#PuneAuto अनधिकृत थांब्यांवर रिक्षाचालकांकडून अडवणूक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 8 जून 2018

पुणे - कोणत्याही रिक्षाचालकाला कोणत्याही रिक्षा थांब्यावरून व्यवसाय करता यावा आणि प्रवाशांना कुठूनही रिक्षा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने चार वर्षांपूर्वी उभारण्यात आलेले बहुतांश अधिकृत रिक्षा थांबे ओस पडलेले दिसतात. रिक्षाचालकांची मक्तेदारी मोडून काढण्यात प्रशासन आणि पोलीस यंत्रणेला पूर्णत: अपयश आले आहे. अनधिकृत रिक्षा थांब्यावरील रिक्षाचालकांकडून शिवाजीनगर परिसरात प्रवाशांची अडवणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत.

 रिक्षा परवान्यावरील मर्यादा काढून टाकण्याचा निर्णय नुकताच राज्य शासनाने घेतल्याने नव्या परवान्यामुळे आणखी नव्या रिक्षा रस्त्यावर येऊ घातल्या आहेत. त्यातच रिक्षाचालकांकडून भाडे नाकारणे, मनमानी पद्धतीने भाडे आकारणीच्या तक्रारी वाढत आहेत. वाहतूक पोलिस किंवा प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून भाडे नाकारणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई होत असली, तरी त्यात सातत्य नाही. त्यामुळे रिक्षाचालकांच्या बाबतीत तक्रारी कमी झालेल्या नाहीत.

शिवाजीनगर बस स्थानकाजवळ प्रत्येक महत्त्वाच्या रस्त्यावर, गर्दीच्या ठिकाणी, रिक्षाचालकांकडून अतिक्रमण करून अनधिकृत रिक्षा थांबे उभारण्यात आले आहेत. बहुतांश ठिकाणी छोट्या मंदिराचा आधार घेऊन हे थांबे रस्त्याला अडथळा करीत वर्षानुवर्षे सुरू आहेत. त्या प्रत्येक थांब्यावर ठराविक रिक्षाचालक सभासद असतात. त्यामुळे या सभासदांव्यतिरिक्त कोणालाही थांब्यावरून व्यवसाय करता येत नाहीत. सध्या बहुतांश अधिकृत थांबे ओस पडलेले आहेत. दुसरीकडे अनधिकृत थांब्यावर रस्त्याला अडथळा करत रिक्षा उभ्या असतात. आपल्याच विभागातील थांब्यावरून व्यवसाय होत असल्याने विभागाच्या बाहेर जाण्यास रिक्षाचालक नकार देत आहेत.

भाडे नाकारणे, मीटरचा वापर न करता प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांवर आम्ही योग्य ती कारवाई करतोय. वेळोवेळी करण्यात येणाऱ्या कारवाईमुळे सध्या रस्त्यावरील अनधिकृत रिक्षा थांब्यांना आळा बसला आहे.
- शरीफ शेख, वाहतूक पोलीस

 शिवाजीनगर परिसरात बस स्थानक, रेल्वे स्थानक असल्याने या ठिकाणी गर्दी असते. याचा फायदा घेत रिक्षाचालक मनमानी करतात. लांबचे भाडे नाकारले जाते. भाडे नाकारणाऱ्या रिक्षाचालकांवर योग्य कारवाई होण्याची गरज आहे.
- अविनाश चिकटे, प्रवासी

रिक्षाचालकांकडून रात्री मीटर न वापरता प्रवासी वाहतूक केली जाते. तीनपेक्षा अधिक प्रवासी रिक्षामध्ये बसवले जातात. मात्र, याकडे पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे.
- गणेश ननावरे, प्रवासी 

Web Title: #PuneAuto Autorickshaw driver issue in pune