेत बांधकाम व्यावसायिक जगदीश अगरवाल यांच्यासह बांधकाम कंपनीचे संचालक आणि अभियंता, वास्तुविशारद (आर्किटेक्‍ट) यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली होती. आर्किटेक्‍टने खुलासा केला. मात्र, तो महापालिकने अमान्य केला आहे, तर अगरवाल यांच्यासह अन्य संचालक आणि अभियंत्याने खुलासा केलेला नाही. त्यामुळे त्यांचा काळ्या यादीत समावेश करण्याचा प्रस्ताव आयुक्त राव यांच्याकडे मांडला आहे. 
अल्कॉन स्टायलसशेजारील विकसक हेमेंद्र शहा, पंकज व्होरा यांच्यासह त्यांच्या ग्रुपमधील पदाधिकाऱ्यांना काळ्यात यादीत समावेश करण्याचा प्रस्ताव आहे. आंबेगावमधील दुर्घटनेप्रकरणी नोटीस देऊनही संतोष ऊर्फ बाळासाहेब दांगट यांनी खुलासा न केल्याने त्यांच्यावरही कारवाई करावी, असे प्रस्तावात म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com