पुणेकरांची पाण्यासाठी धावाधाव ; सलग तिसऱ्या दिवशी मध्यवर्ती भागात पाणीपुरवठा विस्कळित

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 एप्रिल 2018

देखभाल-दुरुस्तीसाठी गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद होता. पर्वती येथील पाणीपुरवठा करणाऱ्या सुमारे 30 कोटी लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीतील दरवाजा शुक्रवारी खाली पडला. त्यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागातील पाणीपुरवठा विस्कळित झाला. काही भागांत कमी दाबाने, तर काही भागांत पूर्णपणे पाणीपुरवठा बंद राहिला. 

पुणे : सलग तिसऱ्या दिवशी पाणीपुरवठा बंद राहिल्याने शहराच्या मध्यवर्ती भागातील नागरिकांना ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी धावाधाव करावी लागली. पर्वती येथील (जनता वसाहत) पाण्याच्या टाकीतील दरवाजा सटकल्याने शुक्रवार आणि शनिवारी सकाळी पाणी पुरवठा होऊ शकला नाही. मात्र रविवारी सकाळपासून पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे महापालिकेने कळविले आहे. 

देखभाल-दुरुस्तीसाठी गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद होता. पर्वती येथील पाणीपुरवठा करणाऱ्या सुमारे 30 कोटी लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीतील दरवाजा शुक्रवारी खाली पडला. त्यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागातील पाणीपुरवठा विस्कळित झाला. काही भागांत कमी दाबाने, तर काही भागांत पूर्णपणे पाणीपुरवठा बंद राहिला. 

महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता व्ही. जी. कुलकर्णी, अधीक्षक अभियंता प्रवीण गेडाम यांच्या मार्गदर्शनाखाली दरवाजा दुरुस्तीचे काम सुरू होते. दरम्यान, शनिवारी दुपारी काही भागातील पाणीपुरवठा सुरू केल्याचे कुलकर्णी यांनी नमूद केले. तत्पूर्वी काही भागांत टॅंकरने पाणी पुरविल्याचे आणि दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर मध्यवर्ती भागाचा पाणीपुरवठा सुरळीत होईल, असेही त्यांनी सांगितले. 

पर्वती येथील पाण्याच्या टाकीत 60 वर्षांपूर्वी बसविलेला दरवाजा खाली पडला तेव्हा टाकीत 18 फूट पाणी होते. त्यामुळे दरवाजा वरती उचलणे शक्‍य नव्हते. दीड टनाचा दरवाजा उचलण्यासाठी वापरलेल्या दोन लोखंडी साखळ्याही तुटल्या. त्यामुळे 10 टन वजन उचलण्याची क्षमता असलेली लोखंडी साखळी वापरली. हा दरवाजा पाच फुटांपर्यंत उचलण्यात यश आले असून, रात्रीपर्यंत तो पूर्ण उचलून पुन्हा बसवावा लागणार आहे. या काळात टाकीतील पाणी पूर्ण रिकामे होईल आणि ती टाकी पुन्हा भरावी लागणार आहे. 
 
- प्रवीण गेडाम, अधीक्षक अभियंता, महापालिका 
 
Web Title: Pune water irregular peoples are disappointed