प्लेटलेट्‌स दानात पुणेकरांची आघाडी

प्लेटलेट्‌स दानात पुणेकरांची आघाडी

पुणे - रक्तदानाबरोबरच आता प्लेटलेट्‌स दान हे आधुनिक पुण्यातील वैद्यकीय गरज म्हणून पुढे येत आहे. आतापर्यंत फक्त डेंगीच्या उद्रेकात प्लेटलेट्‌सची मागणी वाढत असल्याचे दिसून येत होते. पण कर्करोग आणि अवयव प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियांचे वाढते प्रमाण यातूनही प्लेटलेट्‌सची मागणी वाढत आहे. ही वैद्यकीय गरज पूर्ण करण्यासाठी प्लेटलेट्‌स दान करणारे पुणेकर पुढे येत आहेत. 

जागतिक रक्‍तदान दिनाच्या पार्श्‍वभूमीवर पुण्यातील रक्तदानाचा बदललेला कल याविषयी जनकल्याण रक्तपेढीचे संचालक डॉ. अतुल कुलकर्णी यांनी ‘सकाळ’ला माहिती दिली. 

ते म्हणाले, ‘‘संपूर्ण रक्तदानाबाबत जनजागृती होत आहे. त्यापुढचा भाग म्हणजे रक्तघटक दान ! त्यात लाल पेशी, प्लेटलेट्‌स किंवा ग्रॅन्युलोसाइट असे रक्त घटक दान करता येतात. पण या सगळ्यात पुण्याची आताची खरी गरज ही प्लेटलेट्‌सची आहे. दान केलेल्या रक्तातूनही प्लेटलेट्‌स वेगळ्या काढता येतात. मात्र अत्यवस्थ रुग्णावर उपचार करताना त्या अपुऱ्या पडू शकतात. त्या वेळी ‘सिंगल डोनर प्लेटलेट्‌स’ किंवा दान केलेल्या प्लेटलेट्‌स याला पर्याय राहात नाही. कारण दान केलेल्या प्लेटलेट्‌समुळे रुग्णाच्या जिवाचा धोका कमी होईल, असा विश्‍वास डॉक्‍टरांना वाटत असतो.’’

पूर्वी प्लेटलेट्‌स म्हणजे डेंगी असे समीकरण चार ते पाच वर्षांपूर्वी होते. पण सध्याचा कल बदलत आहे. डेंगीशिवाय त्याची मोठी गरज निर्माण होत आहे. कर्करोग झालेले रुग्ण, दान केलेले अवयव प्रत्यारोपित करण्याच्या शस्त्रक्रियेत लाल पेशींबरोबरच प्लेटलेट्‌सचीही आवश्‍यकता असते. मागच्या वर्षभरात हजार सिंगल डोनर प्लेटलेट्‌स दिल्या आहेत.  यात सगळ्यात मोठा वाटा दात्यांचा आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

प्लेटलेट्‌स डोनेशन हा नवीन ‘ट्रेंड’ आहे. त्यात पुणेकर पुढे येत आहेत. प्लेटलेट्‌स संकलनासाठी पायाभूत सुविधा, यंत्रसामग्री, कुशल तंत्रज्ञ या गोष्टी उभारणे सोपे आहे. पण स्वयंप्रेरित प्लेटलेट्‌स दात्याला रक्तपेढीपर्यंत नियमितपणे आणणे हे अवघड असते. कारण त्यासाठी एक ते दीड तास द्यावा लागतो. शिवाय प्लेटलेट्‌सचे आयुष्यही फक्त पाच दिवसांचे आहे. त्यामुळे त्याची गरज असेल तेव्हाच त्यांनी येऊन दान करणे आवश्‍यक असल्याचेही डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले. 

सगळेच रक्तदाते प्लेटलेट्‌स दाते होऊ शकत नाहीत, हे ज्या वेळी समजले, त्याच वेळी त्या दान करण्याचा निश्‍चय केला. नियमितपणे प्लेटलेट्‌स दान करता येतात. त्याचा शरीरावर कोणताही दुष्परिणाम होत नाही.
- आशिष आगाशे, प्लेटलेट्‌स दाते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com