पुणे जिल्हा परिषदेने केली २० लेखा परीक्षकांची नियुक्ती, कारण... 

zp.jpg
zp.jpg

पुणे : ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांवर उपचार करताना आलेल्या खर्चाचे आणि संबंधित रुग्णालयांनी आकारलेल्या देयकांची तपासणी केली जाणार आहे. यासाठी ग्रामीण भागातील कोविड केअर सेंटर आणि कोवीड रुग्णालयांमधील उपचाराच्या रुग्णनिहाय खर्चाचे लेखा परीक्षण केले जाणार आहे. यासाठी जिल्हा परिषदेने २० लेखा परीक्षकांची नियुक्ती केली आहे.

पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांसाठी कोवीड केअर सेंटर (सीसीसी), डेडीकेटेड कोवीड हेल्थ सेंटर ( डी.सी.एच.सी.), डेडीकेटेड कोवीड हॉस्पिटल‌ (डी.सी.एच.) कार्यान्वित करण्यात आलेले आहेत. या ठिकाणी विविध सरकारी योजनांच्या माध्यमातून गोळ्या, औषधे, शुश्रुषा व उपचार आणि रुग्णालयाचे भाडे यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. 

या रुग्णालयांना हा खर्च विविध योजनांच्या माध्यमातून पुणे जिल्हा परिषदेमार्फत देण्यात येत आहे. याशिवाय खासगी हॉस्पिटलमधील ८० टक्के खाटा या कोरोना रुग्णांसाठी तर, उर्वरित २० टक्के खाटा या अन्य रुग्णांसाठी वापरणे बंधनकारक आहे. शिवाय या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेल्या रुग्णांच्या उपचारासाठीचे दर राज्य सरकारने निश्र्चित करून दिले आहेत. निश्र्चित करुन दिलेल्या दरानुसार ही रुग्णालये देयके आकारतात की नाही, हे या लेखा परीक्षणाच्या माध्यमातून तपासले जाणार असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.

सद्य:स्थितीत पुणे जिल्ह्यात चार डेडीकेटेड कोवीड हॉस्पिटल आणि सहा डेडीकेटेड कोवीड हेल्थ सेंटर कार्यान्वित आहेत. चार कोवीड हॉस्पिटलमध्ये औंध येथील जिल्हा रुग्णालय, लवळे (ता. मुळशी) येथील सिंबायोसिस रुग्णालय, तळेगाव दाभाडे (ता. मावळ) येथील एमआयएमईआर मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल आणि धनकवडी येथील भारतीय हॉस्पिटलचा समावेश आहे. 

सहा डेडीकेटेड कोवीड हेल्थ सेंटरमध्ये ग्रामीण रुग्णालय, बारामती, उपजिल्हा रुग्णालय, मंचर, ता. आंबेगाव, चिंतामणी हॉस्पिटल, सासवड, ता. पुरंदर, विश्वराज हॉस्पिटल, लोणी काळभोर, ता. हवेली, भीमाशंकर आयुर्वेदिक हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर, आंबेगाव आणि नवले हॉस्पिटल आदींचा समावेश आहे. 

जिल्हा परिषदेच्यावतीने विप्रो कंपनीच्या सहकार्याने उभारण्यात आलेल्या विप्रो कोरोना रुग्णालयात मला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. माझ्यानंतर माझ्या कुटुंबातील अन्य तिघांनाही येथे दाखल करण्यात आले होते. आम्हा सर्वांवर मोफत उपचार करण्यात आले. आम्हाला एक रुपयाही भरावा लागला नाही. -उमाकांत सुर्यवंशी, कोलवडी, ता. हवेली.

(Edited by : Sagar Diliprao Shelar)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com