Pune Wall Collapse : हातातले पुस्तक टाकले अन्‌ मदतीसाठी धावलो

ambegaon wall collapse
ambegaon wall collapse

पुणे - सोमवारी रात्री बाराच्या सुमारास घरात पुस्तक वाचत बसलो होतो. तेवढ्यात पत्र्यावर जोरात काहीतरी पडल्याचा आवाज आला, लोकही ‘बचाव-बचाव’ म्हणून जोरजोरात ओरडत होते. कामगारांच्या घरावर भिंत पडल्याचे लक्षात येताच हातातले पुस्तक टाकले आणि थेट मदतीसाठी धावलो. दोघांना कसेबसे इतरांच्या मदतीने बाहेर काढले; पण ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना वाचवू शकलो नाही, अशी खंत योगेश जाधव यांनी व्यक्त केली.

वाहनचालक म्हणून काम करणारे जाधव हे सौरभ पॅलेस इमारतीमध्ये पहिल्या मजल्यावर राहत आहेत. त्यांच्या गॅलरीतून या कामगारांच्या झोपड्या दिसत होत्या. घरात सर्वांची झोपायची तयारी सुरू असताना मी पुस्तक वाचत होतो. बाहेर मुसळधार पाऊस सुरू होता. तेवढ्यात धाडकन काही तरी पडल्याचा मोठा आवाज आला, आरडाओरडा सुरू झाला.

कामगारांच्या झोपड्यांवर भिंत पडल्याचे लक्षात येताच तसाच घरातून बाहेर पडलो. घरमालक व शेजाऱ्यांना याची माहिती दिली. घराशेजारी असलेल्या पोलिस चौकीकडे गेलो, सिंहगड इन्स्टिट्यूटचे वॉचमन आहेत का ते पाहिले. त्यांना हा प्रकार सांगितला. तेथून लगेच ज्यूसवाल्या भैयाला सोबत घेऊन झोपड्यांकडे धाव घेतली. त्याचवेळी अग्निशामक आणि पोलिसांनाही या घटनेची माहिती दिली. ढिगाऱ्याखाली अडकलेले काही जण मोठमोठ्याने ओरडत होते. ते बचावले असले तरी घाबरलेले होते, त्यांना काहीच कळत नव्हते. दोघांच्या अंगावर पडलेले पत्रे, सिमेंट, विटा, माती बाजूला काढून त्यांचे प्राण वाचविले. अजून काही जण अडकले होते, पण त्यांच्यावरील ढिगारा बाजूला काढणे शक्‍य झाले नाही. काही वेळातच अग्निशामक दलाचे जवानही तेथे आले आणि मदतकार्याला गती आली. ही घटना भयंकर होती, कमी वेळात जेवढे करता येईल तेवढे केले; तरीही सहा जणांचा जीव गेला याचे वाईट वाटते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com