पुणे : घोटभर पाणी नाही, तर कर का भरायचा; ग्रामस्थांचा संतप्त सवाल

समाविष्ट ग्रामस्थांसाठी मुलभूत सुविधा कोसो दूर
water scarity
water scarityesakal

उंड्री: बांधावरची गावे महापालिकेमध्ये समाविष्ट झाली, ग्रामपंचायतीचे नामफलक पुसून महापालिका प्रशासनाचे नामफलक झळकू लागले. पाणी, रस्ते, वीज, आरोग्य, शिक्षण, उद्यान, ओपन जीम अशा किमान सुविधांसाठी ग्रामस्थांसाठी कोसो दूर आहेत. पालिका प्रशासनाने शंभर टक्के करवाढ करून घरपट्टी प्रत्येकाच्या माथी मारली आहे. आम्ही कर भरण्यासाठी तयार आहोत, त्यासाठी किमान सुविधा तरी द्या, अशी टिप्पणी नागरिकांनी दिली.

शहरातील पेठांमध्ये २४ बाय ७ पाणी, रस्ते, वीज, ओपन जीम, उद्याने, करमणुकीसाठीची साधने सर्व काही उपलब्ध आहे. मात्र, आमच्याकडे यातील काहीच मिळत नाही, तर त्यांच्यापेक्षा दुप्पट कर का आकारल्याची तक्रार हांडेवाडी, औताडेवाडी, वडाचीवाडी, होळकरवाडी, शेवाळेवाडी, उंड्री, पिसोळीतील सोसायटीतील नागरिकांनी केली.

मुंबईची राणीचा बाग, पुण्यातील सारस बाग, संभाजी उद्यान, राजीव गांधी उद्यान अशी उद्याने आम्हाला आठवतात. मात्र, आमच्याकडे अशी कुठलीही उद्याने नाहीत. तुम्ही आम्हाला विचारले म्हणून उद्याने उपनगरालगतच्या गावातही असतात हे माहिती झाले, असे मजूर अड्ड्यावरील ज्ञानेश्वर कांबळे यांनी सांगितले.

दररोज पाणी विकत घेतो, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा बट्ट्याबोळ, दस मे बस नाही, आरोग्य सुविधा नाही, पाच रुपयांत पाच किमी बस सुरू केली, तीही बंद केली. शिक्षणाच्या सुविधा नाहीत, तरीसुद्धा वाढीव नव्हे दुप्पट-तिप्पट कराची बिले आम्हाला पाठवून पालिका प्रशासन आमच्यावर अन्याय करत आहे.

-वसंत झांबरे, होळकरवाडी

समाविष्ट गावातील एकही रस्ता समतल नाही, त्या रस्त्यावर पदपथ नाही, बसथांब्यावर शेड नाही, अनेक ठिकाणी वारंवार चेंबर ओव्हरफ्लो होऊन दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर वाहते, तक्रार केली तरी दखल घेतली जात नाही.

- विठ्ठल भिंताडे, उंड्री

जन्म-मृत्यूचा दाखला काढण्यासाठी पाच-सहा किमी पायपीट करावी लागते. रात्री-अपरात्री माननीयांचे उंबरे झिजवावे लागतात. खड्डेमय रस्त्यामुळे रात्रीच्या वेळी वाहनचालकांना डोळ्यासमोर मृत्यूच दिसतो. आजारी-गरोदर महिलांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात महागडे उपचार घ्यावे लागत आहेत.

-रश्मी भिंताडे, उंड्री

ओढ्यांचा श्वास तर कधीच कोंडला आहे. मागिल अनेक वर्षांपासून पावसाळ्यात ओढ्यालगतच्या वस्त्या आणि सोसायट्यांमध्ये पाणी शिरते, त्यावेळी प्रशासन खडबडून जागे होते. त्यानंतर पुन्हा जैसे थे अशी परिस्थिती होते. मागिल वर्षी एक कार ओढ्यातील पुरात वाहून जाताना सतर्क नागरिकांनी वाचविली होती.

- दीपक धावडे, माजी उपसरपंच (पिसोळी)

ग्रामपंचायतीच्या कार्यालयाचा उपयोग फक्त करवसुलीसाठी केला जात आहे. ड्रेनेज, पाणी, स्ट्रीट लाईट या विषयी तक्रार केली, तर क्षेत्रीय कार्यालयाकडे जा असे सांगितले जाते. अंगणवाड्या आणि ग्रामपंचायतीच्या कार्यालयामध्ये आरोग्य केंद्र आणि तक्रार निवारण केंद्र सुरू करून नागरिकांची गैरसोय दूर करावी.

-स्नेहल दगडे, माजी सरपंच (पिसोळी)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com