पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांची दौंड तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयास भेट

प्रफुल्ल भंडारी
गुरुवार, 24 मे 2018

दौंड (पुणे) : पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते यांनी दौंड शहरातील प्राथमिक आरोग्य पथक आणि तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या आवारातील दारूच्या रिकाम्या बाटल्या आणि कचरा पाहून संबंधितांना धारेवर धरले. कार्यालय आवाराच्या दुरवस्थेची स्वतः पाहणी केल्यानंतर विश्वास देवकाते यांनी उपाययोजनांसाठी एका बैठकीचे आयोजन केले आहे. 

दौंड (पुणे) : पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते यांनी दौंड शहरातील प्राथमिक आरोग्य पथक आणि तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या आवारातील दारूच्या रिकाम्या बाटल्या आणि कचरा पाहून संबंधितांना धारेवर धरले. कार्यालय आवाराच्या दुरवस्थेची स्वतः पाहणी केल्यानंतर विश्वास देवकाते यांनी उपाययोजनांसाठी एका बैठकीचे आयोजन केले आहे. 

दौंड शहरात आज (ता. 24) खरीप हंगाम आढावा आणि पाणी टंचाई बैठक पार पडल्यानंतर स्थानिक जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे यांच्या विनंतीवरून विश्वास देवकाते यांनी ही भेट दिली. प्राथमिक आरोग्य पथकाचे प्रभारी वैद्यकीय अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी या वेळी अनुपस्थित होते. आवारातील कचरा, दारूच्या रिकाम्या बाटल्या, धुळीचे थर, बेशिस्तपणे लावण्यात आलेली चारचाकी व दुचाकी वाहने पाहून त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयास प्रवेशद्वार नसणे, निकामी झालेली संरक्षक भिंत आणि ठिकठिकाणी साचलेला कचरा पाहून श्री. देवकाते यांनी संबंधितांना धारेवर धरत स्वच्छता राखण्याची सूचना केली. 

दारूच्या रिकाम्या बाटल्या पाहून देवकाते यांनी रात्रपाळीतील कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून हे प्रकार बंद करण्याची सूचना संबंधितांना केली. कार्यालयाच्या आवारात वाहने लावण्याचा प्रकार तातडीने बंद करण्याची सूचना त्यांनी केली. 

वीरधवल जगदाळे यांनी प्राथमिक आरोग्य पथकामधून दिल्या जाणार्या औषधोपचाराचा दौंड शहरासह लिंगाळी, खोरवडी, सोनवडी, गोपाळवाडी, बेटवाडी, आदी गावातील ग्रामस्थांना फायदा होत असल्याचे निदर्शनास आणून देत स्वतंत्र वैद्यकीय नियुक्त करण्याची मागणी केली. त्या बाबत विश्वास देवकाते यांनी पुढील आठवड्यात याविषयी एक बैठक घेऊन निर्णय घेण्याचे आश्वासन श्री. जगदाळे यांना दिले.  

दौंड येथील प्राथमिक आरोग्य पथकात वैद्यकीय अधिकारी हे पद रिक्त असल्याने कुरकुंभ (ता. दौंड) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्रमुखांकडे या पथकाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आलेला आहे. 

आरोग्य सुविधांसाठी निधी कमी पडणार नाही...
दौंड येथील प्राथमिक आरोग्य पथकाची संरक्षक भिंत बांधण्यासाठी पंचवीस लाखांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. या कार्यालयाच्या आवाराच्या आणखी काही सुविधा निर्माण करावयाच्या असल्यास त्यासंबंधी प्रस्तावांना मंजूरी दिली जाईल. नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा परिषदेकडून निधी कमी पडणार नाही आणि वैद्यकीय अधिकारी देखील लवकरच नियुक्त केले जातील, अशी माहिती विश्वास देवकाते यांनी या वेळी दिली.  

Web Title: pune zp president visit daund tehsil health office