
पुणे : उंड्री-महंमदवाडीतील नागरिकांना लवकरच मिळणार पुरेसे पाणी
उंड्री: पालिका प्रशासनाने रामटेकडी-उंड्री दरम्यान जलवाहिनीचे काम पूर्ण झाले आहे. कडनगर चौक (उंड्री, ता. हवेली) येथे दोन बुस्टर बसवून पाण्याचा दाब वाढविण्यासाठी पालिका प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला. त्याला प्रशासनाने ग्रीन सिग्नल दिला असल्याने उंड्री-महंमदवाडीकरांच्या पिण्याच्या पाण्याचा मार्ग सुकर झाला आहे, असे ग्रामस्थांच्या वतीने राजेंद्र भिंताडे यांनी सांगितले.
याप्रसंगी सुनील पुणेकर, विजय टकले, शशिकांत पुणेकर, विठ्ठल भिंताडे, सचिन भिंताडे, हनुमंत घुले, ओंकार होले, अविनाश टकले, दादा कड आदी उपस्थित होते. भिंताडे म्हणाले की, उंड्री गावच्या पाण्याच्या टाकीत पाणी सोडले जाणार असून, तेथून ग्रामस्थ व गृहनिर्माण सोसायट्यांना पाणी मिळणार आहे. माजी महापौर मुरलीधर मोहोळ व माजी आमदार योगेश टिळेकर यांच्या निधीतून जलवाहिनी व बुस्टर बसविण्यासाठी मदत झाली, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, पालिकेचे उपअभियंता उमाकांत डिग्गीकर म्हणाले की, रामटेकडी येथून उंड्री येथील ऑर्चिड पॅलेस सोसायटीपर्यंत जलवाहिनी आहे. मात्र, हा परिसर उंचावर असल्याने पाणी कमी दाबाने जात होते, त्यामुळे नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नव्हते. त्यासाठी कडनगर चौकाजवळ बुस्टर (विद्युत पंप) बसवून पाण्याचा दाब वाढविल्याने परिसरातील गृहनिर्माण सोसायट्या आणि बैठ्या घरातील नागरिकांना पुरेसे पाणी मिळण्यास मदत होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
उंड्री (ता. हवेली) कडनगर चौकात बुस्टर बसविल्यामुळे उंड्री-महंमदवाडीतील ऑर्चिड पॅलेस, इशरतबाग, दोराबजी पॅराडाईज, अर्बन फेज-१, फे-२, सांगरिया सोसायटी आदी परिसरातील सुमारे सहा हजार नागरीवस्तीतील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा समस्या सुटण्यास मदत होईल, असे पालिकेचे कनिष्ठ अभियंता सोमनाथ वासकर यांनी सांगितले.
Web Title: Pune Water Citizens Undri Mahammadwadi Soon Get Enough
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..