#PuneEdu इंग्रजी माध्यमाबाबत महापालिकेची 'शाळा'

ज्ञानेश सावंत
गुरुवार, 19 जुलै 2018

पुणे - ‘एकसष्ट विद्यार्थ्यांसाठी एकच शिक्षक असलेल्या शाळेत तुम्ही तुमच्या मुलाला पाठवाल का,’ महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना विचारलेल्या या प्रश्‍नाचे उत्तर ‘नाही,’ असे आले. ‘मग, महापालिकेच्या इंग्रजी शाळेत अशीच स्थिती असताना, तुम्ही गप्प का,’ या प्रश्‍नावर मात्र पदाधिकारी निरुत्तर होतात... 

पुणे - ‘एकसष्ट विद्यार्थ्यांसाठी एकच शिक्षक असलेल्या शाळेत तुम्ही तुमच्या मुलाला पाठवाल का,’ महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना विचारलेल्या या प्रश्‍नाचे उत्तर ‘नाही,’ असे आले. ‘मग, महापालिकेच्या इंग्रजी शाळेत अशीच स्थिती असताना, तुम्ही गप्प का,’ या प्रश्‍नावर मात्र पदाधिकारी निरुत्तर होतात... 

महापालिकेने सुरू केलेल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी पुरेशा शिक्षकांची नियुक्ती केलेली नाही. त्यामुळे ६१ विद्यार्थ्यांना एकच शिक्षक शिकवत असल्याचे दृश्‍य शाळेत दिसते. शिक्षण हक्क कायद्यानुसार ३० विद्यार्थ्यांसाठी एक शिक्षक नियुक्त करणे बंधनकारक आहे. पण, पुणे महापालिकेच्या शिक्षण विभागाने मात्र या कायद्यावरच ‘लाल फुली’ मारल्याचे दिसून येते.

पटसंख्या आणि शिक्षकांचे चुकलेले गणित
पटसंख्या आणि शिक्षक यांच्यात तफावत आहे. नव्या शैक्षणिक वर्षात काही शाळा सुरू झाल्याने १६० हंगामी शिक्षकांची भरती करण्यात आल्याचे महापालिकेच्या शिक्षण विभागाने स्पष्ट केले. मात्र, अपुऱ्या वेतनामुळे हे शिक्षक अजूनही रुजू होत नसल्याचे सांगण्यात आले. 

विद्यार्थ्यांचे मूल्यमापनच नाही
या शाळांमध्ये पाचवी ते आठवीपर्यंत वर्ग भरविले जातात. पण, गुणवत्ता सुधारण्यासाठी यंत्रणा नाहीत. या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे मूल्यमापनच होत नसल्याचे दिसून आले. 

शाळांसाठी नगरसेवकांची चढाओढ
शाळांचे व्यवस्थापन होत नसताना फक्त प्रतिष्ठेसाठी आपल्या प्रभागात शाळा सुरू व्हावी, यासाठी नगरसेवकांमध्ये दर वर्षी चढाओढ होते. यंदाच्या शैक्षणिक वर्षात नव्या सात शाळा सुरू झाल्या आहेत. तसेच, आणखी काही शाळांचे प्रस्ताव प्रशासनाकडे आहेत. ही राजकीय मंडळीही केवळ शाळांना मंजुरी घेण्याचा प्रयत्न करतात, परंतु शाळांच्या गुणवत्तेकडे लक्ष देत नाहीत.

आम्हाला शिकविण्यासाठी शिक्षक येतात. काही शिक्षक सुट्टीवर असतात. तेव्हा मात्र आम्हालाही तेवढ्या तासापुरती सुटी मिळते. 
- विद्यार्थी 

आर्थिक परिस्थितीमुळे मुलाला खासगी इंग्रजी शाळेत पाठविणे शक्‍य नाही. महापालिकेच्या शाळेत चांगले शिक्षण मिळेल, या आशेने मुलाला पाठविले. मात्र, तिथे पुरेसे शिक्षक नाहीत. 
- पालक  

इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये हंगामी शिक्षक भरती सुरू आहे. १६० जणांच्या नेमणुकीचा आदेश दिला असून, आणखी शिक्षकांची भरती करण्यात येईल.
- शिवाजी दौंडकर, शिक्षण प्रमुख, महापालिका 

Web Title: #PuneEdu english medium municipal school education