pune wall collapse : चार महिन्यांपूर्वीच बिल्डरने लक्ष दिले असते तर...

pune
pune

पुणे : कोंढव्यात सीमाभिंत अंगावर कोसळून चार चिमुकल्यांसह पंधरा जणांचा बळी जाण्यामागे बिल्डरचे अक्षम्य दुर्लक्ष कारणीभूत असल्याचे समोर आले आहे. सीमाभिंत खचली असल्याची तक्रार स्थानिक रहिवाशांनी बिल्डरकडे चार महिन्यांपूर्वी केली होती. मात्र, त्याकडे बिल्डरने दुर्लक्ष केले. हीच भिंत निष्पाप जिवांचा काळ ठरली आहे. 

दुर्घटनाग्रस्त अल्कॉन स्टायलस सोसायटीत अडीच वर्षांपासून सदनिकाधारक राहण्यासाठी आले असले, तरी अद्याप ड्रेनेज लाइन, पाणी, गॅस लाइन, सुरक्षारक्षक, जनरेटर, सीसीटीव्ही, पार्किंग यांसह अनेक कामे प्रलंबित आहेत. त्यामुळे येथील रहिवाशांची सोसायटी स्थापन झाली नसून, सर्व व्यवस्थापन बिल्डरकडूनच केले जात आहे. 

रखडलेल्या कामांबाबत बिल्डरकडे अनेकदा तक्रारी करूनही काहीच होत नसल्याने रहिवाशांनी 18 फेब्रुवारीला सकाळी दहा वाजता बिल्डरला ई-मेल पाठवून त्यात 30 मुद्दे मांडले होते. त्यामध्ये 18वा मुद्दा हा धोकादायक सीमाभिंतीबाबत असून, त्यात सीमाभिंतीचा दर्जा निकृष्ट आहे, पंपहाऊस जवळील पार्किंगची जागा खचली आहे. त्याकडे लक्ष द्यावे, असे या ई-मेलमध्ये म्हटले होते. तरीही बिल्डरने काहीच उपाययोजना केली नाही. 

अडीच वर्षांपासून मी अल्कॉन स्टायलस सोसायटीत राहत आहे. येथील सीमाभिंत चुकीच्या पद्धतीने व निकृष्ट दर्जाची बांधली असल्याने अनेकदा बिल्डरकडे तोंडी तक्रार केली होती. बिल्डरने याकडे दुर्लक्ष केल्याने ही दुर्घटना ओढवली आहे. 
- डॉ. तरबेज पठाण, रहिवासी 

सोसायटीतील समस्यांबाबत रहिवासी आणि बिल्डर यांच्यामध्ये संवाद सुरू होता. पालिकेकडे याबाबत तक्रार आलेली नाही. 
- प्रशांत वाघमारे, शहर अभियंता, महापालिका 

धोका अजून टळलेला नाही 
"अल्कॉन स्टायलस' सोसायटीच्या मागच्या बाजूला "इपोरिया' नावाची सोसायटी आहे. या सोसायटीच्या बाजूला अल्कॉनची 20 फूट सीमाभिंत आहे. "इपोरिया' सोसायटीतील गाड्या या ठिकाणी पार्क केल्या जातात. मुलेही तेथे खेळतात. हे पार्किंगची जागा खचल्याची तक्रार बिल्डरला करण्यात आली आहे. तसेच सोसायटीतील पार्किंगमधील पाणी पेव्हिंग ब्लॉकमधून आतमध्ये झिरपत आहे. ही सर्व परिस्थिती पाहता. येथील धोका अद्याप टळलेला नाही. 

धोकादायक सीमाभिंतीकडे बिल्डरने दुर्लक्ष केल्याचे उघड; दोघांना अटक 
कोंढव्यातील इमारतीची सीमाभिंत लगतच्या झोपड्यांवर कोसळून चार चिमुकल्यांसह पंधरा जणांचा मृत्यू झाला. शनिवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास ही दुर्घटना घडली. याप्रकरणी दोघा बांधकाम व्यावसायिकांना पोलिसांनी रात्री अटक केली. या घटनेच्या चौकशीसाठी स्वतंत्र समिती स्थापण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. राज्य सरकारच्यावतीने मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपये मदत जाहीर करण्यात आली आहे. 

पूर्ण झालेल्या अल्कॉन स्टायलस या इमारतीशेजारी नव्या बांधकाम प्रकल्पाचे काम सुरू आहे. त्यासाठी बांधकाम मजुरांच्या झोपड्या सीमाभिंतीखालीच बांधल्या होत्या. गेले दोन दिवस सुरू असलेल्या संततधार पावसामुळे अल्कॉन स्टायलस अपार्टमेंटची सीमाभिंत मध्यरात्री खचली आणि या झोपड्यांवर कोसळली. सर्व मृतदेह ढिगाऱ्याखालून बाहेर काढले असून, अंत्यसंस्कार या मजुरांच्या बिहारमधील मूळ गावांमध्ये होणार आहेत. दुर्घटनेतील दोघा जखमींवर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

पुण्यातील बांधकाम क्षेत्र आजच्या दुर्घटनेमुळे पुन्हा एकदा चर्चेत सापडले आहे. बांधकामांचा दर्जा आणि सुरक्षितता हे मुद्दे ऐरणीवर आले आहेत. मुख्यमंत्र्यांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेत अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील चौकशी समितीची घोषणा केली. या समितीचे काम आणि कार्यकक्षा दिवसभरात जाहीर झालेली नव्हती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com