रोहित पवारांचा वारसदार फेब्रुवारीत ठरणार !

सकाळ वृत्तसेवा
Friday, 22 November 2019

राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमधून विधानसभेवर निवडून गेलेल्या सर्व सदस्यांच्या रिक्त जागा भरण्यासाठी नव्या वर्षातील फेब्रुवारी महिन्यात पोटनिवडणूक घेण्याचे राज्य निवडणूक आयोगाने निश्‍चित केले आहे.

पुणे : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमधून विधानसभेवर निवडून गेलेल्या सर्व सदस्यांच्या रिक्त जागा भरण्यासाठी नव्या वर्षातील फेब्रुवारी महिन्यात पोटनिवडणूक घेण्याचे राज्य निवडणूक आयोगाने निश्‍चित केले आहे. यामुळे मिनी मंत्रालयातून (झेडपी) मंत्रालयात पाऊल ठेवलेल्या नवनिर्वाचित आमदारांचे आपापल्या जिल्हा परिषदेतील वारसदार हे फेब्रुवारीमध्ये ठरणार आहेत. यामध्ये पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्‍यातील रोहित पवार यांच्याही जागेचा समावेश आहे. 

बारामती तालुक्‍यातील शिर्सुफळ-गुणवडी या गटातून पवार हे पुणे जिल्हा परिषदेवर निवडून आले होते. त्यांना जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम करण्यासाठी अडीच वर्षांचा कार्यकाळ मिळाला. आमदार झालेल्या सदस्याचे नाव राजपत्रात प्रसिद्ध होताच, त्यांचे जिल्हा परिषद सदस्यत्व आपोआप संपुष्टात येते. त्यानंतर ही जागा रिक्त होते. या नियमानुसार पवार यांच्या जिल्हा परिषद गटाची जागा सध्या रिक्त झालेली आहे. 

याआधी माजी सहकारमंत्री आणि इंदापूरचे माजी आमदार हर्षवर्धन पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष व इंदापूरचे आमदार दत्तात्रेय भरणे आणि जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व खेडचे माजी आमदार सुरेश गोरे आदी नेत्यांचे झेडपी सदस्यत्व आमदार झाल्याने संपुष्टात आले होते. गेल्या एका दशकातील झेडपीतून विधानसभेवर जाणारे पवार हे तिसरे आमदार ठरले आहेत. याआधी 2014 च्या विधानसभा निवडणुकीत भरणे हे इंदापूर, तर गोरे हे खेड विधानसभा मतदारसंघातून विधानसभेवर गेले होते. पवार हे नगर जिल्ह्यातील कर्जत- जामखेड विधानसभा मतदारसंघातून विधानसभेवर गेले आहेत. या तिघांमध्ये एक समान धागा म्हणजे, या सर्वांनी आजी-माजी मंत्री किंवा मंत्र्यांच्या समकक्ष पदावर असलेल्या नेत्यांचा पराभव केलेला आहे. 

भरणे यांनी तत्कालीन सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांचा, गोरे यांनी कॅबिनेट दर्जाचे पद असलेल्या विधिमंडळातील एका महत्त्वपूर्ण समितीचे अध्यक्षपदावर काम केलेल्या दिलीप मोहिते यांचा, तर पवार यांनी मंत्री असलेल्या प्रा. राम शिंदे यांचा पराभव केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Zilla parishad By election in February 2020