#PuneFlood संसारच तरंगतोय पाण्यावर 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 ऑगस्ट 2019

आमचा संसार रात्रीपासून पाण्यावर तरंगत आहे, येरवड्यातील शांतीनगरमधील आशा भिंगारे या सांगत होत्या.

पुणे/ येरवडा - माझ्या मुलाला फिट येते... तो घरात झोपून असतो. माझं शरीर थकलंय, घरात कर्ता कोणीच नाही, त्यात घरात रात्री पाणी शिरलं, त्यामुळं आम्हाला घरातून बाहेर पडता आलं नाही आणि साहित्यही उचलता आलं नाही, त्यामुळं आमचा संसार रात्रीपासून पाण्यावर तरंगत आहे, येरवड्यातील शांतीनगरमधील आशा भिंगारे या सांगत होत्या.

शांतिनगर, भारतनगर, इंदिरानगर परिसरात रविवारी रात्रीपासूनच पाणी वाढण्यास सुरवात झाली. सकाळी दहा वाजेपर्यंत हे पाणी कमरेपर्यंत आले होते. हे पाणी पावसाचे नाही तर शेजारच्या मुळा नदीतील पाण्याच्या जोरामुळे तुंबलेल्या गटाराचे आहे. या पाण्यात कित्येकांचे संसार वाहून गेले. आधीच संसार पाण्यात असताना, आता अस्वच्छ पाण्यामुळे आजारी पडण्याची वेळ येथील रहिवाशांवर आली आहे. शांतिनगर वसाहतीतील २५० घरांमध्ये पाणी शिरले. स्थानिक रहिवाशांच्या मदतीने नागरिकांनी काही साहित्य पाण्यातून बाहेर काढले. परंतु, बहुतांश साहित्य हे पाण्यातच होते. दाट लोकवस्तीत घरे आणि पाण्याचा वाढता जोर त्यामुळे ते काढणे शक्‍य झाले नाही. 

भिंगारे म्हणाल्या, ‘‘घरामध्ये पाणी शिरल्याने घरातील सर्व साहित्य पाण्यात असून, आमच्या मदतीला सरकारी वा पालिका कर्मचारी आले नाहीत.’’

दरम्यान, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे व कार्यकर्ते सकाळपासून या भागातील रहिवाशांची मदत करीत आहेत. मात्र, त्यांच्या मदतीला महापालिकेची पुरेशी यंत्रणा नसल्याची कबुलीही त्यांनी दिली.

‘सकाळ’मुळे पालिकेची यंत्रणा घटनास्थळी
येरवड्यातील शांतिनगरमधील २५० घरांमध्ये पाणी शिरूनही महापालिकेची यंत्रणा लवकर घटनास्थळी पोचली नव्हती. जेव्हा ‘सकाळ’ने येथील परिस्थितीचे फेसबुक लाइव्ह केले, त्यानंतर थोड्याच वेळात महापालिकेची अग्निशमन यंत्रणा घटनास्थळी पोचली. या यंत्रणेच्या माध्यमातून नागरिकांसह घरातील महत्त्वाचे साहित्य पाण्यातून बाहेर काढण्यात आले. तसेच, त्यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PuneFlood : Water flows into house in Shantinagar

टॅग्स