लॉकडाउनचं चित्रच बदललं; पुणेकरांची आजपासून परीक्षा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 मे 2020

पुणेकरांची खरी परीक्षा आहे. ज्या भागात व्यवहार पूर्ववत करण्याची परवानगी देण्यात आली आहे,त्या भागात गर्दी होणार नाही याची काळजी घेत, सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळावे लागणार आहेत.

पुणे - पुण्यातील बाधित क्षेत्र वगळून अन्य भागात बहुतांश व्यवहार सुरु करण्याला पुणे महापालिकेने मंगळवारी परवानगी दिली आहे. त्यामुळे उद्यापासून त्या त्या भागातील दुकाने तसेच अन्य सेवा सुरु होतील. यामुळे एका बाजूला दिलासा मिळणार असला तरी आता यामुळे पुणेकरांची खरी परीक्षा आहे. ज्या भागात व्यवहार पूर्ववत करण्याची परवानगी देण्यात आली आहे, त्या भागात गर्दी होणार नाही याची काळजी घेत, सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळावे लागणार आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

पुण्यातील बाधित क्षेत्रांतील जीवनावश्‍यक वस्तुंच्या दुकानांसह या क्षेत्राबाहेरील बहुतांशी व्यवहार बुधवारपासून (ता.20) सुरू करण्यात येणार आहेत. परिणामी, लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता, टिळक रस्ता, शास्त्री रस्ता, सिंहगड रस्त्यांवरील एका बाजूची पाच दुकाने सुरू होणार आहेत. मात्र, सावर्जनिक वाहतूक व्यवस्था म्हणजे "पीएमपी', कॅब, रिक्षांसह मॉल, मल्टीप्लेक्‍स, हॉटेल, सलूनची दुकाने बंद राहतील. बाधित क्षेत्र वगळता अन्य भागांतील बॅंका, सरकारी कार्यालये, आयटी कंपन्या, बांधकामे सुरू होतील. विशेष म्हणजे, 27 रस्ते वगळून अन्य रस्त्यांवर पथारी व्यावसायिकांना परवानगी देण्यात आली आहे. परवनागी दिलेल्या भागांतील व्यवहार सकाळी ते सायंकाळी सात या वेळेतच करता येणार आहेत. 

पिंपरीच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

बाधित क्षेत्रांतील अत्यावश्‍यक सेवा पुरविणाऱ्या अन्य घटकांशिवाय सामान्य नागरिकांना रस्त्यांवर येण्यास बंदी आहे. त्याचवेळी जुन्या 69 बाधित क्षेत्रांतील पाच भाग वगळण्यात आले आहेत. तसेच, सोसायट्या, व्यापारी संकुलात कोरोनाचे रुग्ण आढळले आणि त्याचे प्रमाण वाढल्यास त्या जागा सील करून त्यांचा समावेश बाधित क्षेत्रात होईल, असेही महापालिकेने स्पष्ट केले आहे. त्याशिवाय, दुकाने सुरू करताना कामगारांसह ग्राहकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी मालकांवर सोपविली आहे. त्याकडे काणाडोळा केल्यास कारवाईला तोंड द्यावे लागणार असल्याचेही बजाविले आहे. 

उघडी राहणारी दुकाने 
सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी 
इलेक्‍ट्रीकल, संगणक, मोबाईल विक्री व दुरुस्ती, इलेक्‍ट्रॉनिक वस्तू, भांड्याची दुकाने, स्टेशनरी आणि कपड्यांची दुकाने, शिलाई, फोटो स्टुडिओ, सोने-चांदी, चष्मा, शीतपेय,प्लास्टिक, 

मंगळवार, गुरुवार, शनिवार, रविवार 
सायकल विक्री, स्वयंचलित वाहनांची विक्री, वाहनांची दुरुस्ती, हार्डवेअर, प्लंबिंग, बांधकाम तसेच गृहोपयोगी साहित्य, सोने-चांदी, पूजेचे साहित्य, फर्निचर 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर चौथ्या टप्प्यातील म्हणजे येत्या 31 मेपर्यंत लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. त्यानुसार बाधित क्षेत्र वगळता बहुतांशी परिसरातील व्यवहार सुरू करण्याचा आदेश महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी मंगळवारी रात्री दिला आणि तो लगेचच म्हणजे रात्री बारानंतर अमलात येतील, अशी घोषणाही त्यांनी केली. त्यानुसार गेल्या काही दिवसांपासून बंद असलेल्या बाजारपेठा पुन्हा सुरू होणार आहेत. 

शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता, हडपसर-(सोलापूर रस्ता),पुणे-सातारा रस्ता, नगर रस्ता, सिंहगड रस्ता, वाघोली, जंगली महाराज रस्ता, फर्ग्युसन रस्ता, गणेशखिंड रस्ता पथारी व्यावसायिकांना परवानगी नसेल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. 

नव्याने काही सवलती देताना जुन्या 69 बाधित क्षेत्रातील 24 भाग वगळण्यात आले आहेत. तर नव्याने काही भाग समाविष्ट करण्यात आले आहेत. 

- महापालिका हद्दीत सायंकाळी 7 ते सकाळी 7 या वेळेत लोकांना रस्त्यांवर ये-जा करण्यास बंदी. (अत्यावश्‍यक कारण वगळता) 
- 65 वर्षावरील व्यक्ती, गर्भवती महिला, रुग्ण, दहा वर्षांच्या आतील मुलांना घराबाहेर जाता येणार नाही. 
- बाधित क्षेत्रातील मेडिकल दुकाने, दवाखाने सुरू राहतील; पण कामगारांना सुरक्षिततेचे निकष पाळावे लागतील. 
- महापालिकेचे अधिकारी-कर्मचारी, अत्यावश्‍यक सेवेच्या सर्व प्रकारच्या वाहनांना पूर्णवेळ परवानगी 

बाधित क्षेत्रात सुरू राहणार 
दवाखाने, मेडिकल, आपत्ती व्यवस्था सेवा , जीवनावश्‍यक वस्तुंची दुकाने, जीवनाश्‍यक वस्तुंची वाहतूक (या घटकांव्यतिरिक्त अन्य लोकांना या क्षेत्रात प्रवेश करण्यास बंदी) 

बाधित क्षेत्राबाहेरच्या हद्दीत सुरू राहणार 
दवाखाने, मेडिकल, बॅंका, ई-कॉमर्स, दूध प्रक्रिया केंद्र, खाद्यपदार्थ (पार्सल), पथारी व्यवसाय, बांधकामे, आयटी कंपन्यांसाठी हार्डवेअरची निर्मिती, घरकाम करणाऱ्या व्यक्ती, ज्येष्ठ नागरिकांचे मदतनीस (मदतनीस हा बाधित क्षेत्राबाहेरचा असावा) 
सरकारी कार्यालये (केंद्र-राज्य सरकारची कार्यालये- मात्र एकूण कर्मचाऱ्यांच्या तुलनेत 33 टक्के उपस्थिती) 

बंधने : (व्यावसायिक) 
-दुकाने सकाळी 7 ते सायकांळी 7 सुरू ठेवावीत 
-कामगार बाधित क्षेत्रातील नसावेत 
-कामगारांना ओळखपत्र हवे 
-दुकानात सुरक्षित अंतर ठेवून कामे व्हावीत 
-कामगारांना मास्क, हॅण्डग्लोव्हज द्यावेत 
-दुकानाचा प्रवेश सोडियम हायपोक्‍लोराइडने स्वच्छ करावा 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Punekar to follow a strict rules of social distance stay home stay safe