पुणेकरांचं ‘ठरलंच’ होतं! | Election Results 2019

संभाजी पाटील 
शुक्रवार, 25 ऑक्टोबर 2019

आज लागलेल्या निकालानंतर ‘आम्हाला गृहीत धरू नका’ असं अगदी ‘क्‍लीअर’ मत पुणेकरांनी नोंदवल्याचं स्पष्ट झालं. शहरातील दोन मतदारसंघांत विरोधी पक्षाच्या पारड्यात विजयाचं दान टाकून पुणेकरांनी ‘विरोधी पक्षच शिल्लक नाही’ अशा वल्गना करणाऱ्यांची चांगलीच पंचाईत केली.

पुणे - विधानसभेसाठी पुण्यात प्रचार सभा रंगल्या, नव्या उमेदवारांची चर्चा झाली, अनेक राजकीय समीकरणांची मांडणी झाली, शहरात प्रचार करताना अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय मुद्द्यांची चर्चाही झाली. मात्र, आज लागलेल्या निकालानंतर ‘आम्हाला गृहीत धरू नका’ असं अगदी ‘क्‍लीअर’ मत पुणेकरांनी नोंदवल्याचं स्पष्ट झालं. शहरातील दोन मतदारसंघांत विरोधी पक्षाच्या पारड्यात विजयाचं दान टाकून पुणेकरांनी ‘विरोधी पक्षच शिल्लक नाही’ अशा वल्गना करणाऱ्यांची चांगलीच पंचाईत केली. ‘बाकी सगळं ठीक आहे, आता जरा शहराच्या विकासाबद्दल बोला,’ असाच संदेश पुणेकरांनी मतपेटीतून दिला आहे.

‘पुण्यात आमच्या आठही जागा मोठ्या फरकाने येणार’ असा आत्मविश्‍वास भाजपला होता. महापालिकेच्या निवडणुकीत शंभर जागा, लोकसभा निवडणुकीत आठही मतदारसंघांत मोठ्या फरकानं विजय, हेच यामागचं कारण होतं. पण, नेमका हाच आत्मविश्‍वास भाजपच्या दोन जागा गमावण्यास कारणीभूत ठरला, असं म्हणावं लागेल. पुणेकरांनी पर्वती आणि कसबा हे दोन मतदारसंघ वगळता भाजपला सर्व मतदारसंघांत विजयासाठी संघर्ष करायला भाग पाडलं आहे. यातून पुणेकरांनी या वेळी ‘वेगळंच ठरवलं होतं’ हे स्पष्ट होतं.

पुण्याची निवडणूक या वेळी गाजली ती कोथरूड मतदारसंघातील पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उमेदवारीनं. त्यांचं पुणेकरांनी फारसं खुल्या मनानं स्वागत केलं नाही, हे कोथरूडच्या अंतिम आकडेवारीवरून स्पष्ट झालं. लोकसभा निवडणुकीत भाजपला एक लाखाचं मताधिक्‍य देणाऱ्या कोथरूडकरांनी पाटील यांना २५ हजारांपर्यंत खाली आणलं. यातूनच मतदारांनी प्रत्येक वेळी गृहीत धरू नका, हा संदेश दिला आहे. शिवसेनेला एकही जागा न देण्याच्या नाराजीचा फायदा विरोधकांनी बरोबर उठवला. राष्ट्रवादी काँग्रेसची शहरातील कामगिरी निश्‍चितच सुधारली आहे. हडपसर आणि वडगाव शेरी हे दोन्ही मतदारसंघ त्यांनी खेचून आणले. खडकवासला मतदारसंघात नगरसेवक सचिन दोडके यांचा अवघ्या अडीच हजार मतांनी झालेला पराभव भाजपला धक्का देणारा आहे. या निकालावरून राष्ट्रवादी काँग्रेसनं पुन्हा एकदा उपनगरांवर पक्षाचाच प्रभाव असल्याचं सिद्ध केलं आहे.

वडगाव शेरी मतदारसंघाचा निकाल धक्कादायक आहे. ज्या ठिकाणी सुरवातीपासून केवळ भाजपच्या मताधिक्‍याचीच चर्चा होती, नेमका तिथंच घात झाला. राष्ट्रवादीच्या सुनील टिंगरे यांनी विरोधकांची मोट चांगल्या पद्धतीनं बांधली. भाजपनं ज्यांना ऐनवेळी पक्षात आणलं, त्यामुळे परिस्थिती सुधारण्याऐवजी भाजपविषयी नाराजीच वाढली. हडपसर मतदारसंघात आमदार योगेश टिळेकर यांच्याविषयी नाराजी होती. शिवसेनेमध्ये या मतदारसंघात डावलल्याची भावना होती. त्यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी उघडपणे राष्ट्रवादीला मदत केली. कात्रज परिसरात मनसेचे नगरसेवक वसंत मोरे यांनी आघाडी घेऊन टिळेकर यांच्या पराभवाची भागीदारी उचलली.

शिवाजीनगरमध्ये भाजपचा विजय झाला असला, तरी तो निसटता आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दत्ता बहिरट यांची कामगिरी खरोखरच चांगली राहिली. भाजपसाठी सर्व प्रकारे अनुकूल वातावरण असतानाही शिरोळे यांना विजयासाठी झगडावं लागलं. पुणे कॅंटोन्मेंट मतदारसंघातही हीच स्थिती राहिली.

सत्ताधाऱ्यांना दाखवली जागा
महापालिकेच्या कामकाजाबाबत पुणेकरांच्या मनात काहीसा नाराजीचा सूर आहे. वाहतूक कोंडी, पुरात झालेलं नुकसान, रस्त्यावरचे खड्डे, नगरसेवकांची बोकाळलेली ‘टेंडर संस्कृती’ याबाबतही पुणेकरांनी मतपेटीद्वारे नाराजी व्यक्त केली. ३७० कलम किंवा नरेंद्र मोदी यांच्या भावनिक आवाहनापेक्षाही पुणेकरांना ‘आमचा माणूस आणि आमचे स्थानिक प्रश्‍न’ हेच महत्त्वाचं असल्याचं या निकालावरून स्पष्ट झालं. शहराच्या राजकारणात एक सत्तासमतोल आवश्‍यक होता, तोही यानिमित्तानं मतदारांनी घडविला आहे. खऱ्या अर्थानं पुणेकरांनी सत्ताधाऱ्यांना जागेवर आणण्याचा प्रयत्न या निकालातून केला, हे मात्र नक्की.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Punekar opinion not to assume us

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: